गोकुळवाटा

दोघेही तुडवित गेलो, त्या अवघड गोकुळवाटा
नात्याचा आपुल्या राधे भलताच इथे बोभाटा

राधा - कृष्ण हा एक अनुबंध.. प्रेमभावाची लोकविलक्षण गाथा.
युगानुयुगे अम्लान राहिलेली कथा.
शतकानुशतके हा कवींचा आवडता विषय राहिलेला आहे.
कुणी त्यात भक्ती पाहिली, कुणी प्रीती. कृष्णाची रासक्रीडा ही केवळ देहक्रीडा नव्हती तर तर ती एक भावलीला होती.
चित्त प्रसन्न करते ती राधा.. आणि चित्त आकर्षित करतो तो कृष्ण.
राधा कृष्णाची भक्त, प्रेयसी, सखी की याहून अधिक काही?
प्रेमाची अविरत धारा म्हणजे राधा....
ज्याचे ह्रदय कृष्णाचे त्याचीही एक कुणीतरी राधा असतेच आणि राधाह्रदयात कृष्ण असतोच.

राधा-कृष्ण या नात्याचा काव्यात्म वेध म्हणजेच गोकुळवाटा.
प्राध्यापक श्री. लक्ष्मीकांत तांबोळी यांचा 'गोकुळवाटा' हा काव्यसंग्रह म्हणजे राधाकृष्णाच्या नात्यातलं गूढ समजून घेण्याच्या ध्यासात कवीला सापडलेली अशी ही गोकुळवाट. कविता आणि त्या कवितांचं निरुपण असं वेगळंच स्वरूप. काव्यसंग्रहाची ही एवढीच ओळख पुरेशी. पण नुसत्या काव्यसंग्रहाचीच नाही, तर त्याहीपुढे जाऊन डॉ. पराग श्रीराम चौधरी यांनी सरांच्या शब्दांवर केलेले सुरांचे सुरेल संस्कार. आणि प्रत्येक कवितेचं सरांच्याच शब्दातलं निरुपण ऐकणं म्हणजे फार मोठी पर्वणीच.

'गोकुळवाटा' या नावातच संमोहित करण्याच सामर्थ्य आहे. कोजागिरीच्या दिवशी मला सापडलेली ही वाट तुमच्यापर्यंत पोचवायचा एक प्रयत्न. आजपर्यंत राधा-कृष्ण या विषयावर कित्येक प्रकारचे कार्यक्रम झालेही असतील, पण ही वाट आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जाते आणि आपण भानावर येतो तेव्हा नि:शब्द झालेलो असतो... "

कार्यक्रम सुरु होतो अर्थातच श्रीकृष्णाच्या लाडक्या बासरीच्या सुरांनी, आणि त्या सुरांची सोबत करत डॉ. पराग आणि त्यांचे सहकारी श्रीकृष्णाचं नामस्मरण करतात. हे संपत असतानाच तांबोळी सरांच्या निरूपणाला सुरवात होते "गोकुळवाटेवर चालणारे आम्ही, आपलं मन:पूर्वक स्वागत करत आहोत." इथे कृष्ण कसा हे सांगताना तांबोळी सर श्री वल्लभाचार्यांच्या ओळींनी सुरवात करत म्हणतात, "कृष्ण कसा? तर ज्याचं सगळंच मधुर आहे असा...." पहिल्या गीताच्या आधी ते म्हणतात "घरोघरी सत्यभामा, रुक्मिणी भेटतातच. भेटत नसते ती राधा. आपणापैकी कुणाला ती भेटली असेल तर तुम्ही भाग्यवान. नसेल तर मनातली राधा सांभाळावी, तिला बाधा होईल, असे काही करु नये. प्रेम असल्याचं रुक्मिणी किंवा सत्यभामा यांनाच पटवून द्यावं लागतं. राधेला त्याची गरजही नसते." पुढे ते म्हणतात, "तुम्ही आम्ही कोणी वेगळे नाहीत हो... अपुल्यातच असते राधा, अपुल्यातच असतो कृष्ण.. मन वृंदावन करण्याचा इतुकाच आपला प्रश्न..!"
व्याधाचा बाण लागल्यावर त्याला सत्यभामा किंवा रुक्मिणी आठवत नाहीत. त्याला आठवते ती राधा.. आणि तो म्हणतो... आपल्या सुमधुर आवाजात डॉ पराग इथे पहिल्या गीताला सुरवात करतात.

"फार उशीरा आलिस राधे रास येथला सरला
गोकुळातला कृष्ण तुझा तो पहिला नाही उरला
विजन जाहले कुंजवनाचे कदंब सुकले सारे
कृष्णाअंगी भरले आता कुरुक्षेत्रिचे वारे
नाचुन नाचुन मोर थांबले झडले सर्व पिसारे
काजळकिमया ओसरली ग डोहकाळिमा पसरे
उशीर झाला तुला राधिके, कृष्ण बुडाला डोही
मोरपीस हरवले कुठे ते, तोच शोधितो बाई"

राधा आली, पण तो कृष्ण? कृष्ण पहिला राहिलेला नाहिये, मोरपीस हरवलंय आणि त्या मोरपिसाच्या शोधात राधा हिंडतेय. यमुनातीरी वणवण भटकतीये. तो नाहीये पण तिला वाटतंय तो आहे, तो इथेच आहे, आणि ती म्हणते,
" यमुनातीरी घनवनराई
तेथे श्याममुरारी
राधेसाठी सदैव त्याच्या
ओठांवर बासरी
विरहविदग्धा व्याकुळ राधा
कृष्ण कृष्ण जपणारी..."

तर अशी ही कृष्णासाठी फिरणारी राधा ही एकच नाही अश्या गावोगाव असंख्य राधा आहेत राधाकृष्ण हा एक सहवासयोग आहे,"मीरेला ऐतिहासिक आधार तरी आहे पण राधा.... ही तर गाथांमधली, लोककथांमधली एक सर्वसाधारण स्त्री. प्रीतीची रीत मीरेकडून शिकावी की राधेकडून?" तर इथे राधेची सरशी होते आणि सर राधेबद्दल बोलताना म्हणतात "प्रेमाची अविरत धारा म्हणजे राधा! "
"प्रेमाचा अर्थ कळाया, लागते न जग धुंडाया" ते आपले आपल्यालाच कळते आणि गीत सुरु होतं..

"तू गाथेमधली राणी
यमुनेचे अवखळ पाणी
तू पाखरचोचीमधली
की तहान केविलवाणी?
मी दिले न काही तुजला
तू मागितलेही नाही
प्रेमाची तुझिया राधे
ही रीत अनोखी बाई!
प्रेमाचा अर्थ कळाया
लागते न जग धुंडाया
वृंदावन, गोकुळ अजुनी
येतील साक्ष ही द्याया"

पुढे राधेबद्दल बोलताना ते म्हणतात,"सार्‍या अस्तित्वाला मिटवू्न टाकून गोकुळमिठीत शिरायचे हे केवळ राधेलाच शक्य होतं. कृष्णाला भेटायला जाण्यासाठी राधा शृंगार करते, नटते-मुरडते, आणि हे सगळं बघण्यासाठी तिला आरशाची गरज भासतच नाही. ती कुठे बघत असेल? राधा आरसा बघत नाही, ती स्वतःला कृष्णाच्या डोळ्यात बघते. तिच्यासाठी आरसा कृष्णच आहे. अशी ही कृष्णमयी राधा.. तिच्या श्वासात कृष्णाचाच वावर.. पदर धरणारा, पदर ओढणारा, पदर उडवणारा आणि पदर धरून चालणाराही कृष्णच. कृष्णाभोवती फिरणार्‍या गोपिकांना गणती नाही. पण राधेचे काही औरच. कृष्णाला मिठीत घेण्यासाठी ती उत्सुक, त्याहून तिच्या मिठीत येण्यासाठी कृष्ण आतूर.... हे राधा ओळखून आहे. असा हा राधेचा पारदर्शी चांदणशेला....."

राधा म्हणते,
"डोळ्यांचा तुझिया ऐना
मी त्यात पाहते मजला
भाळावर झुलते बिंदी
मी त्यात जडविते तुजला
नि:श्वास श्वास हे माझे
नित त्यात तुझा रहिवास
खेळली न तसली कोणी
मी असा खेळले रास
तुजसाठी पैंजण पायी
तुजसाठी काजळ डोळां
भेटींस तुझ्या मी येते -
घेउनिया चांदणशेला"

राधाकृष्णाचे नाते मोठे लोकविलक्षण आहे आणि तितकेच मोहक. युगायुगांची प्रेमगाथा. दोघेही परस्परांचे आधार नि एकमेकांवाचून निराधार. 'गीत' आणि 'गीता' यात केवळ एका कान्याचा फरक पण केवढा मुळालाच हादरा बसतो! गीतात गुंतायचे की गीतेत अडकायचे -भोग की त्याग? संग की निसं:ग? कृष्णानी गीत गायले ते राधेसंगे आणि गीता सांगितली ती राधा नसताना... आता काय घ्यावे हे ज्याने त्याने ठरवावे.

संगीतात एक राग सारंग आणि त्याच्याच भिन्न प्रकारातील एक वृंदावनी सारंग.... ध्यास, वेड, तंद्री, नाद, छंद हे सारे मोठे गोड पण तितकेच ते जीवघेणे. बरेच दिवस झालेत आपली आणि राधेची भेट झाली नाही हे जाणवतं त्याला आणि तो म्हणतो..

भेटीस आपुल्या राधे
किती युगे लोटली सांग?
मी अजून आळवित बसलो
हा वृंदावनी सारंग!
तू कळी, देठ मी राधे
आधार कुणाचा कोणा?
फुलताना कधी न कळते
कळते पण ओघळताना
तू 'गीत' दिले मज बाई
मी केली त्याची 'गीता'
कान्हाच होऊनी 'काना'
गीतेत अडकला आता!

या आणि अशा अनेक कवितांमधून कधी राधेचं तर कधी कृष्णाचं स्वगत, सरांच्या शब्दांतून आणि डॉ. पराग यांच्या सुरांतून रेशीमलडींसारखं उलगडत जातं. आणि कळसाध्यायाची वेळ, शेवटी ती वेळ येतेच -निरोपाची.... डॉ. पराग भैरवी चे सूर लावायला लागतात, तर सर म्हणतात,"हातातली काठी सोडावी आणि मुरली घ्यावी.. गोकुळवाट आपोआप सापडत जाते"..

"योगेश्वर मी अखिलाचा
पण शरण तुला मी आज
हातात तुझ्यास्तव मुरली
हा मोरपिसांचा साज!
तू मला घुसळले राधे
अलवार कोवळे धागे
श्वासांच्या झुल्यावरती
हिंदळलो आपण दोघे!"

कार्यक्रम संपलेला. सगळेच प्रेक्षक संमोहित झाल्यासारखे तसेच बसलेले. आम्ही चौकशी करतो - पुन्हा कधी आहे हा कार्यक्रम?

वेळूबन गावोगावी
वृंदावन एकच असते,
काठ्या तर हातोहाती
मुरली पण एकच असते!

काव्यसंग्रह : गोकुळवाटा : प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी
संगीत/गायन : डॉ. पराग श्रीराम चौधरी
सौ. मीनाक्षी पराग चौधरी

या रचना प्रा.लक्ष्मीकांत तांबोळी यांची परवानगी घेउनच इथे उद्धृत केल्या आहेत. कुणाला या पुन्हा वापरायच्या असतील तर पूर्वसंमती आवश्यक
************************************************************************************

5 comments:

HAREKRISHNAJI said...

vaa, khupach surekh

Kamini Phadnis Kembhavi said...

धन्यवाद हरेकृष्णाजी :)

Meghana Bhuskute said...

far far surekh. ya karyakramachi kahi cassette wagaire milate ka?

Kamini Phadnis Kembhavi said...

sorry meghanaa blog var nivant aalech naahi tujhee comment aaja baghatye.

cd kadhaychaa praytna chalu aahet tyanche aani yashavant dev kahi gani karanar aahe as samajala aahe.

Kamini Phadnis Kembhavi said...

cassette ajun nahi kadhaley tyani..paN karykram hot asataat adhun madhun, aani tulaa havi asel tar mee cd pathu shaken (arthat siranchi ani Dr. parag yanchi paravangi gheun)