आर्मेनिया - ५ माउंट अरारात, हालीद्सोर


माउंट आरारात
हा खर तर आमचा पर्वत आहे. आमचा देव आहे तो. या तुर्की लोकांनी आमचा देव घेऊन टाकला आहे त्यांना त्याच्याशी काही घेणंदेणं नाहिये पण आता आम्हाला काही करता येत नाही आम्ही इथुनच बघतो त्याला, अगदी रोज बघतो, आम्हाला आशा आहे की एक दिवस तो आमचा आम्हाला परत मिळेल. या माउंट अरारातची गोष्ट, आमचा ड्रायवर अर्मेन आम्हाला सांगत होता. हा आमचा आरारात ज्याचा बायबलमधे पण उल्लेख आहे. " आमच्या ख्रिस्ती धर्मात एवढा महत्वाचा असलेला हा पर्वत घेऊन हे लोक काय करणार आहेत?" असा अतिशय भाबडा प्रश्न आमच्या अर्मेनला पडला होता. अर्मेनियामध्ये फिरताना अगदी सहज कुठुनही हा पर्वत तुम्हाला दिसत राहतो. याबद्दलच्या अनेक गोष्टी ऐकायला, वाचायला मिळाल्या.
हालीद्सोर
येरेवानवरुन हालीद्सोरला जायला आमच्याकडे वाहन नव्हत. आम्हाला विमानतळावर घ्यायला आलेली टॅक्सी इकडे एवढ्या जास्त अंतर असलेल्या प्रवासासाठी नेण्या एवढी मोठी नव्हती. म्हणून टॅक्सीची शोधाशोध सुरु केली. आमच्याकडे लोकल सिम नव्हत त्यामुळे कॉलटॅक्सी आम्हाला उपलब्ध होऊ शकणार नव्हती. जी काही शोधाशोध, सोय करायची होती त्यासाठी फक्त व्हॉट्सॅप आणि आमच्या होमस्टेचा मालक एवढी दोनच माध्यमं उपल्ब्ध होती. मालकानी हात वर करुन आपली जबाबदारी संपवली होती. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप हा एकमेव आधार उरला होता त्याच्या आधारानीच आता प्रयत्न करायचे होते. सकाळी तर हालिद्सोरला जाण्यासाठी निघायला हव होत आणि रात्रीचे साडेआठ झाले तरी आमच्याकडे अजून वाहन नव्हत. मग व्हॉट्सअ‍ॅपवर हालिद्सोर्च्या रिसोर्टशी संपर्क केला. तिथल्या मॅनेजर्/मालक यांनी आमच्यासाठी आमच्या पुढच्या मुक्कामाला पोचवण्यापर्यंत मोठ्या टॅक्सीची सोय केली. हुश्श!!!
येरेवान ते हालीद्सोर हा साधारण चार तासांचा रस्ता आधी खडकाळ दूरवर दिसणारा अरारात मधेच दिसणारी लाल पिवळ्या डोंगरांची रांग आणि मग रस्ताच्या दुतर्फा दूरवर पसरलेला बर्फच बर्फ . अधेमधे पास होणारी एखादीच कार एखादी बस एखादी ट्रक. लहानमुलासारखं बर्फ बर्फ करत वेड लागायला लागलं होतं. मधेच एक बस आम्हाला ओव्हर्टेक करुन पुढे गेले ड्रायव्हर काकानी सांगितल इरान इरान , म्हणजे ही बस इराणला चालली आहे. वॉव!! मला त्या बसच्या मागोमाग इराणलाच जाऊ वाटायला लागलं होतं
येरेवानला पोटभर नाश्ता करुन निघालो होतो आणि वाटेत कुठेतरी काहीतरी खाऊया असा विचार होता पण इथे दूरवर माणूस नजरेला पडायला तयार नाही आणि हॉटेल्स कुठली दिसायला. मग पोटाला धीर देण्यासाठी सकाळी येरेवानला नाश्त्यासाठी उकडेली अंडी आणि ब्रेड उरला होता तो ब्रेड आणि अंडी सोबत आणली होती त्याचे थोडे थोडे घास खाऊन झाले पण काही केल्या रस्त्यावर एकही हॉटेल म्हणून दिसेना. हा ड्रायवर अजिबात इंग्लिश न येणारा होता. त्याला किती तरी वेळा फुड फुड करुन विचारुन झालं होतं तो नुसतीच हो हो अशी मान हलवायचा आणि गाडी चालवायचा. पेट्रोल स्टेशन जवळ आपण खाणार आहोत असं खाणाखुणा आणि पेट्रोल स्तेशन या शब्दावरुन् त्यांनी आम्हाला सांगीतलं तेवढ समजल. पेट्रोल स्टेशन जवळ एक सुपरमार्केट आणि त्याला जोडून असलेल छोटस रेस्टॉरेंट होतं जिथे काहीच मिळत नव्हत. फ्रोजन पिझा फ्रोजन बर्गर आणि फ्रोजन सँडाविच असा प्रकार होता. आम्ही काय खाल्ल तिथे हे मला अजिबात कळलं नव्हत त्यामुळे सांगताही येणार नाही. मजल दर मजल करत आम्ही हालीद्सोर ईको रिसोर्टला एकदाचे पोचलो
हालिद्सोर हे एक दरीत वसलेलं छोटस खेडं आहे . इथली लोकसंख्या जेमतेम सात आठशे एवढी. इथे जायची खरतर गरज नव्हती पण इथे असलेल्या ईको रिसोर्टच्या प्रेमात पडून आम्ही जायच ठरवल. चारी दिशांना बर्फाच्छादित पर्वताना साद घालणारी ही लाकडाची छोटी छोटी कॉटेजेस खरोखर मोठी लोभस दिसत होती. आम्ही इथे पोचलो त्या दिवशी व्हॅलेंटाईन डे होता. येरेवानवरुन हा दिवस साजरा करण्यासाठी खास वेळ काढून आलेली काही जोडपी सोडली तर इथे दूरवर कोणी आणि काहीही नाही. इथे जो निसर्ग अनुभवला तो मात्र खरोखर आयुष्यभर मनावर कोरून ठेवला जावा असाच.
आम्ही हालीद्सोरला पोचलो तेंव्हा आकाश स्वच्छ होतं दिवसभरात झाडांवरचा बर्फ वितळून गेलेला होता. संध्याकाळ होत आलेली होती. या रिसोर्टच्या रेस्टॉरेंटाला चहा कॉफी घेऊ या म्हणून सामान कॉटेजमधे टाकून लगेच गेलो तर साडेसहाला तुम्ही जेवून घ्या आम्ही सातला किचन बंद करतो अस सांगण्यात आलं त्यामुळे तिथे काय आहे हे बघून ओर्डर केली. इथेही जेवणाची गम्मतच होती.
आम्ही मेन्युमधले पदार्थ वाचून हे आहे का ? हे आहे का? विचारत होतो. मालकीण आम्हाला हो म्हणत होती आणि कुकला विचारत होती तर ती रागराग तिला नाही नाही म्हणत होती. शेवटी हो नाही करत तिने कसला तरी भात, आणि चिकन सुप एवढ मिळेल म्हणून सांगितल. चला एवढ तरी मिळतय म्हणून आम्ही जे काही समोर आलं ते पोटात ढकलल. दोन दिवस झालेत आपण काहीच सॅलेड किंवा भाजी खाल्लेली नाही किमान सॅलेड ऑर्डर करु म्हणून सॅलेड ओर्डर केल. सॅलेड म्हणून कोथिंबिरिच्या काही काड्या, कांद्याच्या पातीच्या काही कांदे, शेपुच्या काही काड्या.
जेवण झालं तोवर अंधार पडला त्यामुळे बाहेर पडण्यात काही अर्थ नव्हता आणि इथे करण्यासारखं काहीच नव्हत. म्हणून आम्ही आपले आमच्या कॉटेजमधे आराम करायच ठरवलं. इकडे येताना अरेनी वाईनरी बघायला गेलो होतो तेंव्हा एक रेड वाईनची बाटली घेतली होती. बाहेर मायनस एक टेंपरेचर होतं त्यामुळे वाईनला योग्य तो न्याय देता आला. नुसत्या गप्पा आणि वाईन यात दिवस संपवला. रात्री कसल्या तरी आवाजानी जाग आली म्हणून पडदा सरकवून बाहेर बघीतल तर स्नो सुरु झाला होता . सकाळी आम्हाला तातेव मोनेस्टीला जाऊन पुढे दिलीजान गाठायच होतं त्यामुळे गपचुप पुन्हा अंथरुणात शिरले होते. पण बाहेर पडणारा स्नो दिसत रहावा म्हणून खिडकीवरचा पडदा जरासा सरकवून ठेवला होता, मग तो स्नो बघत पेंगले होते केंव्हातरी.
या हालीद्सोर गावाजवळ असलेल खास आकर्षण म्हणजे तातेव मोनेस्टी आणि या मोनेस्टीकडे आपल्याला घेऊन जाणारा मार्ग म्हणजे केबल कारचा. हा केबल कार रस्ता जगातला सगळ्यात मोठा रस्ता आहे. कितीही बर्फ असो,पाऊस असो ही वाहतुक नेमस्त वेळेत चालू असतेच. यातुन जाताना दिसणार दृष्य खरोखर नजरेच पारण फेडणारं होत.

No comments: