थांबलो आहे खरा

थांबलो आहे खरा पण घेतली माघार नाही
वाकलो आहे जरासा जाहलो लाचार नाही

काय सांगू, बोलताना तोल जातोही अताशा
आणि मौनाचा कधी मी घेतला आधार नाही

काय प्रश्नाचीच येथे चालते बेबंद सत्ता?
उत्तरे मिरवील ऐसा एकही दरबार नाही?

बास आता फार झाले, वाट बघणे जीवनाची
मांडली माझी कथा मी, नोंदली तक्रार नाही

टेकवूनी लाख डोकी, पाय झाले जीर्ण पुरते;
आणि म्हणती, "सावळ्याला भावनेचा भार नाही!"

नित्यनेमे रोज दारी पालखी ये आठवांची
प्रेमभावे वंदितो मी, सोडला व्यवहार नाही

वादळाला सवय झाली सोबतीने चालण्याची
ते मुळी सोशीक आणिक; त्रास माझा फार नाही

चारोळी

काही लिहावे म्हणून
होई लेखणी आतूर
हाय हाय अश्या् क्षणी
शब्द शब्द की फितूर

चारोळी

एक एक शब्द माझा
आज माझ्याशी भांडला
कसे कळेना यालाही
किती जीव हा कोंडला