चांदणशेला

कॅप्शन जोडा
फेब्रुवारी २०१२ मध्ये मी लिहिलेल्या गीतांचा अल्बम प्रकाशित झाला. त्याचा हा इनले .
या अल्बमला संगीत शशांक पोवार यांच आहे तर स्वरसाज चढवला आहे हरिहरन, वैशाली सामंत, महालक्ष्मी अय्यर, बेला शेंडे, पं.रघुनंदन पणशीकर,जसराज जोशी आणि जयदीप बगवाडकर यांनी

चांदणशेला फेसबुक पेजलिंक https://www.facebook.com/chandanshela/

दिन आज भटकत राही


   

दिन आज भटकत राही का उगाच स्मरते काही?....
सांग ना....सांग ना
एकाच पावसाची का फिरून याद येई?
सांग ना...सांग ना
स्पंद माझा थबकतो रे ऐक सखया तुजविना
ऐक ना...ऐक ना

मी तुझ्यात हरवत असता; मज तिथेच भेटे कविता
रुणझुणतो श्रावण माझा चाहूल तुझी रे मिळता
गूज सारे आज वा-या पैल जाऊन सांग ना...सांग ना

क्षणी दाटे उरी हुरहूर; क्षणी नाचू लागती मोर
हे नवीन काही घडते या नभास बहुदा कळते
दो दिशातील अंतरांना सांधणारा बंध हा, ऐक ना...ऐक ना


संध्येच्या पारावरती





संध्येच्या पारावरती विस्कटले ऊन्ह जरासे
मग उगाच ऐकू येती दिवसाचे क्षीण उसासे

संध्येच्या पारावरती कल्लोळ अस्वस्थांचा...
काळोख दाटुनी येतो उजळल्या गत जन्मांचा

संध्येच्या पारावरती प्रश्नांची बैठक भरली
न्यायनिवाड्याआधी शिक्षेची सुटका झाली

संध्येच्या पारावरती चुकलेले हंबर कानी
मन शांतपणाचे त्याला घालतसे चारापाणी

संध्येच्या पारावरती प्राणाची धडपड नुसती
हा देह सुटेना अजुनी; नि:स्तेज तेवते ज्योती

 देहावर मोहरली रिमझिम सावरिया






देहावर मोहरली रिमझिम सावरिया
अधरावर गुणगुणली थरथर सावरिया

लगबग बघ न्यासांची
तगमग या श्वासांची
स्पर्श स्पर्श छेडती; राधा सावरिया
न्यासांना, श्वासांना साज दे सावरिया...
साज दे सावरिया

खोल खोल अंतरात
दीप चेतले कितीक
रात्र राही थांबुनी; आता सावरिया
चेतवल्या स्वप्नांना साद दे सावरिया...
साद दे सावरिया