रे घना

अंथरून जीव हा वाट पाहते धरा
येथ मेघ येत ना; आर्त साद अंबरा

मार्गही तोच अन नेमही असे जुना
काय येथे तुला यायचे ना पुन्हा?

रे घना; सांग ना काय झाले असे?
कोण ते भेटले तुला नवे कधी कसे?

ऐक ना! तुझ्याविना सर्व येथे सुने;
पाखरे न बोलती राहती उगा घुमे

भांडणास आपुल्या सोड ना अता जरा
अंथरून जीव हा वाट पाहते धरा...

हे तेवढे बरे झाले

हे तेवढे बरे झाले
शाप सारे खरे झाले

चंद्र असता रात्र काळी!
चांदणे घाबरे झाले

दोष माथी कुंपणाच्या
वादळाचे बरे झाले

खेळ होता जीवघेणा
मरणही साजरे झाले

बदलले काहीच नव्हते
ऋतू का हासरे झाले?

मोगरा बहरून आला
दारही लाजरे झाले

चित्र

रमणीय तळं
त्यात फुललेली विविधरंगी कमळं
भोवताली गर्द वनराई
बागडणारे पक्षी-बिक्षी
सगळं कसं एखाद्या सुंदर चित्रासारखं
खरं म्हणजे
ते तळं बिळं, सुंदर चित्र;
ते तसं नसतंच.
तो असतो वर्षभर साचून राहिलेला पाऊस,
आणि
त्यावरच पोसली गेलेली आजूबाजुची हिरवळ
ओघानेच जमणारे प्राणी पक्षी वगैरे.
उन्ह बोलवायला लागली की नादावूनच जातं हे तळं
वाफ होऊन का होईना बाहेर पडायला मिळणार म्हणून.
मग काहीच दिवसानंतर पाऊस होवून परतही येतं वेडं.

चित्र देखणंच दिसायला हवं!

मन चकव्याचे फूल

मन एक सान पक्षी
मन रानभर नक्षी
मन पिसारा पिसारा
मन मोठाच पसारा

मन भीती मन प्रिती
मन भुणभूण किती
मन आठवे साठवे
पुन्हा जुनेच नव्याने

मन कैरीची गं फोड
नाही कसलीच तोड
मन साजण साजण
गाली चढते तोरण

मन माय मन तात
मन सखीचा गं हात
मन जखम जखम
मन घालते फुंकर

मन भास मन त्रास
लक्ख उजेडाची आस
मन चकव्याचे फूल
देई पुन्हा पुन्हा हूल

--श्यामली

कवडसा

कधी कधी भल्या पहाटे अंगणात तर कधी थोडंसं उशिरा चहाच्या टेबलाजवळ भेटायचा. स्वैंयपाकघराच्या दाराच्या फटीतून येणारा तो इवलासा कवडसा. थंडीच्या दिवसात उबदार उन्हाची शाल घेऊन तांसतास घुटमळायचा अवतीभवती. माझं गुणगुणत त्याला न्याहाळणं चालायचं. उन्हं डोक्यावर आली की हा इथून थोडं सरकून पुढल्या घरात मग अंगणात मग फाटकाच्याबाहेर असं करत करत दिसेनासा व्हायचा.
कधी कधी रात्रीच पण करमायचं नाही बहुदा त्याला,चांदण्यांचं हसू घेऊन यायचा बऱ्याचदा.तेव्हा तर काय भरपूर रिकामा वेळ असायचा छान गप्पा व्हायच्या. तो त्याच्या प्रवासाबद्दल सांगायचा मीही बोलायचे काहीबाही.
घराची डागडुजी झाली, कुठेकुठे पडलेल्या फटी वगैरे बुजवल्या गेल्या, रंगबिंग देऊन झाला... मस्त वाटतंय नवं नवं...
कवडसा तेवढा हरवलाय मात्र!