थांबलो आहे खरा

थांबलो आहे खरा पण घेतली माघार नाही
वाकलो आहे जरासा जाहलो लाचार नाही

काय सांगू, बोलताना तोल जातोही अताशा
आणि मौनाचा कधी मी घेतला आधार नाही

काय प्रश्नाचीच येथे चालते बेबंद सत्ता?
उत्तरे मिरवील ऐसा एकही दरबार नाही?

बास आता फार झाले, वाट बघणे जीवनाची
मांडली माझी कथा मी, नोंदली तक्रार नाही

टेकवूनी लाख डोकी, पाय झाले जीर्ण पुरते;
आणि म्हणती, "सावळ्याला भावनेचा भार नाही!"

नित्यनेमे रोज दारी पालखी ये आठवांची
प्रेमभावे वंदितो मी, सोडला व्यवहार नाही

वादळाला सवय झाली सोबतीने चालण्याची
ते मुळी सोशीक आणिक; त्रास माझा फार नाही

7 comments:

a Sane man said...

व्वा!...गझल आवडली.

Shardul said...

ek number !!!

Kamini Phadnis Kembhavi said...

e sane man, shardul manpUrvka dhanywaad :)

Maahesh Deshmukh said...

तुमच्या ब्लॉग वरील २ गझल वाचल्या. त्यावर काही महिण्यापूर्वी कॉमेंट देताना काही नव्या गझल आहेत का असे विचारले होते...त्याचा हा संदर्भ आहे...

Kamini Phadnis Kembhavi said...

ओह! :)
नव्या गजला प्रोसेसमधे आहेत, पूर्ण झाल्या की इकडे टाकेनच लवकर

Gangadhar Mute said...

आज दुसर्‍यांदा वाचली.त्यामुळे जास्त आनंद मिळाला.
तुम्ही गझल कमी लिहिता पण ज्या लिहिता त्या एकदम मस्तच लिहिता.
आवडली गझल आणि ब्लॉगही.
Gangadhar Mute
http://gangadharmute.wordpress.com

Kamini Phadnis Kembhavi said...

अरे वा! माझ्या अनुदिनीवर तुमचं मन:पूर्वक स्वागत गंगाधरजी.

गझल कमी लिहिते म्हणजे ती मनासारखी जमेतोवर पूर्ण झाली आहे असं म्हणत नाही मी...मग रहातात पडून दिवसेंदिवस. आपल्याला माझ्या गझल आवडल्याचं ऐकून बरं वाटलं.आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद