तिच्या पिलाकडे बघून राहून राहून वाईट वाटतंय. गळ्यात फास अडकवून घेताना नजरेसमोर एकदाही त्याचा चेहरा आला नसेल ? त्याचे विचार आले नसतील डोक्यात? एवढ्या अफाट जगात आपलं पिल्लू एकटं पडेल त्याच्याकडे कोण बघेल? परक्या देशात आहोत आपण आपलं बाळ काय करेल? हे आणि असले बरेचसे प्रश्न अजूनही मनात घोळतायत .
मी एवढे दिवस राहत असलेल्या आधीच्या अपार्टमेंटमधल्या आमच्याच ग्रुपमधल्या एकीने गळ्याला फास लावून घेतला.. हे ऐकताना ५० चेहरे तरळून गेले डोळ्यापुढे, नक्की कोण हे कळेपर्यंत सगळ्या मैत्रिणी दिसायला लागल्या , सहजच बोलता बोलता बोलून गेलेल्या मनात सलणाऱ्या एकेकीने सांगितलेल्या स्वतःच्या गोष्टी आठवल्या. पंधराच मिनिट लागली नक्की कोण ते कळायला. पण त्या पंधरा मिनिटातली ही अवस्था आणि कोण ते कळल्यावर विश्वासच बसेना.
ती..... एवढी हसतमुख आणि बडबडणारी, सारखी बिल्डिंगभर फिरणारी. मस्तपैकी ढोलक वाजवणारी, त्याच्या तालावर मनसोक्त नाचणारी. स्वतः: फारसं शिकलेली नव्हती पण आपल्या मुलाने खूप शिकावं स्वतः:ला जमत नसतील त्या गोष्टीत प्रसंगी शेजारणींची मदत घेऊन त्याचा अभ्यास घेणारी.
एवढं कायच झालं असेल तिला? काय डाचत असेल? कोणाशीही बोलाव असं न वाटता सरळ स्वतः:ला संपवण्याचा निर्णय घेण्यापर्यंत तिला काय त्रास होत असेल? एक ना अनेक प्रश्न डोक्यात गरगरतायत.
बरं हे सगळं करायच्या आधी मुलाला घेऊन बाहेर पार्किंगमध्ये फिरली, त्याच्यासोबत खेळली, बाकीच्या बायकांशी गप्पा मारल्या आणि नवरा काही कामासाठी बाहेर गेला तेवढ्या वीस मिनिटात सगळा खेळ खलास.
कोणी म्हणतं दोघांच पट्त नव्हतं, कोणी म्हणत तिला भारतात जायच होतं, कोणी म्हणत त्यांचा बराच जुना प्रॉब्लेम होता, माणूस अतिशय चिक्कू आहे पैसा द्यायचा नाही, तिला घरी पाठवायचा नाही, वागणं नीट नाहीये त्याचं. हे असं असताना , बाई नवऱ्याची काळजी घ्यायला विसरली नव्हती;जाताना चिट्ठी सोडून गेली "माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाहीये" .
"माझी आई कुठय?" असं विचारल्यावर, त्या पाच वर्षाच्या बाळाला " तुझ्या आईला दवाखान्यात नेलय; हे खोटं सांगताना; माझ्या बाकीच्या मैत्रीणिंची काय अवस्था झाली असेल ही कल्पनाही करवत नाहीये. ज्यांनी तिला लटकताना बघितलं त्यांची तर त्याहूनही वाईट अवस्था .
ही बातमी ऐकल्या ऐकल्या प्रत्येकाने तिला शिव्या दिल्या, हे काय असलं वागणं म्हणून, पण मला राग नाही आला, वाटलं , किती सहन केल्यावर या निर्णयापर्यंत आली असेल ती.
अजूनही सुटका नाहीच झालेली तिची. सगळ्या औपचारिकता पूर्ण होईपर्यंत अजून ४-५ दिवस लागणार आहेत. घरचे कोणीही येउ शकत नाहित. ही अजूनच वाईट गोष्ट.
जीव गेला तरी देहाचे भोग संपलेले नाहियेत .
4 comments:
बापरे...फारच भीषण
का केलं असेल तिने असं?
आणि इतक्या दूर देशात मुलाला असं एकटं मागे ठेवून जाववलं तरी कसं?
अगदी काहीही झालं तरी मुलाची माया ही प्रथम असते नं आईसाठी? निदान असावी .
हं...का हाच तर आम्हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे.
वाईट झाले
Post a Comment