आईसटी

बऱ्याच वेळा आपल्या आठवणी खाद्यपदार्थांशी निगडित असतात .

परवा मुलांनी नाश्त्यासोबत  प्यायला हा आईस टी केला .   एवढ्या उकाड्यात हा खरोखर थंडावा आणि एनर्जी देणारा आईसटी घोट घोट घेत गप्पा मारत संपवत होते .

काही घोट घेऊन झाल्यावर फ्रेश वाटण्याऐवजी अचानक खूप निराश हताश वाटायला लागलं . खरं तर सुरवातीचे काही घोट मला खरंचच खूप छान वाटलं होतं मग अचानक हे असं का वाटत आहे यावर विचार करताना आठवलं .

साधारण 2009 सप्टेंबर  महिना असावा ,  गोव्यात सासरे वयोमानामुळे आजारी पडले होते त्यांना पणजीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं म्हणून मी पुण्यात मुलांना वहिनीकडं ठेऊन गोव्याला गेले होते .

आमचं गोव्यातलं घर फोंड्यात,   हॉस्पिटल पणजीत.   रोज यायची जायची सोय म्हणजे तिथली स्थानिक बस सेवा किंवा प्रायव्हेट टॅक्सी किंवा ऑटो रिक्षा .  पर्यटन राज्य म्हणून गोव्यात टॅक्सी  , रिक्षा या सेवा आधीपासूनच खूप महाग , न परवडणाऱ्या आहेत .

मी फोंड्याला घरी बॅग टाकली हॉस्पिटलला तशीच गेले . तिथे काकांची तब्येत चांगलीच बिघडलेली होती . चोवीस तास त्यांच्याकडे कोणी तरी लक्ष देणं आवश्यक होतं .  नणंदबाई फोन्ड्यातच असतात काकांच्या तब्येतीकडे  लक्ष देणं त्यांना घरात हवं नको बघणं हे त्याच बघायच्या . त्यांनीच काकांना आत्ता ऍडमिट केलं होतं आणि मी तिथे पोचेपर्यंतचा दिवस त्याच तिथे सगळं बघत होत्या , लक्ष देत होत्या .

त्यांना घरी पाठवून मी तिथेच राहायचं असं ठरवून टाकलं .   संध्याकाळी डॉकटर येऊन तपासून गेले .
त्या रात्री सिव्हिल हॉस्पिटलच्या त्या मोठया मेल वॉर्डमधे खुर्चीवर बसून काढली .  दुस-या  दिवशी सकाळी एक मुलगा मला शोधत आला त्याला रात्रीचा अटेंडंट म्हणून तिथल्या सशुल्क सेवा पुरवणाऱ्या संस्थेनं पाठवला होता . आता रात्रीचा तो काकांजवळ थांबणार होता आणि दिवसा मी अशी विभागणी करून झाली .

काल सकाळी आलेली मी त्याच कपड्यांमध्ये चोवीस तासांपेक्षा जास्त वेळ उलटून गेला होता तिथेच होते .  घरी फोंडयाला जायचा प्रश्नच नव्हता , हॉस्पिटलच्या कँटीनला जे काही जेवण मिळायचं ते बघून अन्नावरची वासना उडाली होती .
हॉस्पिटलच्या आवारात एक नेस्लेचा कॅफे होता . दिवस उकाड्याने हैराण करणारे , घामाच्या धारात भिजवणारे होते .   या नेस्ले कॅफेमध्ये तीन चार फ्लेवर्सचे आईसटी मिळायचे आणि रोल्स , सँडविचेस , पॅटिस  मिळायचे .  मी सकाळ दुपार संध्याकाळ हे आईसटी आणि रोल्स खाऊन पुन्हा काकांजवळ जाऊन बसायचे . दोन दिवसानंतर मातृसेवा ट्रस्टच्या रुग्णाश्रय संस्थेबद्दल समजलं मग झोपायला आणि रात्री जेवायला  तिथं जायला लागले . तोवर घरून बॅग लॅपटॉप आणि डोंगल मागवून  घेतले होते .
दिवसदिवस या आईसाटिवर काढले ते दिवस एकाकीपणाचे , खूप दुःखाचे , वॉर्डमधले काही  मृत्यू बघितल्याचे होते .

या आईसटीनं  तेंव्हा खूप साथ दिली होती पण तेंव्हाचा काळ ते सगळे प्रसंग पुन्हा समोर उभे केले .

माझं आणि माझ्या सासऱ्यांच कधीच फार पटलं नाही .   पण या  आजारपणात मला त्यांच्याबद्दल  फार माया वाटायला लागली होती , वाघासारखा  माणूस या  हॉस्पिटलच्या बेडवर असहाय्य पडलेला बघवत नव्हता .

पुढे त्यांना जरा बर वाटलं म्हणून घरी आणलं एक पूर्णवेळ मेल नर्स घरीच रहायला ठेवले . माझा  दुबईचा व्हिसा मुलांची शाळा या कारणांमुळे मला दुबईला  जावं लागलं  आणि पुढे महिनाभरातच काका वारले  .

या आईसटीमुळे हे सगळं आत्ता आठवलं .

No comments: