कवितेचे देणे

यंदाच्या मायबोली दिवाळीअंकात दिलेली कविता


कसा सांग सुटतो ग हातातला हात
स्वच्छ निळ्या आभाळाचा का ग तुला राग?
झाकोळता नभ पुन्हा येतेस धावून
दिसे बापुडेसे मग कोवळे हे ऊन्ह

नवी ओळ, नवे खूळ  घेऊन येतेस
डोळ्यास जागाई तू ग देऊन जातेस
नित्य नव्या खुळापायी येई दाटून पापणी
प्राक्तनांची खूण अवघ्या जन्माच्या गोंदणी

ओळ धरून उशाला मन निजले थकून
तिथे भेटली कविता रडे तिला बिलगून
का ग वेळ लावियेला किती केले जपजाप
अंतरीचा तूच दीप; तूच ईश, मायबाप

(कधीकधी ओळखिची सापडते खूण
भेट होते आता अशी अधुनमधुन
काही रुसवे-फुगवे, काही शपथा वचने
कैक जन्म फिटू नये ऐसे कवितेचे देणे)

ही शांत धुक्याची वाट

ई-सकाळच्या दिवाळीअंकात छापून आलेली माझी कविता

साद घालते भासातुन ही शांत धुक्याची वाट
चांदफुलांच्या पायघड्यांवर मौनाची लाट
लाटेवरुनी मौनाच्या या; गंध दरवळत येई
अजून कोणी स्मरते तुजला कानी कुजबुज होई

असाच होता चंद्र लाभला; नव्हती पण पौर्णिमा
रात्रही नव्हती पुरती सरली नव्हती रक्तिम पूर्वा
रुसवे फुगवे राग दुरावे सगळे मिटले होते
मांगल्याचे दीप अंतरी किती उजळले होते


जन्मभराच्या अवसेची तेव्हा कशी कल्पना यावी?
स्वप्नफुलांनी पुजा बांधली; कशी फळाला यावी?
कधीतरी दिसते वाट धुक्याची; उरात हुरहुर उठते
प्राजक्ताच्या झाडाखाली चांदफुलांना बघते...