झुबी डुबी झुबी डुबी पंपारा

समिक्षण वगैरे लिहायच्या भानगडीत मी कधी पडले नाही पडणारही नाही पण यातल्या काही प्रसंगांना आणि संवांदाना दाद द्यावी वाटल्यामुळे हा पोस्ट प्रपंच.

कथानक अगदीच दळलेलं असलं तरी यातले काही प्रसंग आणि पंचेस फार विचार करायला लावणारे आहेत असं वाटलं.
मुलांना सोबत घेऊन गेलो होतो त्यामुळे काही प्रसंगांचे खुलासे करावे लागले. इथे हे प्रसंग आवश्यक होते का असा विचार मनात येत असतानाच नव-यानी हे असलं सगळं असतच हॉस्टेलमध्ये म्हणून दुजोरा दिला त्यामुळे मनात आलेली एक शंकाही विरून गेली.

तिन्ही मित्रांचे असलेले एकेक प्रसंग सुरेख जमलेले आहेत. त्यातल्या त्यात खूपच भावलेले काही प्रसंग म्हणजे फरहान त्याच्या वडिलांची समजुत घालतानाचा. माधवनचा अभिनय आणि त्यावेळचे संवाद दोन्हीला चटकन दाद जाते पाणी येतं डोळ्यातुन. दुसरा आल इज वेल वाला...त्याचा आल इज वेल फंडा अगदी पटून जाणारा. शरमन जोशीच्या वडिलांना दवाखान्यात नेल्यानंतरचा. शरमनच्या आत्महत्येनंतरचे सगळेच प्रसंग.

हसवता हसवता चिमटा काढणं संवादातुन सहज साधलं गेलं आहे. स्वानंद किरकिरेची गीतं भाव खाऊन जातात.
निखळ मनोरंजनाचे तीन तास आपल्या पदरात पडलेले असतात. अजून बोनस म्हणून काही विचार करायला भाग पाडतो हा चित्रपट.

आमिर खान नेहमीप्रमाणे उच्चच...त्याचं दिसणं आणि चित्रपटात वावरणं त्याच्या लौकिकाला साजेसं.
एखाद्या हिंदी व्यवसायिक चित्रपटाकडून अजून काय अपेक्षा ठेवायच्या?

सिनेमा संपल्यावर आल इज्ज वेल किंवा झुबी डुबी झुबी डुबी पंपारा गुणगुणत तुम्ही बाहेर पडता. :)

चांदणशेला

ही कुठली शुभंकर वेळा; हा ऋतू कोणता आला?
कुणी देहावर पांघरला जणू हळवा चांदणशेला

ही नवीन वळणे आतूर.. गात्रांतून उठली थरथर
हे बावरलेले लाघव..त्या डोळ्यांमधुनी आर्जव
मौनाने पसरून बाहु टिपले हे हसरे मार्दव
आकाशी आनंदाने गहिवरला चांदणशेला

ही निशा जरी सरलेली.. ती नशा न ओसरलेली
हा भासांचा नाही घोळ.. वा स्वप्नांचाही खेळ
वचने अन आणा-भाका.. नाजुकसा  रेशिमधागा
ही सुंदर गंधीत ठेव.. गुणगुणला  चांदणशेला

पालवी

हे जे काही दिसतंय ना!  हे, आधी; कायम बहरलेल झाड असायचं म्हणे,
नेहमीच पाखरांच्या चिवचिवाटानी गजबलेलं असायचं
पांथस्थही विसाव्यासाठी टेकायचे घटकाभर
झाडही कौतुकानी न्याहाळायचं पाखरांची किलबिल;
पांथस्थांच विसावण...
अजून पुढे उरलेल्या अंतराची काळजी करणं
आणि; अगदी लगबगिनं उठून निघणसुद्धा!
...
काही दिवसांपूर्वी
अगदी उगाच,
उगाचच छाटल गेलं ते,
पार बुंध्यापर्यंत
आणि मग कसंसच दिसायला लागलं उघड-बोडकं; उदासवाणं
...
 वसंतात (खुरटीच) पालवी फुटलेली दिसली होती
पुढे काहीच दिवसात जेव्हा पक्षी पुन्हा घरट करायला आले बाजुच्या झाडांवर
तेव्हा त्या किलबिलाटानं एक फूलही उमललय म्हणे याच्या बुंध्याशिच!

बुक-मार्क

हातातल्या पुस्तकातली कथा रंगत चाललेली असताना लक्षात येतं ,
अर्ध्याच्यावर पुस्तक वाचून झालंय...
अरेच्चा शेवट जवळ आला की कथेचा.
च्च!! एवढ्यात नको ना शेवट व्हायला,
अजून जरा जास्ती असतं तर आवडेल वाचायला.
केवढी रंगलीये कथा!
त्यातली पात्र पण अगदी आपल्या मनासारखी वागतायत.
पुढचं पान उलटल..
हे काय अचानक वेगळ्च वळण घेतलं कथेनी.
हे अस नको ना व्हायला.
एवढी का गुंतत चालल्ये या सगळ्यामध्ये.
एक क्षुल्लक कथाच
ती काय वाचायची आणि सोडून द्यायची
पण असलं काहीतरीच का व्हायला लागलय?
पुस्तकात बुक-मार्क घालून ठेऊनच देऊया झालं...
कथेचा शेवट नकोच व्हायला.
नाहीतर लहान असताना परिच्या राज्याची स्वप्न पडावीत म्हणून करायचे तस पुस्तक पालथ घालून गादीखालीच ठेवू या का ?
का देवूनच टाकू कोणालातरी.?
"आपण नाहीच वाचला म्हणजे नाही झाला शेवट हाय काय नाय काय."
पुस्तकात बुक-मार्क घालून पुस्तक कपाटात पार तळाशी घालून ठेवलं,
आता नको तो शेवट वाचायची गरज नाही. होतं तसंच चित्र डोळ्यांपुढे कायम राहिल.
राणी, असा शेवट नाकारून कथानकं बदलतात का ?
"त्या" लेखकानी कधीच केलाय शेवट या कथेचा...
तू वाचलास तरी आणि नाही तरी...
...

दुबई............आहा!

दुबई............आहा!

पुन्हा एकदा बि-हाड हलवायची वेळ आली आणि आमचा कबिला दुबईत डेरेदाखल झाला. वाटलं काय बाहरेनसारखाच एक वाळवंटी प्रदेश. काय वेगळं असणार तीच ती सोन्याची दुकानं चकाचक रस्ते मोठ्या मोठ्या गाड्या वगैरे वगैरे. दोन वर्षापूर्वी दिवाळीसाठी म्हणून सगळे जावेकडे शारजाहला जमलो होतो तेव्हा थोडीशी झलक बघितली होती या दुबईची, खरं म्हणजे नव्हतीच आवडली.

घरी यायला निघालो दुबईच्या फेमस ट्रॅफीक जॅम मधे अडकलो, पुन्हा मन चुकचुकलं म्हटल हॅट इथे काही जमायच नाही आपलं. गाडी, शहर मागे सोडून आमच्या घराच्या दिशेनी धावायला लागली आणि मग मात्र आहा.. म्हणावस वाटेल एवढा सुंदर परिसर सुरु झालां. मी जरा चाचरतच विचारल इथे घर आहे आपलं नवरा मिश्कील हसला, नाही याच्या पुढे ..म्हटल एवढं लांब शहर तर मागे पडत चाललयं की! आपल्याला काय दुबईशी काही संबध नाही आपला आपल्याला बाहेरच घर हवंय...मी ह्म्म्म!

"ग्रीन कम्युनिटी" असा बोर्ड वाचला म्हटल ह्म्म विचारपूर्वक वाढवलेली हिरवळ आणि झाडं ती आपल्या नशिबात, व्वा क्या बात है! भारतातसुद्धा एवढी हिरवाई बघायला पार गाव सोडून लांब जावं लागतं आणि इथे मी राहणार! स्मित

इथे आल्यावर तर जामच खुष झाले, चांगलाच मोठा म्हणता येइल असा फ्लॅट दोनच मजल्यांच्या ईमारती आखीव अश्या टाऊनशिपमधे घर घेतलं होतं साहेबांनी.

दुबईपासून दूरच म्हणता येईल अशी ही टाऊनशीप चौ-याऐंशी ईमारतींचा प्रकल्प आहे. पण मला हे घर आवडल ते मुळात अरब देश असून इथल्या खुल्या माहौलमुळे सगळ्या देशांचे लोक एकमेकांमधे मिळून-मिसळून राहणारे.

बाहरेनमधे ड्रेसकोड वगैरे नसुनही आम्हा बायकांना एकट बाहेर जायला थोडंस त्रासदायकच वाटायचं. तिथल्या बायका पूर्ण अंग झाकणा-या कपड्यांमधे आणि आमचे कुठे दंड उघडे कुणाचे गळे मोठे. वाटायच आपण काही तरी नियमाचा भंग करतोय. वास्तविक तिकडे तसं काही कंपल्शन नव्हत पण विचित्रच वाटायच जरा.

इथली जनता बघितल्यावर हुश्श्य झालं मला एकदम.

........

शेंदूर..

त्याला पुजत असताना
डोळ्यांपुढे असणारी मुर्ती बऱ्याचदा तुझी असते,
कधी कधी तुझ्या आणि त्याच्यातल्या साम्याच आश्चर्य वाटत;
तो कायमच कृपाळू कनवाळू वगैरे;
वाटत तुही तसाच;
तसा फारसा फरक नाहीच दोघांमध्ये
पण कधी कधी मात्र जाणवत
त्याला शेंदूर लावल्याची जाण म्हणून येत असेल हाकेला धाऊन.
तूला मात्र हे असलं काही करायची गरज भासत नाही
तू तसाच असतोस
शेंदूर लावण्याच्या आधीच्या त्याच्यासारखा...

!!श्री गजानन मानसपूजा!!


संगीत: श्री. आशिष मुजुमदार
स्वर: सावनी शेंड्ये
!!श्री गजानन मानसपूजा!!

गणराज गणराज सिद्धीबुध्दीदाता
सकल दीनांच्या ऐकसी गाथा!!धृ!!

मनाची ऐसी शोभे आरास
येथेच स्थापिले गजाननास
मनीच वाहिले दूर्वा-फुलांस
शोधू कशाला गंध-गुलाला!!१!!

गणराज गणराज सिद्धीबुद्धीदाता

सुखदक्षणांचा नैवेद्य केला
स्पंदनांचा हा टाळ वाजला
जीवे ओवाळीले प्रथमेशाला
देहच अवघा प्रसाद झाला!!२!!

गणराज गणराज सिद्धीबुद्धीदाता

रे घना

अंथरून जीव हा वाट पाहते धरा
येथ मेघ येत ना; आर्त साद अंबरा

मार्गही तोच अन नेमही असे जुना
काय येथे तुला यायचे ना पुन्हा?

रे घना; सांग ना काय झाले असे?
कोण ते भेटले तुला नवे कधी कसे?

ऐक ना! तुझ्याविना सर्व येथे सुने;
पाखरे न बोलती राहती उगा घुमे

भांडणास आपुल्या सोड ना अता जरा
अंथरून जीव हा वाट पाहते धरा...

हे तेवढे बरे झाले

हे तेवढे बरे झाले
शाप सारे खरे झाले

चंद्र असता रात्र काळी!
चांदणे घाबरे झाले

दोष माथी कुंपणाच्या
वादळाचे बरे झाले

खेळ होता जीवघेणा
मरणही साजरे झाले

बदलले काहीच नव्हते
ऋतू का हासरे झाले?

मोगरा बहरून आला
दारही लाजरे झाले

चित्र

रमणीय तळं
त्यात फुललेली विविधरंगी कमळं
भोवताली गर्द वनराई
बागडणारे पक्षी-बिक्षी
सगळं कसं एखाद्या सुंदर चित्रासारखं
खरं म्हणजे
ते तळं बिळं, सुंदर चित्र;
ते तसं नसतंच.
तो असतो वर्षभर साचून राहिलेला पाऊस,
आणि
त्यावरच पोसली गेलेली आजूबाजुची हिरवळ
ओघानेच जमणारे प्राणी पक्षी वगैरे.
उन्ह बोलवायला लागली की नादावूनच जातं हे तळं
वाफ होऊन का होईना बाहेर पडायला मिळणार म्हणून.
मग काहीच दिवसानंतर पाऊस होवून परतही येतं वेडं.

चित्र देखणंच दिसायला हवं!

मन चकव्याचे फूल

मन एक सान पक्षी
मन रानभर नक्षी
मन पिसारा पिसारा
मन मोठाच पसारा

मन भीती मन प्रिती
मन भुणभूण किती
मन आठवे साठवे
पुन्हा जुनेच नव्याने

मन कैरीची गं फोड
नाही कसलीच तोड
मन साजण साजण
गाली चढते तोरण

मन माय मन तात
मन सखीचा गं हात
मन जखम जखम
मन घालते फुंकर

मन भास मन त्रास
लक्ख उजेडाची आस
मन चकव्याचे फूल
देई पुन्हा पुन्हा हूल

--श्यामली

कवडसा

कधी कधी भल्या पहाटे अंगणात तर कधी थोडंसं उशिरा चहाच्या टेबलाजवळ भेटायचा. स्वैंयपाकघराच्या दाराच्या फटीतून येणारा तो इवलासा कवडसा. थंडीच्या दिवसात उबदार उन्हाची शाल घेऊन तांसतास घुटमळायचा अवतीभवती. माझं गुणगुणत त्याला न्याहाळणं चालायचं. उन्हं डोक्यावर आली की हा इथून थोडं सरकून पुढल्या घरात मग अंगणात मग फाटकाच्याबाहेर असं करत करत दिसेनासा व्हायचा.
कधी कधी रात्रीच पण करमायचं नाही बहुदा त्याला,चांदण्यांचं हसू घेऊन यायचा बऱ्याचदा.तेव्हा तर काय भरपूर रिकामा वेळ असायचा छान गप्पा व्हायच्या. तो त्याच्या प्रवासाबद्दल सांगायचा मीही बोलायचे काहीबाही.
घराची डागडुजी झाली, कुठेकुठे पडलेल्या फटी वगैरे बुजवल्या गेल्या, रंगबिंग देऊन झाला... मस्त वाटतंय नवं नवं...
कवडसा तेवढा हरवलाय मात्र!

निरोप..स्वागत

जसा ओलांडला काल
तसा जाईल आजही
नाही उद्याची प्रतीक्षा
तो येईलही जाईलही


आता संपतच आलय वर्ष म्हणल्यावर द्यायचा त्याला निरोप, नाहितरी दुसरं काय हातात असतं आपल्या? वेळेला बांधु शकत नाही आपण केवढं मोठी गोष्ट आहे खरच. असं झालं असतं तर? कित्येक क्षण तसेच थांबवून ठेवले असते आपण पुढे गेलोच नसतो त्या क्षणाच्या. पण मग आज बघायला नसताच मिळाला! मजाच ना खरच तसं झालं असत तर.

वर्ष बदलतात महिने बदलतात पण आपण किती बदलेले असतो?
फार फरक पडलेला नसतो आपल्यामधे लिहिताना तारिख वार आणि उलटलेला काळ लक्षात ठेवायला बरं म्हणुन

..तरंग..

तुझी ओळख सांगत एकेक ओळ उमटायला लागली,
मी थांबले, हसले नुसतच....
थोडसं दुर्लक्षही केलं त्या प्रत्येक ओळीकडे.
भांबावल्या त्या ओळी जरा...
आश्चर्याने बघायला लागल्या माझ्याकडे!
एवढ्यात, पापणी लवली जराशी
अन्,
डहुळले गेले ते ओळीचे तरंग...
मनात क्षीण आनंद!
तुझी ओळख सांगत आलेल्या 'त्या' ओळी
माझ्या या कविते उमटू न दिल्याचा.