मध्यपूर्व आशियातील खाद्यसंस्कृती-

मध्यपूर्व आशियातील खाद्यसंस्कृतीवर  लेबनीज संस्कृतीचा जास्त प्रभाव आढळतो. बरेचसे खाद्यप्रकार लेबनानकडून  आलेले दिसून येतात. इथल्या स्थानिक लोकांमधे खाण्याची विशेष आवड दिसून येते ती म्हणजे ग्रील केलेले मांसाहारी पदार्थ. तसेच तळलेले पदार्थ. इथेही रोजच्या जेवणात  भारतातल्यासारखाच गहू आणि तांदळाचा वापर मुबलक प्रमाणात केला जातो. गहू आणि तांदळाच्या बरोबरीने बाजरी,बार्ली,मका ही धान्यही ब-याच प्रमाणात वापरली जातात.

आपल्याकडे गव्हाच्या पिठापासून पोळी किंवा चपात्या केल्या जातात तसंच इथे गव्हाच्या पीठापासून वेगवेगळे ब्रेड बनवले जातात. हे ब्रेड्स प्रांतानुसार वेगळी नावं आणि बनवण्याच्या पद्धती वेग-वेगळ्या तरीही बहुतांश  ठिकाणी ब्रेड हा फूग आणून  बेक केला जातो. रोटीचा अजून एक प्रचलीत प्रकार म्हणजे जाडे रोट जे  तनूर  नावाने इथे मिळतात, ईराणमधे नान, टर्कीमधे पिडे, आणि खबुज/स हे सगळीकडेच वापरल जाणारं यांच्या रोजच्या जेवणातल्या या रोटी/चपाती/ब्रेडच नाव.  शक्यतो  हा पदार्थ जागोजागी असणा-या बेक-यांमधुनच तयारच घरी आणला जातो. खूपच मोठ घर असेल तर हे तंदूर किंवा भट्टी घरात असते अथवा सण-समारंभ असतील अशावेळी घरात तात्पुरती लावली जाते.

इथे विशेष लोकप्रीय असणारा सुगंधी आणि ब-यापैकी महाग  तांदूळ म्हणजे रुज मुफलफल ((ruz mufalfel)) याशिवाय, तांदळाचे अन्य प्रकारही वापरले जातात पण जरा जाड असाच तांदूळ इथे वापरला जातो असं दिसून येतं.
भाताच्या प्रकाराला पिलाफ,पुलाव अस म्हटल जातं. बरेचसे शब्द इथूनच(फार्सी) आपल्याकडे आलेले दिसून येतात.
साधारणपणे घराघरात केला जाणारा भाताचा प्रकार म्हणजे तांदूळ आणि शेवया एकत्र शिजवलेला असा भात असतो त्यासोबत खाण्यासाठी मसाले घालून आमटीसारखे शिजवलेले हरभरे.

अन्न शिजवण्यासाठी गाई/म्हशीच्या दुधापासून  तयार केलेलं शुद्ध तूप आणि  ऑलिव्ह ऑईलचा वापर केला जातो.
जेवणात विवीध पदार्थांमधे दही,ताकाचा भरपूर वापर करताना दिसून येतो. जेवताना बरोबर पिण्यासाठी  पुदिना मीठ घालून केलेलं ताक (लबान) आपल्या मठ्ठ्याची आठवण करुन देतं.

भाज्यांचे प्रकार स्ट्यू म्हणून ओळखले जातात, त्यात वापरले जाणा-या मसाल्याला बहारत(baharat)  असं म्हणतात,यात साधारणपणे आपल्या गरम मसाल्यामधे असतात तसे निवडक मसाले मिसळून एक मसाला तयार केलेला असतो. ते म्हणजे दालचीनी,लवंग,वेलची,धणे,मिरची पावडर. तिखटपाणासाठी मिरी पावडर जास्त वापरली जाते तर तिखट अगदी अल्प प्रमाणात वापरतात.

पार्स्ले आणि पुदिना इथल्या अगदी रोजच्या स्वयंपाकात असतोच असं म्हणायला हरकत नाही. यांच्या दिवसाची सुरवात भक्कम न्याहारीनी होते. न्याहारीमधे मुगाच्या भज्यांसारखा पदार्थ, कडधान्यांच्या उसळीसारखा पदार्थ, जोडीला खबुस. लेट्युस आणि इतर  सॅलड. बिनादुधाचा चहा त्यात पुदिन्याच्या पानांचा वापर,  टर्किश कॉफी, तसच वाळवंटात राहणारे बदाऊनी लोक उंटीणीच्या दुधाचा वापर स्वयंपाकामधे करताना दिसतात.

इथे मुख्यत्वेकरुन मासांहारावर जास्त भर असलेला दिसून येतो. बिफ, मेंढीच मटण, चिकन,  उलपब्ध असणारे त-हेत-हेचे मासे. मासांहाराचे विवीध प्रकार ग्रिल करुन,तळून, मांस बारीक करुन, कुटून, कबाब वगैरेसारखे पदार्थ. सोबतीला एखादा शाकाहारी किंवा मासाहारी स्ट्यू, खबुस किंवा तत्सम रोटीसदृश पदार्थ, चटणी कोशिँबीरीच्या जागेवर डावी उजवी बाजू सांभाळणारे तसेच पदार्थ म्हणजे आपल्याकडे डाळीचा डांगर असेल तर इथे  काबुली चण्यापासून तयार केलेला  हमुस नावाचा  पदार्थ असतो, कोशिंबीरीच्या जागेवर टॉमेटो वापरून केलेला सालसा किंवा चटणी, पचडीच्या जागेवर पास्ले आणि गव्हाची कणी वापरून केलेला तबुले नावाचा प्रकार. दही घालून केलेलं वांग्याच भरीतसुद्धा जरा वेगळ्या रुपात आपल्याला इथे दिसून येतं.


भाज्यांमधे मोठ्या भरिताच्या वांग्यांचा वापर भरपूर प्रमाणात दिसून येतो, तो म्हणजे स्ट्यू बनवण्यासाठी, वांग्याचा तळलेल्या काप खबुसमधे  गुंडाळून त्यात चिज,ऑलिव्हज,मेयोनिज आणि हव्या त्या चविचा सॉस घालून झटपट स्नॅक म्हणून किंवा,  साईड डिश, डीप म्हणून. कांद्याचा वापर मात्र अल्प प्रमाणात दिसून येतो याचं  कारण  कदाचित कांद्याची उपलब्धता नसण हे असावं. गवारीच्या शेंगांची भाजीही इथे आवडिने खाल्ली जाते...करण्याची पद्धत अर्थात फार वेगळी फारसे मसाले न घालता पाणी आणि टॉमेटो घालून शिजवलेल्या शेंगा अशी असते.

गोड पदार्थांमधे आपण करतो तसा शिरा,हलवा, आपल्या रबडीच्या जवळ जाणारा दूध आणि मैद्याच्या कडक बिस्किटापासून तयार करण्यात येणारा उम अली हा पदार्थ. बदामाचा शिरा, पाकातल्या पु-या किंवा चिरोट्याच्या  बकलावा.खजुराचे रोल,पुडिंग्ज, गुलाबजामसारखे दिसणारे लुकेमत (डंपलींग्ज).

त-हेत-हेची सरबतही इथे शरबत याच नावानी इथे आपल्याला दिसून येतात. इथे होणारा सुका मेवा आणि केशराचा मुक्तहस्त वापर मात्र आपल्याला आचंबित करणारा आहे.  आपल्या खाद्यसंकृतीशी मिळती जुळती नावं असणारी परंतू चवीमधे तफावत असणारी ही मध्यपूर्वेतली खाद्यसंस्कृती आपल्याला आपल्या ब-याच पदार्थांची आठवण करुन  देते हे मात्र नक्की.
 -

 1) हमूस
साहित्य:
125  ग्रॅम  भिजवलेले काबुली चणे
एका लिंबाचा रस
दोन कुड्या लसूण, ठेचलेला
तीन चहाचे चमचे तीळाची पेस्ट (ताहिना)
चवीनुसार मीठ
वरून घालण्यासाठी:
1मोठा चमचा ऑलिव्ह ऑईल
1मोठा चमचा पेपरिका
बारिक चिरलेला पार्स्ले
कृती:
काबुली चणे मऊ होईपर्यंत शिजवून घ्यावेत, लिंबाचा रस,लसूण ताहिनी आणि मीठ घालून मिक्सरमधून अगदी क्रिमी होईपर्यंत बारीक करावं
वाढताना बाऊलमधे किंव्हा डिशमधे घेऊन  वरुन ऑलिव्ह ऑईल, पेपरिका आणि पार्स्ले  घालून सजवावं.
(एक  डीप, साईड डिश, ब्रेड स्प्रेड, पोळीशी लावून खाता येणारा पदार्थ)

2) बाबा घनौज Baba Ghannouj
साहित्य:
1 मोठं  भरिताचं वांगं
2 ते 3 लसणाच्या कुड्या
4 मोठे चमचे ताहिनी पेस्ट
2 चमचे लिंबाचा रस
1 चमचा लाल तिखट
ऑलिव्ह ऑईल ,
वरुन घालायला बारीक चिरलेली पार्स्ले (इथे आपण कोथिंबीर घेऊ शकतो)

कृती:
गॅसवर वांगं भाजून घ्याव. भाजून  झाल्यावर ते व्यवस्थित सोलून घेऊन नीट कुसकरून घ्यावं. लसणाच्या कुड्या मीठ घालून ठेचून घ्याव्या. मग हा ठेचलेला लसूण, ताहिनी पेस्ट आणि कुसकरलेलं वांगं,लिंबाचा रस असं सगळ एकजीव होईल असं मिसळून घ्यावं.वरून थोडसं लाल तिखट,ऑलिव्ह ऑईल आणि बारीक चिरलेली पार्स्ले घालून सजवाव.

एक साईड डिश म्हणून इथे हे खाल्ल जातं.

3) फुल मुद्दामास (नाश्त्यासाठी केला जाणारा एक प्रकार)
साहित्य:
1 कप फुल ( राजम्यासारखं एक कडधान्य) रात्रभर भिजवून ठेवाव.
1 मध्यम आकाराचा पिकलेला टॉमेटो.
3-4 कुड्या  ठेचून घेतलेला लसूण.
पाव कप बारीक चिरलेली पार्स्ले
1कप बरीक चिरलेला कांदा
4 चमचे  ऑलिव्ह ऑईल
मिरी पावडर,
1 लिंबाचा रस
चवीनुसार मीठ

फुल किंवा आपण घेतलेलं कडधान्य पुरेसं पाणी घालून नीट शिजवून घ्यावं.  शिजवल्यावर गॅस चालूच ठेवून   त्यामधे बारीक चिरलेला टॉमेटो,कांदा घालावा, ठेचलेला लसूण लिंबाचा रस ,मिरी पावडर आणि मीठ घालून एक उकळी आणावी वरून पार्स्ले  घालून सजवावं.

पोळी,ब्रेड, किंवा खबुसबरोबर खाता येतो.  इकडे  नाश्त्यासाठी रोज केला जाणारा पदार्थ.

4)अरोज मुफलफल

साहित्य:
2 कप तांदूळ 10 मिनिटे भिजवून घेतलेला.
पाव कप चुरडून घेतलेल्या शेवया
2 मोठे चमचे लोणी
मीठ आणि पाणी

कृती:
 बटरमधे शेवया सोनेरी रंगावर परतून घ्याव्या.  त्यावर उकळत पाणी घालावं. आता यात भिजवलेला तांदूळ घालावा. पुन्हा हवं असेल तर थोडं पाणी घालावं.मीठ घालून एकदा नीट ढवळून घ्यावं.झाकण ठेवून भात शिजवून घ्यावा.

कुठल्याही रस्सा भाजीबरोबर, वरणाबरोबर हा भात सर्व करावा.
दिन आज भटकत राही; का उगाच स्मरते काही?
सांग ना...सांग ना
एकाच पावसाची; का फिरून याद येई?
सांग ना...सांग ना
स्पंद माझा थबकतो रे, ऐक सखया तुजविना
ऐक ना...ऐक ना

मी तुझ्यात हरवत असता; मज तिथेच भेटे कविता
रुणझुणतो श्रावण माझा, चाहूल तुझी रे मिळता
गूज सारे आज वा-या पैल जाऊन सांग ना
सांग ना...सांग ना

क्षणी दाटे उरी हुरहूर; क्षणी नाचू लागती मोर
हे नवीन काही घडते; या नभास बहुदा कळते
दो दिशातील अंतरांना सांधणारा बंध हा
ऐक ना...ऐक ना

मन रुमझुम रुमझुम गाते

चांदणशेला या माझ्या अल्बममधलं हे गीत बेला शेंडे च्या आवाजात.
हे  गीत ऐकण्यासाठी  या पोस्टच्या शिर्षकावर क्लिक करा
मन रुमझुम रुमझुम गाते
फुले हळवे हळवे नाते
गंध नवा हवा हवासा
आला घेऊन खट्याळ वारा

काय सांगतो शब्द ऐक
स्पर्श लेऊन आली हाक
अशा खुळ्या चाहुलिंचा
देही उठतो शहारा

स्वप्न असावे कुणी म्हणे
भास असावे कोणा ठावे?
कसा चंद्रही नवतीचा
उगाच देई पहारा

कविता

चंद्र कवितेतला
कोजागिरीही कवितेतलीच
आकाश तेही अर्थात तिथलंच
मग तिथे अवेळी येणारा पाऊस,
सगळ काही विस्कटून टाकणारी वादळं
त्यात फरफटत जाणारे आपण
शब्दही, आणि अर्थही तिथलेच
सगळ्या भावना, सगळी दु:ख
सगळा आनंद तिथलाच; असं जरी असलं आणि
आयुष्य म्हणजे एक कविताच असं म्हटल
तरी एक कविता म्हणजे सगळं आयुष्य नसतं
नाही का?

तुझ्या इच्छेविना देवा माझे बापुडे साहस!

Hariharan ji and me while recording my song
२ जानेवारी , मेलबॉक्समधे एक मेल येऊन पडली, सिंगरहरी अशा नावानी आलेली. म्हटल काय स्पॅम असणार जाऊच द्या. मग अचानक आठवल की, अरे महिनाभरापूर्वी आपण हरिहरन सरांच्या मॅनेजरला गाण्यासाठी मेल टाकली होती. त्यांच उत्तर आलं की काय चक्क!!!!!
येस्...तीच मेल होती, अमुक तारखेला, दिलेल्या पत्त्यावर त्यांच्या स्वतःच्या(च) स्टुडिओमधे रेकॉर्डिंग असेल. अग्ग्ग्ग्ग्ग बाब्बो! जागी आहे का मी नक्की? नक्की हे वाचतेय का?
समोर दिसत असुनही मला हे अजिबात खरं वाटेना, लगोलग पुन्हा लताजींना* फोन लावला, की तुमची मेल आली आहे, त्यांच उत्तर हां जी, दो दिन पहेलेही मैने मेल भेजा था आपको. (च्यामारी त्या ३१डिसेंबरच्या सिलेब्रेशनची) मी दोन दिवस ऑफलाईन असल्याचा माझा मलाच राग आला.
त्यानंतर पुन्हा सगळं पहिल्यापासून पुन्हा, पुन्हा वाट बघणं, पुन्हा आशा-निराशा, होतय का नाही ? उलघाल नुसती. सलग तीन्-चार दिवस लताजींना फोनवर पिडणं, त्यांनी रोज, आपकी डेट मेल कर दुंगी इतनी फिकर मत किजीये, म्हणून सांगण्...हुह!
तर झालं असं की मी लिहिलेल्या गीतांच्या अल्बमच काम चालू आहे, एक गाण असं जमून आलं की ते ऐकताना स्टुडिओत असणारी मंडळी "अरे क्या बात है! इसके लिये तो कोई उस्तादही चाहिये... " अ ओ, आता काय करायचं आणि आता या गाण्यासाठी सुचवलेली नावं ऐकून हे गाणं रद्द करावं लागतय की काय, असही वाटून गेलं.
काहीतरी नवीन, काहीतरी नवीन म्हणत मी भलत्याच तिढ्यात अडकले होते. या गाण्यासाठी सुचवलेली नावं ऐकून झोप उडाली होती. शेवटी धीर करुन शशांकशी बोलले, त्यानी फोन नंबर्स दिले आणि हा वरचा प्रवास सुरु झाला.
काल साधारण सकाळी साडे-दहाच्या सुमारास आम्ही चांदिवलीत असणा-या त्यांच्या स्टुडिओत पोचलो. धाकधुक-धडधड्-पोटात गोळा, सगळं जे काय होत असत ते सगळं एकाच वेळेला होत असल्यावर काय होत असेल माणसाच? मेले नाही एवढच खरं स्मित
स्टुडिओत बसून काही कप चहा पोटात ढकल्यावर जरा नॉर्मलला आले बहुतेक. शशांकनी* ट्रॅक सेट केला, दोन्-तीन वेळा आम्ही ट्रॅक पुन्हा ऐकला. शब्दांवरुन नजर फिरवली, सर कधीही येतील असं तिथल्या साऊंड इंजिनिअरनी सांगितल्यामुळे नजर दरवाज्याकडेच आणि उगाच मग रिकाम्या स्टुडिओचे फोटो काढ, इकडे बघ तिकडे बघ, सायलेंट वर टाकलेलां फोन ५० वेळा उचलून बघ, मेसेज करुच का सगळ्यांना? अरे मला हे सगळं लवकरात लवकर सांगायच आहे...काढून झालेले फोटो पुन्हा पुन्हा बघून झाले....आणि आहा....दरवाजाच्या काचेतुन हरिहरन येताना दिसले. अगदी तुमच्या माझ्यासारखा साधा पोषाख निळी जिन्स त्यावर साधासा शर्ट, एखाद्या तपस्व्या सारखे लांब केस चेह-यावर असणरे शांत भाव...आम्ही दोघ ताडकन उभे राहिलो..आपोआप घडणारी गोष्ट, आवर्जून काही करावच लागल नाही एकामागे एक दोघही जण त्याच्यापुढे वाकलो, अरे ऐसा मत करो रे... स्मित
हं! चला ट्रॅक सेट केला का तुम्ही? शब्द सांगता का मला; मी लिहून घेतो.....अग्ग ग्ग! अरे किती वेळा मरु? मी हळूच पर्समधला गाण्याच्या प्रिंट्-आउटचा कागद काढून त्यांच्यापुढे धरला. गडी खुश...अरे वा! तुम्ही तर तयारीत आहात एकदम! चला ट्रॅक ऐकू या एकदा...
साहेब रेकॉर्डिंग रुममधे पोचलेसुद्धा होते...शशांक तुला मी कसं गायला हवं आहे? जसंच्या तसं देऊ का? का मी काही अ‍ॅडिशन केल्या तर तुला चालणार आहेत? शशांक गार... एवढा मोठा गायक, आणि एवढी लीनता? उगाच मोठे होत नाहीत लोकं खरंच त्यासाठी अंगभूत मोठेपणा असावाच लागतो.
गाणं सुरु करायच्या आधी त्यांनी आवर्जून सांगितलेली गोष्ट इथे सांगायला आवडेल, अरे तू मेल मधे पाठवलेला ट्रॅक मी प्ले केला तर मला वाटल तुम्ही लोकांनी चुकीचाच* ट्रॅक पाठवला मला बहुतेक स्मित
आमच्याशी बोलताना मुद्दाम मराठीत बोलत होते, त्यांच्या माणसांशी मल्याळममधे बोलत होते, मधेच कोणाचा फोन आला तर उर्दू अ ओ, आता काय करायचं सगळंच अगदी सुशोभीत. (मी पुन्हा एकदा, उगाच मोठी होत नाहीत माणसं)
डबिंग सुरु झालं, मुखडा फायनल झाला, गाण पुढे सरकलं, गाता गाता मधेच एके ठिकाणी, शशांकला "अरे काय गोड केलंयस रे हे!" ही अशी उत्स्फूर्त आलेली दाद पण... ऑ!!!!! गोड??? तुमच्या आमच्यासारखं मराठी...कधी शिकत असतील हे असं सगळ?
गाण्यातली एक ओळ, हाय कैसी ही कळा? अशी आहे, आणि कैसी च्या कै चा उच्चार उर्दूकडे जात होता, मी उठून शशांकपाशी आले ते सांगायला तर हे गायचे थांबले आणि विचारलं, ठीक चालल्य ना सगळ? मी चाचरत म्हणाले सर ते कै चा उच्चार जरा....." अरे यार, हां मै उर्दू मे घुस रहा हु" "चलो टेक फॉर कैसी" अ ओ, आता काय करायचं एवढ सहज!!!!
क्रॉसलाईनला सारंगी आहे ट्रॅकमधे आणि तिथे आलाप घ्यायचा होता, त्यांनी आलाप घ्यायला सुरवात केली, एक आलाप एवढा कातील दिला त्यांनी की शशांक पुटपुटलाच ,सारंगी गेली..., स्पिकरमधुन लगेच आवाज, हा आलाप नको थांब; मी दुसरं देतो काहीतरी....त्या सारंगीची ब्युटी आहे या इथे; ती नको जायला (अहो मनकवडे की काय तुम्ही?)
अवघ्या दिड तासात गाण्याच डबिंग संपल. गाणं पूर्ण होऊन आमच्या हातात. झालं ना तुम्हाला हवं तसं, म्हणत माणूस इतर कामांकडे वळला, काही बदल करायचा असेल तर सांगा मी आहे इथे, करता येईल.
अजून किती तरी आहे सांगण्यासारखं...पण आता थांबतेच स्मित
गेल्या ६-७ वर्षापासून आयुष्यात काही घडलं की लहान मुलासारखं मायबोलीवर येऊन सांगायची सवय लागली आहे. अजून अल्बमच रिलीज वगैरे फॉर्मेलिटिज बाकी आहेत. पण ही आयुष्यातली खूप मोठी गोष्ट इथे सांगितल्याशिवाय राहवेना.
*लताजी: हरिहरनच्या मॅनेजर
*शशांक पोवारः अल्बमचे संगीतकार
*या गाण्याचा सरप्राईज एलिमेंट
वरच्या फोटोत हरिहरन साहेबांना सगळ्यांनी ओळखल असेल, कदाचित मलाही ओळखल असेल स्मित तिसरी व्यक्ती अल्बमचे संगीतकार शशांक पोवार आहेत.


का पुन्हा पुन्हा हा जीव इथे घुटमळतो?
जणू प्राणच माझा शब्दातुन दरवळतो
या शब्दांचे हे अजब लाघवी नाते..
हातास धरूनी; मज समेस घेऊन येते
~श्यामलीअध्याय केवळ एक उलटला आहे...

अचानक फेसबुकावर  काळेकाकांनी माझ्या ब्लॉग चा उल्लेख केला आणि आपणही ब्लॉग  लिहित होतो हे आठवल. ब्लॉगची यु आर एल सुद्धा आठवेना एवढी विसरले ब्लॉगला. गुगल बाबाना सगळ साठवून ठेवल्याबद्दल मन:पूर्वक  धन्यवाद.

...

अध्याय केवळ एक उलटला आहे
संपली कहाणी असेच काही नाही

आजपासून  पुन्हा लिहायला सुरवात करते  आहे.. बघू या काय काय सापडत आहे ते.संध्येच्या पारावरती

संध्येच्या पारावरती

 संध्येच्या पारावरती विस्कटले ऊन्ह जरासे
मग उगाच ऐकू येती दिवसाचे क्षीण उसासे

संध्येच्या पारावरती कल्लोळ अस्वस्थांचा...
काळोख दाटुनी येतो उजळल्या गत जन्मांचा

संध्येच्या पारावरती प्रश्नांची बैठक भरली
न्यायनिवाड्याआधी शिक्षेची सुटका झाली

संध्येच्या पारावरती चुकलेले हंबर कानी
मन शांतपणाचे त्याला घालतसे चारापाणी

संध्येच्या पारावरती प्राणाची धडपड नुसती
हा देह सुटेना अजुनी; नि:स्तेज तेवते ज्योती

चल खेळू या...

चल खेळू या...
डाव मांडून तुझं खुल्या दिलांन, आमंत्रण,
म्हटल, चला खेळू या.
मी तुझ्या बाजुनी खेळणार, म्हटल, वा!
मग पलिकडे कोण? नाही तसं नाही तिकडेही मीच खेळणार;
अं? म्हणजे...
मी तुझ्या बाजुनी खेळणार,
मीच माझ्याही बाजुनी खेळणार.
चल खेळू या?
दान तुझ्यात हातात असणार..
खेळाचे नियम तेही तुझेच
हरकत नसेल माझी
दिवसेंदिवस चालला खेळ तरी चालेल
चल खेळू या...!
तू पाऊस आण, नखशिखांत भिजव
तू उन्ह पाड....लाही लाही करुन सोड
तू शिशीरात पाने गाळ,
तू वादळानी उध्वस्त कर
तू लाटामधे दडव सगळं
आणि विचार मग.... चल खेळू या?

भक्तवत्सल

मी विसरायचे नाही फुलं वाहायला...
तुझ मात्र तुलाच लक्षात ठेवावं लागेल
कुठे, कधी, कसं, प्रगट व्हायचं; का नुसताच दृष्टांत द्यायचा...
का यापैकी काहीच न करता तटस्थ रहायचं.
तसंही, माझी तुझ्यावरची श्रद्धा अबाधित राहू दिलीस
आणि अजून मला नतमस्तक व्हायला लावतोस
हे ही कमी नाहीये म्हणा...
याला भक्तवत्सलता म्हणत असावेत.... तुझ्या जगात.