October

पारिजाता (October)
अवघ्या काही तासांचं आयुष्य असलेल्या पारिजातकाच्या फुलाबद्दल कोणी काही बोललं तरी ती कविता वाटावी एवढं आकर्षण आहे या पारिजातकाच्या फुलाचं .
एवढं सुंदर, नाजूक, काहीच वेळेत कोमेजून प्रवास संपवणारं.

ऑक्टॉबर या चित्रपटाच्या लेटरिंगमध्ये स्पेलिंगमध्ये असलेल्या  O या अक्षरात नाजुक पारिजातकाचं फूल दाखवलं आहे .
तर हे पारिजातकाचं फुल सुरवातीलाच बोट धरतं तुमचं आणि गोष्ट सांगू लागतं शिवली आणि डॅनची.

लौकिक अर्थानं ही मुळीच प्रेमकथा नाही पण एका घटनेमुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्या डॅनला कसा मिळतो? स्वतःला शोधण्याचा त्याचा प्रवास कसा होतो ?

डॅन अगदी सर्वसामान्य असणारा एक मॅनेजमेंट ट्रेनी जो एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये इंटर्नशिपसाठी काम करतो आहे .  याला रोज देण्यात येणारं कुठलंच काम आवडत नाही तो एकही काम धड करू शकत नाही . आणि त्यामुळे त्याची रोज वेगळ्याच डिपार्टमेंटला बदली होते .
प्रत्येक काम करताना त्याचा कामचुकारपणा , बावळटपणा सहज दिसून येतो.  महत्वाकांक्षा आहे पण त्यासाठी जे कष्ट करायला हवेत त्याची काही गरज नाही किंवा ते करणं हा निव्वळ मूर्खपणा आणि वेळ घालवणं आहे असा याचा ठाम समज .

या उलट शिवलीचं पात्र उभं केलं आहे, संवाद असे फार नाहीतच या मुलीला.  शांतपणे तिला दिलेली कामं ती करत राहते .  अगदी छोट्या सिनमध्ये कोणाच्याही नकळत याला मदत होईल असं काम करून टाकते.  डॅनचा वेध घेणारी एखाद दुसरी चोरटी नजर हाच काय तो रोमान्स.

हॉटेलमध्ये टेरेसवर हे लोक पार्टी करत असतात आणि कठड्यावर असलेल्या दवामुळे शिवलीचा हात घसरतो आणि ती टेरेसवरून खाली पडते .

तिला दवाखान्यातनं  बघून आल्यावर डॅनला समजतं की पडायाच्या आधी शिवली, डॅन कुठंय ? विचारते आणि इथे डॅनच्या प्रवासाला सुरवात होते .

जगतेय का मरतेय अशा अवस्थेत असणाऱ्या शिवलीसाठी डॅनचं बदलणं.  त्याच्या मित्रांचं त्याला सपोर्ट करण.  शिवली, शिवलीची आई, बहीण, भाऊ, आपण निर्णय घ्यायला हवा आता, असं सारखं सारखं म्हणणारा शिवलीचा काका. व्हेंटीलेटरच्या  स्विचपासून काकाला लांब ठेव असं डॅन जिला बजावून सांगतो ती नर्स . अगदी सगळी पात्र सुस्थळी .

लेखक आणि दिग्दर्शकानी  एक सुंदर कविता उभी केली आहे .

फक्त तीन तास टाईमपास हवा असेल तर मुळीच बघू नका

कविता

कविता
ती यायची म्हणे रोज या कवितांच्या बागेत
तासंतास रमायची म्हणे
प्रत्येक कवितेजवळ थांबून विचारपूस करायची
हसऱ्या लाजऱ्या कवितांचं
फार म्हणजे फार
अप्रुप असायचं तिला
कितीतरी कवितांना कुशीत घेऊन
गोंजारत, थोपटत राहायची म्हणे
एखाद्या खळाळून हसणाऱ्या कवितेला
उगाच गुदगुल्या करून
स्वतःच खुसूखुसू हसायची
आणि अनेक गंभीर ,दुःखी कवितांमध्ये
बघायची वाकून वाकून स्वतःच प्रतिबिंब
पुटपुटायची ,
"विरून गेलेल्या स्वप्नांची कविता होत असते अशी "
...
गेले कित्येक दिवस ती फिरकलीच नाहीये इकडे
पण
त्या तिथे मागे बागेच्या कोपऱ्यात
नवीन कविता कोणी लावलीये ?

~कामिनी फडणीस केंभावी

तिनं जन्मायला हवं

तिनं जन्मायला हवं
तिनं जगायला हवं
तिनं शिकायला हवं
तिनं भक्कमपणे स्वतःच्या पायावर उभं राहायलाच हवं

आणि तिनं
रांधायलाही हवं
वाढायलाही हवं
तिनं सगळ्यांच्या नंतरच जेवायला हवं
उष्ट-खरकटं दुसरं कोण काढणार ?
आल्या गेल्याच दुसरं कोण बघणार ?
दुखल्या खुपल्या वेळेस हिनं घरात असायलाच हवं

बरं का,
तिनं देखणं दिसायलाच हवं
तिनं नीटनेटकं राहायलाच हवं
तिनं पुरुषाला सुखी ठेवायलाच हवं
तिनं वंशवेलीला वाढवायलाच हवं
तिनं घराण्याच्या अब्रुलाही  जपायलाच हवं
तिनं संगोपनही नेटकं करायलाच हवं
फक्त तिनं
हिशेब नकोच करायला
प्रश्न नकोत विचारायला
घरचे सांगतील ते सगळं सगळं तिनं ऐकायला हवं

पण , पण तिनं जन्मायला हवं तिनं जगायला हवं
तिनं शिकायला हवं
तिनं स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभं राहायला हवं

~कामिनी फडणीस केंभावी

पद्मावती

खिलजी #padamavati
संपूर्ण कथानक या नावानी व्यापलेलं असताना चित्रपटाचं नाव पद्मावती असं ठेवायची अवदसा  का सुचली असावी भन्साळीला ??
खिलजीवर कथानक लिहिलं असतं तर अजून धमाल आली असती. पदमावती च पात्र म्हणजे उगा तांबडा  रस्सा सोसेना खायला म्हणून डबल का मिठा खावा नंतर असं जरास वाटलं.

भन्साळी नी डिझाईन केलेला आणि रणवीर नी उभा केलेला खिलजी अक्षरशः वेड आहे .

एखाद्या स्त्रीच्या सौंदर्याच्या नुसत्या वर्णनानी एवढा वेडावून जाणारा आणि तिला मिळवण्यासाठी जमीन आसमान एक करणारा  एक योद्धा . कथानक काल्पनिक का ऐतिहासिक हा मुद्दा फारच गौण वाटला. एक स्वतंत्र कलाकृती म्हणून बघायला मला आवडलाच .

भन्साळीचे सिनेमे त्यातल्या वेषभूषेसाठी , सेट साठी , नृत्यांसाठी, संगीतासाठी बघायला आवडतात.

महाग बिहाग नाही नेहमीच्या रेट मधे तिकीट मिळालं 😀

G O T प्रभाव फार जाणवला . बाकी कोणाला  नाही  का जाणवला ? 🤔

खारुताई



या फांदीवर त्या फांदीवर
उड्या मारते खारुताई

कुठले उंबर नक्की खाऊ
पेच पडोनी लागे धावू

त्या तिथले फळ रसाळ दिसते
दडून बसते तिथेच माऊ

इकडे येती लुच्चे पोपट
संपवतील ते सारे पटपट

समोरचे तर खाऊन घेऊ
नंतर येवो पोपट माऊ
~~~

जात बोलते काहीबाही



जात बोलते काहीबाही
इतिहासाची फुटते लाही
आम्ही मोठे आम्ही जेते
दंड थोपटून तयार बाही
अमुचे पूर्वज गाऊ गाथा
कुणास वाटो त्राही त्राही
पेच भयंकर दुही दिसावी
नको घडाया  ऐसे काही
पुन्हा एकदा उलटू पाने
समजुन घेऊ ती शिवशाही

~कामिनी फडणीस केंभावी

घर

घर
या घरात वावरत नाही आताशा कोणी
तसं फार जुनं नाहीये घर खरंतर
काही दशकं; एवढच वय असेल घराचं
फार लाघवी आहे हे घर ,
घरात राहणाऱ्यानाच  नाही तर
जाणाऱ्या येणाऱ्या सगळ्यांना अगदी
घरातील  मोलकरांना सुद्धा
जीव लावायचं हे घर
...
काही वर्षांपूर्वी एक कवडसा खेळायचा घरात;
अलीकडे डागडुजी, रंगकाम झाल्यामुळे त्याचही  येणं थांबलच कायमच.
...
स्वच्छ  उन्ह वारा यावा म्हणून आवर्जून बसवलेल्या फ्रेंच विंडो बंद असतात आणि त्याच्या आत असणारे जाड दुहेरी पडदे देखील ओढून  घेतलेत या घरानी
...
या घराला स्मरत असतात साजरे केलेले अनेक उत्सव
घरातल्या सगळ्यांनी मिळून केलेल्या गमती जमती
त्या दोघांच्या एकांताचे अनेक सोहळे
त्याला बघाव वाटत त्या सगळ्यांना , बाहेरच्या जगाला पुन्हा एकदा;
नाही म्हणायला
स्वयंपाक घराच्या exhaust  फॅन च्या खिडकीतून या घराचा अतिशय लाडका लेकुरवाळा औदूंबर तेवढा दिसत राहतो
खूप मोठा झालेला .

~कामिनी केंभावी
४ डिसेंबर २०१७