Showing posts with label दिलसे... Show all posts
Showing posts with label दिलसे... Show all posts

छाटणी

सुशोभिकरणासाठी म्हणा किंवा सावलीसाठी  म्हणा.   इमारतीच्या भोवताली लावलेली निरनिराळी झाडं, अशोकाची, कडूलिंबाची आणि  आगंतुकासारख त्यां बाकी झाडांच्याच ओळीत  मीही त्यांच्यातच म्हणून उगवलेल , त्यांच्या  बरोबरीन वाढलेलं औदुंबराच एक मुख्य झाड आणि त्याच्या संगोपनात वाढलेलं त्याच एक बाळ झाड.

ही झाडं लावताना कल्पना नसावी ,  की  एवढी उंच जातील ही झाडं, अगदी शेवटच्या मजल्याच्यांही वरती पोचतील.

आता काल-परवा म्हणे,  "अंधार व्हायला लागलाय.   फार कचरा पडतोय  पानांचा! "   एवढी वर्ष जाणवलाच  नव्हता ? खरंच? .
सरसकट सगळ्या झाडांची छाटणी झाली.
अशोक अगदी बुंध्यापर्यंत  आले.  कडुलिंबाच्या, औदुंबराच्या मधे  मधे येणा-या सगळ्या  फांद्या छाटल्या.
...
मागच्या बाजूच्या बैठ्या चाळीच्या परिसरातल सगळंच दिसायला लागलय
उन्हं भसकन घरात शिरायला लागली आहेत...
एवढ, असं थेट उन्हं झेलायची सवय गेलीच होती अलीकडे.
...

अध्याय केवळ एक उलटला आहे...

अचानक फेसबुकावर  काळेकाकांनी माझ्या ब्लॉग चा उल्लेख केला आणि आपणही ब्लॉग  लिहित होतो हे आठवल. ब्लॉगची यु आर एल सुद्धा आठवेना एवढी विसरले ब्लॉगला. गुगल बाबाना सगळ साठवून ठेवल्याबद्दल मन:पूर्वक  धन्यवाद.

...

अध्याय केवळ एक उलटला आहे
संपली कहाणी असेच काही नाही

आजपासून  पुन्हा लिहायला सुरवात करते  आहे.. बघू या काय काय सापडत आहे ते.



कवडसा

कधी कधी भल्या पहाटे अंगणात तर कधी थोडंसं उशिरा चहाच्या टेबलाजवळ भेटायचा. स्वैंयपाकघराच्या दाराच्या फटीतून येणारा तो इवलासा कवडसा. थंडीच्या दिवसात उबदार उन्हाची शाल घेऊन तांसतास घुटमळायचा अवतीभवती. माझं गुणगुणत त्याला न्याहाळणं चालायचं. उन्हं डोक्यावर आली की हा इथून थोडं सरकून पुढल्या घरात मग अंगणात मग फाटकाच्याबाहेर असं करत करत दिसेनासा व्हायचा.
कधी कधी रात्रीच पण करमायचं नाही बहुदा त्याला,चांदण्यांचं हसू घेऊन यायचा बऱ्याचदा.तेव्हा तर काय भरपूर रिकामा वेळ असायचा छान गप्पा व्हायच्या. तो त्याच्या प्रवासाबद्दल सांगायचा मीही बोलायचे काहीबाही.
घराची डागडुजी झाली, कुठेकुठे पडलेल्या फटी वगैरे बुजवल्या गेल्या, रंगबिंग देऊन झाला... मस्त वाटतंय नवं नवं...
कवडसा तेवढा हरवलाय मात्र!

अर्चना

तिच्या पिलाकडे बघून राहून राहून वाईट वाटतंय. गळ्यात फास अडकवून घेताना नजरेसमोर एकदाही त्याचा चेहरा आला नसेल ? त्याचे विचार आले नसतील डोक्यात? एवढ्या अफाट जगात आपलं पिल्लू एकटं पडेल त्याच्याकडे कोण बघेल? परक्या देशात आहोत आपण आपलं बाळ काय करेल? हे आणि असले बरेचसे प्रश्न अजूनही मनात घोळतायत .

मी एवढे दिवस राहत असलेल्या आधीच्या अपार्टमेंटमधल्या आमच्याच ग्रुपमधल्या एकीने गळ्याला फास लावून घेतला.. हे ऐकताना ५० चेहरे तरळून गेले डोळ्यापुढे, नक्की कोण हे कळेपर्यंत सगळ्या मैत्रिणी दिसायला लागल्या , सहजच बोलता बोलता बोलून गेलेल्या मनात सलणाऱ्या एकेकीने सांगितलेल्या स्वतःच्या गोष्टी आठवल्या. पंधराच मिनिट लागली नक्की कोण ते कळायला. पण त्या पंधरा मिनिटातली ही अवस्था आणि कोण ते कळल्यावर विश्वासच बसेना.

ती..... एवढी हसतमुख आणि बडबडणारी, सारखी बिल्डिंगभर फिरणारी. मस्तपैकी ढोलक वाजवणारी, त्याच्या तालावर मनसोक्त नाचणारी. स्वतः: फारसं शिकलेली नव्हती पण आपल्या मुलाने खूप शिकावं स्वतः:ला जमत नसतील त्या गोष्टीत प्रसंगी शेजारणींची मदत घेऊन त्याचा अभ्यास घेणारी.

एवढं कायच झालं असेल तिला? काय डाचत असेल? कोणाशीही बोलाव असं न वाटता सरळ स्वतः:ला संपवण्याचा निर्णय घेण्यापर्यंत तिला काय त्रास होत असेल? एक ना अनेक प्रश्न डोक्यात गरगरतायत.

बरं हे सगळं करायच्या आधी मुलाला घेऊन बाहेर पार्किंगमध्ये फिरली, त्याच्यासोबत खेळली, बाकीच्या बायकांशी गप्पा मारल्या आणि नवरा काही कामासाठी बाहेर गेला तेवढ्या वीस मिनिटात सगळा खेळ खलास.

कोणी म्हणतं दोघांच पट्त नव्हतं, कोणी म्हणत तिला भारतात जायच होतं, कोणी म्हणत त्यांचा बराच जुना प्रॉब्लेम होता, माणूस अतिशय चिक्कू आहे पैसा द्यायचा नाही, तिला घरी पाठवायचा नाही, वागणं नीट नाहीये त्याचं. हे असं असताना , बाई नवऱ्याची काळजी घ्यायला विसरली नव्हती;जाताना चिट्ठी सोडून गेली "माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाहीये" .

"माझी आई कुठय?" असं विचारल्यावर, त्या पाच वर्षाच्या बाळाला " तुझ्या आईला दवाखान्यात नेलय; हे खोटं सांगताना; माझ्या बाकीच्या मैत्रीणिंची काय अवस्था झाली असेल ही कल्पनाही करवत नाहीये. ज्यांनी तिला लटकताना बघितलं त्यांची तर त्याहूनही वाईट अवस्था .

ही बातमी ऐकल्या ऐकल्या प्रत्येकाने तिला शिव्या दिल्या, हे काय असलं वागणं म्हणून, पण मला राग नाही आला, वाटलं , किती सहन केल्यावर या निर्णयापर्यंत आली असेल ती.

अजूनही सुटका नाहीच झालेली तिची. सगळ्या औपचारिकता पूर्ण होईपर्यंत अजून ४-५ दिवस लागणार आहेत. घरचे कोणीही येउ शकत नाहित. ही अजूनच वाईट गोष्ट.

जीव गेला तरी देहाचे भोग संपलेले नाहियेत .

श्शॉई :)

सक्काळी साधारण आठ ते साडेआठच्या दरम्यान फोन वाजतो, आणि साहेब बोलायला लागतात"
मन्नाSSSSS....हSSं.....पापाशSS...(पाणी)बाबाशSS(बाबा जे काही खातोय ते बाबाश)....भाSSता...आssई स्श्यांबी(शांभवी)...हSSम्मा....आवाSSझ्य...आल्लाहूबर्र्र्र्र्र्र्र.....(हे म्हणजे समोरच्या मशिदीतन येणारा आजानचा आवाज) :) हे साहेब म्हणजे कोण तर माझ्या भावाचा दीड वर्षाचा मुलगा.
उजाडलं की बाबाचा ऑफिसचा फोन घेऊन आई आणि बाबाच्या मागे याची भुण-भुण सुरू होते.
भावाच्या ऑफिसचे फोन चालू होतात सकाळपासूनच. एके दिवशी त्यांनी मला फोन लावलेला असताना सहजच या साहेबांना फोन दिला तर तेव्हा पासून ठराविक वेळ झाली की याचं गाणं सुरू होतं मन्ना फोन मन्ना फोन म्हणून.

दिवसभर घरभर दंगा करत फिरत राहतो, माझी वहिनी अक्षरशः: हैराण होते त्याला आवरून आवरून. खरंच आपल्याला बाळकृष्णाच्या एकेक खोड्या ऐकताना काय मजा वाटत असते. पण आमच्या या कृष्णाचे प्रताप आवरायचे म्हणजे बाप रे बाप!

एकदा असंच फारच त्रास दिला त्याच्या आईला त्यानं, म्हणून थोडंसं धमकावलं मी त्याला मग इवलंसं तोंड करून उजवा हात डावा कान डावा हात उजवा कान असे कान पकडून साहेब स्वतः: होऊन समोर येऊन उभे राहिले, बोलायचं नाव नही शेवटी मीच विचारलं काय रे काय करतो?" , तर म्हणे "मन्ना श्शॉई अश्ज गु....ब्बॉय(अक्षज गुड ब्बॉय)" :)

सध्या मी भारताबाहेर आहे. आठवण येते रे बाळा तुझी :)