संध्येच्या पारावरती

संध्येच्या पारावरती

 संध्येच्या पारावरती विस्कटले ऊन्ह जरासे
मग उगाच ऐकू येती दिवसाचे क्षीण उसासे

संध्येच्या पारावरती कल्लोळ अस्वस्थांचा...
काळोख दाटुनी येतो उजळल्या गत जन्मांचा

संध्येच्या पारावरती प्रश्नांची बैठक भरली
न्यायनिवाड्याआधी शिक्षेची सुटका झाली

संध्येच्या पारावरती चुकलेले हंबर कानी
मन शांतपणाचे त्याला घालतसे चारापाणी

संध्येच्या पारावरती प्राणाची धडपड नुसती
हा देह सुटेना अजुनी; नि:स्तेज तेवते ज्योती

चल खेळू या...

चल खेळू या...
डाव मांडून तुझं खुल्या दिलांन, आमंत्रण,
म्हटल, चला खेळू या.
मी तुझ्या बाजुनी खेळणार, म्हटल, वा!
मग पलिकडे कोण? नाही तसं नाही तिकडेही मीच खेळणार;
अं? म्हणजे...
मी तुझ्या बाजुनी खेळणार,
मीच माझ्याही बाजुनी खेळणार.
चल खेळू या?
दान तुझ्यात हातात असणार..
खेळाचे नियम तेही तुझेच
हरकत नसेल माझी
दिवसेंदिवस चालला खेळ तरी चालेल
चल खेळू या...!
तू पाऊस आण, नखशिखांत भिजव
तू उन्ह पाड....लाही लाही करुन सोड
तू शिशीरात पाने गाळ,
तू वादळानी उध्वस्त कर
तू लाटामधे दडव सगळं
आणि विचार मग.... चल खेळू या?

भक्तवत्सल

मी विसरायचे नाही फुलं वाहायला...
तुझ मात्र तुलाच लक्षात ठेवावं लागेल
कुठे, कधी, कसं, प्रगट व्हायचं; का नुसताच दृष्टांत द्यायचा...
का यापैकी काहीच न करता तटस्थ रहायचं.
तसंही, माझी तुझ्यावरची श्रद्धा अबाधित राहू दिलीस
आणि अजून मला नतमस्तक व्हायला लावतोस
हे ही कमी नाहीये म्हणा...
याला भक्तवत्सलता म्हणत असावेत.... तुझ्या जगात.