हल्ली.ना आम्ही..


आहा!!
काय सुंदर ओळ
कसं ग बाई गोड ते!
ओहो ओहो ,
अहो थांबा थांबाच
अं?
काय झाल?
च्च!!! मीटर बघा की
असं काय!! हो की,
निट उमटू तरी दे मला मनात तुझ्या
मला काय म्हणायचं आहे ते तरी ऐक ना, प्लीज
छे छे अजिबातच नाही
म्हणजे नाहीच
हे बघ मला वृत्त सांभाळायला हवं आहे.
तू नकोस
उपटली ओळ
कम्प्लीट बॅकस्पेस
विंडोच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत.
...
तर मी काय म्हणत होते, " आम्ही ना थेट स्क्रीनवरच लिहितो आजकाल,

हे स्क्रीनवर लिहिण फार म्हणजे फार सोप्प असतंय बघा,
कागदावर कशी खाडाखोड स्पष्ट दिसते पूर्ण कागद नष्ट करेपर्यंत.
पण स्क्रीनच तसं अजिबातच नाही.
अगदी स्वच्छ कागदावर लिहिलेली कविता
ही कविता होण्याआधी कोण होती?
कशी होती याचा मागमूसही उरत नाही.
आम्ही ना थेट स्क्रीनवरच लिहितो बघा हल्ली.
काय ते उगाच कागद सांभाळा,
खोडा-खोडी सांभाळा
कागद खोडा-खोड
स्क्रीन
काय म्हणत होते मी
अं?
स्थळ: कर्वे रोडचा सेन्ट्रल मॉल
डिस्काऊंट चा घसघशीत आठवडा
खच्चून गर्दी
आम्हीपण गर्दीत कुठ काय मिळतंय का ? आवडतंय का आपल्याला करत शॉपिंग bag सावरत फिरतोय . स्त्रियांच्या कपडे विभागात अर्थात. पायाशी काहीतरी हालचाल होते म्हणून दचकून खाली बघते मी तर साधारण अडीच-तीन वर्षाच एक पिल्लू मध्ये मध्ये करतय. मी सहज त्याच्याशी बोलते. ते मम्मा म्हणत आईकडे जाऊ लागत. मग. माझी नजर आई-बापाकडे, अगदी तिशीच्या आतलं जोडप शॉपिंगमग्न लेकरू कुठ आहे याच भान नाही, असो म्हणत मी पुढे सरकते.
पुन्हा ती मगाची "मम्मा" हाक ऐकू येते अभावितपणे मी हाकेचा वेध घेत नजर फिरवते. आता तेच ते मगाच लेकरू एक hanger ला अडकवलेला ड्रेस ( बायकांच्या सेक्शन मधला ) घेऊन आईच्या मागे मागे फिरतंय.
आता यात सांगण्यासारख काय आहे खर तर?
पण तो ड्रेस जो ते मुल घेऊन फिरत होत, त्याची उंची अर्थात तो ड्रेस पूर्ण वर धरता येईल एवढी नव्हती.मग तो ड्रेस लोळवत लोळवत एकदा आईच्या मागे मागे एकदा बाबाकडे असा फिरत होत आई बाप पण आपल्याला नाही ना त्रास देत आहे मग करू दे कायपण अशा विचारात त्याला काही म्हणत नव्हते.
नुकसान माझही होत नव्हत तरी मला आपल उगाच "अरे तो नवा ड्रेस आहे, लोळवल्यामुळे तो खराब होतो आहे, खराब झाला तर घेणार नाही कोणी, वगैरे वगैरे बडबडण चालू होत..
असो ...

थोडंसंच सांभाळावं लागतं आता

थोडंसंच सांभाळावं लागतं आता,
आकाश निरभ्र असतानासुद्धा
कायमच जाळत जाणारे विजेचे लोळ
ऋतू बदलताना तेवढे त्रास देतात
एकदा या झालेल्या बदलाला झाड सरावलं ;
की पुन्हा राहतंच ताठ उभं
नव्या ऋतूच्या स्वागतासाठी
...
तरी थोडंसं सांभाळावं लागतच..

आठवणी

बघता बघता मी लिहिलेल्या गीतांचा अल्बम प्रकाशित होऊन पाच वर्ष झाली. माझ्या एका गाण्याला हरिहरन यांचा आवाज लाभणार आहे अस बोलता बोलता बोलून गेले होते. हे ऐकल्यावर या ब्लॉगमुळेच ओळख झालेले पत्रकार मित्र महेश देशमुख यांनी अल्बम बद्दल सविस्तर माहिती विचारून घेतली आणि फोटो देखील पाठवायला सांगितला. आजच्या दिवशी २०१२ मध्ये हा  ही फोटोसहीत एवढी मोठी बातमी दैनिक दिव्य मराठी मध्ये छापून आली होती.

उत्तर येत नाही

खोल खोल खड्डा पडत जातो पोटात
एकच नाव घेऊन रक्त धाऊ लागत वेगात
कसं, काय, कुठे , भान उरत नाही
डोळ्यांसकट दाटून येतं दिशातून दाही
अंतर नसतंच खरंतर फार
एक क्लिक, मेसेज पार
अडवत राहतो मेंदू हात
आतून तर केंव्हाच जाते हाक
मनाची हाक पोचत नाही
उत्तर कधीच, कधीच येत नाही..