कुर्ता

परवा कधीतरी चुकून तो कुर्ता ड्रायक्लीनला दिला गेला
सिल्क चा सुंदर गडद गुलाबी रंगाचा
आवडत्या स्टोर मधून घेतलेला
तो कुर्ता आवडायचा भयंकरच
जपायचे पण खूप त्याला
खास प्रसंगालाच वापरायचे
नंतर व्यवस्थित काढून जरास ऊन दाखवून
पुन्हा इस्त्री बिस्त्री करून जागेवर ठेवला जायचा
कसा दिला गेला की या रोजच्या कपड्यामध्ये ?
परत आला धोब्याकडून तर,
त्याच्या त्या सुंदर गडद गुलाबी रंगाची शेड बदलेली,
त्यावर ऑफव्हाईट दोर्यांनी केलेलं भरतकाम,
त्याचाही रंग बदलला आहे वाईट नाही दिसत आहे खर तर;
पण घालावा वाटत नाहीये आणि टाकावा वाटत नाहीये,
काय करायचं असत अशा वस्तुंच ?
अशा माणसांच ?
अं??

पुन्हा नव्याने

लिखाणात अक्षम्य खंड पडला आहे. कविता नाही गाणी नाहीत साधी चारोळी किंवा बाकी इतर बडबड सुद्धा नाही. काल शेजारच्या  काका काकुंशी बोलताना पुन्हा जाणावल, लिहायचं तर  लिहाव आपल्यालाच लागणार  आहे, दुसर कोणी लिहील तर त्याचा फायदा आपल्याला  कसा  होईल ? लिहिण्याचा रियाज हा कधी माझा फार आवडता वाक्यप्रयोग होता. मी अगदीच निष्काळजीपणे जो सोडून दिला होता.

दरवर्षी एक जानेवारीला अतिउत्साहानी  काहीतरी संकल्प करायचा आणि जानेवारी संपता संपता आरंभशूरतेच्या  किश्यामध्ये भर टाकायची या कारणासाठी संकल्प करणंही बंद करून टाकल होत, ठरवण बंद, वाचन बंद चर्चा बंद  एकूण काय सगळच बंद.

अजून एक जानेवारीला दोन दिवस बाकी आहेत खर पण तरी मी आजच हे इथे लिहिते आहे ,  हे लिखाण संकल्पाच म्हणता येईल  पण तसलं काही लेबल मला आज या लेखनाला लावायचं नाहीये.
आत्ता ठरवलं आणि लगेच इथे लिहिते आहे.

तर नव्यानी वाचनासाठी आणि  लिखाणासाठी माझ्या मलाच शुभेच्छा.

खूप लिहिणार आहे , रोज लिहिणार आहे.

आमेन


बैजु पाटिल- वाईल्डलाईफ फोटोग्राफर

http://vishesh.maayboli.com/node/1385
औरंगाबादमधल्या अनेकांनी औरंगाबादच नाव मोठ केलं आहे. त्यापैकीच एक नाव म्हणजे बैजु पाटिल. यंदाच्या मायबोली दिवाळीअंकासाठी वाईल्डलाईफ फोटोग्राफर बैजुची मुलाखत घेतली. अंक आज प्रकाशित झाला आहे. मुलाखत वाचून अभिप्राय नक्की कळवा

जरा स्पंदनांना सांभाळ राणी

स्वर:- जयदीप बगवाडकर




जरा स्पंदनांना सांभाळ राणी
ऐकेल कोणी अपुली कहाणी

इथे मी तिथे तू तरी भास होतो
कसा जीव वेडा तुझ्यापास रमतो
शहारुन फुलते पहा रातराणी
कशाची नशा ही सुगंधी सुगंधी
नाहीस जवळी तरी गूज कानी
सजे रात्र ऐसी तुझ्या आठवांनी

किती दूर झालो तरी ना विसरलो
चंद्रासवे मी तिथे रोज येतो
स्पर्शून घेतो तुला चांदण्यांनी

http://gaana.com/song/chandanshela/jara-spandanana-sambhala-rani-1220228

छाटणी

सुशोभिकरणासाठी म्हणा किंवा सावलीसाठी  म्हणा.   इमारतीच्या भोवताली लावलेली निरनिराळी झाडं, अशोकाची, कडूलिंबाची आणि  आगंतुकासारख त्यां बाकी झाडांच्याच ओळीत  मीही त्यांच्यातच म्हणून उगवलेल , त्यांच्या  बरोबरीन वाढलेलं औदुंबराच एक मुख्य झाड आणि त्याच्या संगोपनात वाढलेलं त्याच एक बाळ झाड.

ही झाडं लावताना कल्पना नसावी ,  की  एवढी उंच जातील ही झाडं, अगदी शेवटच्या मजल्याच्यांही वरती पोचतील.

आता काल-परवा म्हणे,  "अंधार व्हायला लागलाय.   फार कचरा पडतोय  पानांचा! "   एवढी वर्ष जाणवलाच  नव्हता ? खरंच? .
सरसकट सगळ्या झाडांची छाटणी झाली.
अशोक अगदी बुंध्यापर्यंत  आले.  कडुलिंबाच्या, औदुंबराच्या मधे  मधे येणा-या सगळ्या  फांद्या छाटल्या.
...
मागच्या बाजूच्या बैठ्या चाळीच्या परिसरातल सगळंच दिसायला लागलय
उन्हं भसकन घरात शिरायला लागली आहेत...
एवढ, असं थेट उन्हं झेलायची सवय गेलीच होती अलीकडे.
...