तुझ्या इच्छेविना देवा माझे बापुडे साहस!

Hariharan ji and me while recording my song
२ जानेवारी , मेलबॉक्समधे एक मेल येऊन पडली, सिंगरहरी अशा नावानी आलेली. म्हटल काय स्पॅम असणार जाऊच द्या. मग अचानक आठवल की, अरे महिनाभरापूर्वी आपण हरिहरन सरांच्या मॅनेजरला गाण्यासाठी मेल टाकली होती. त्यांच उत्तर आलं की काय चक्क!!!!!
येस्...तीच मेल होती, अमुक तारखेला, दिलेल्या पत्त्यावर त्यांच्या स्वतःच्या(च) स्टुडिओमधे रेकॉर्डिंग असेल. अग्ग्ग्ग्ग्ग बाब्बो! जागी आहे का मी नक्की? नक्की हे वाचतेय का?
समोर दिसत असुनही मला हे अजिबात खरं वाटेना, लगोलग पुन्हा लताजींना* फोन लावला, की तुमची मेल आली आहे, त्यांच उत्तर हां जी, दो दिन पहेलेही मैने मेल भेजा था आपको. (च्यामारी त्या ३१डिसेंबरच्या सिलेब्रेशनची) मी दोन दिवस ऑफलाईन असल्याचा माझा मलाच राग आला.
त्यानंतर पुन्हा सगळं पहिल्यापासून पुन्हा, पुन्हा वाट बघणं, पुन्हा आशा-निराशा, होतय का नाही ? उलघाल नुसती. सलग तीन्-चार दिवस लताजींना फोनवर पिडणं, त्यांनी रोज, आपकी डेट मेल कर दुंगी इतनी फिकर मत किजीये, म्हणून सांगण्...हुह!
तर झालं असं की मी लिहिलेल्या गीतांच्या अल्बमच काम चालू आहे, एक गाण असं जमून आलं की ते ऐकताना स्टुडिओत असणारी मंडळी "अरे क्या बात है! इसके लिये तो कोई उस्तादही चाहिये... " अ ओ, आता काय करायचं आणि आता या गाण्यासाठी सुचवलेली नावं ऐकून हे गाणं रद्द करावं लागतय की काय, असही वाटून गेलं.
काहीतरी नवीन, काहीतरी नवीन म्हणत मी भलत्याच तिढ्यात अडकले होते. या गाण्यासाठी सुचवलेली नावं ऐकून झोप उडाली होती. शेवटी धीर करुन शशांकशी बोलले, त्यानी फोन नंबर्स दिले आणि हा वरचा प्रवास सुरु झाला.
काल साधारण सकाळी साडे-दहाच्या सुमारास आम्ही चांदिवलीत असणा-या त्यांच्या स्टुडिओत पोचलो. धाकधुक-धडधड्-पोटात गोळा, सगळं जे काय होत असत ते सगळं एकाच वेळेला होत असल्यावर काय होत असेल माणसाच? मेले नाही एवढच खरं स्मित
स्टुडिओत बसून काही कप चहा पोटात ढकल्यावर जरा नॉर्मलला आले बहुतेक. शशांकनी* ट्रॅक सेट केला, दोन्-तीन वेळा आम्ही ट्रॅक पुन्हा ऐकला. शब्दांवरुन नजर फिरवली, सर कधीही येतील असं तिथल्या साऊंड इंजिनिअरनी सांगितल्यामुळे नजर दरवाज्याकडेच आणि उगाच मग रिकाम्या स्टुडिओचे फोटो काढ, इकडे बघ तिकडे बघ, सायलेंट वर टाकलेलां फोन ५० वेळा उचलून बघ, मेसेज करुच का सगळ्यांना? अरे मला हे सगळं लवकरात लवकर सांगायच आहे...काढून झालेले फोटो पुन्हा पुन्हा बघून झाले....आणि आहा....दरवाजाच्या काचेतुन हरिहरन येताना दिसले. अगदी तुमच्या माझ्यासारखा साधा पोषाख निळी जिन्स त्यावर साधासा शर्ट, एखाद्या तपस्व्या सारखे लांब केस चेह-यावर असणरे शांत भाव...आम्ही दोघ ताडकन उभे राहिलो..आपोआप घडणारी गोष्ट, आवर्जून काही करावच लागल नाही एकामागे एक दोघही जण त्याच्यापुढे वाकलो, अरे ऐसा मत करो रे... स्मित
हं! चला ट्रॅक सेट केला का तुम्ही? शब्द सांगता का मला; मी लिहून घेतो.....अग्ग ग्ग! अरे किती वेळा मरु? मी हळूच पर्समधला गाण्याच्या प्रिंट्-आउटचा कागद काढून त्यांच्यापुढे धरला. गडी खुश...अरे वा! तुम्ही तर तयारीत आहात एकदम! चला ट्रॅक ऐकू या एकदा...
साहेब रेकॉर्डिंग रुममधे पोचलेसुद्धा होते...शशांक तुला मी कसं गायला हवं आहे? जसंच्या तसं देऊ का? का मी काही अ‍ॅडिशन केल्या तर तुला चालणार आहेत? शशांक गार... एवढा मोठा गायक, आणि एवढी लीनता? उगाच मोठे होत नाहीत लोकं खरंच त्यासाठी अंगभूत मोठेपणा असावाच लागतो.
गाणं सुरु करायच्या आधी त्यांनी आवर्जून सांगितलेली गोष्ट इथे सांगायला आवडेल, अरे तू मेल मधे पाठवलेला ट्रॅक मी प्ले केला तर मला वाटल तुम्ही लोकांनी चुकीचाच* ट्रॅक पाठवला मला बहुतेक स्मित
आमच्याशी बोलताना मुद्दाम मराठीत बोलत होते, त्यांच्या माणसांशी मल्याळममधे बोलत होते, मधेच कोणाचा फोन आला तर उर्दू अ ओ, आता काय करायचं सगळंच अगदी सुशोभीत. (मी पुन्हा एकदा, उगाच मोठी होत नाहीत माणसं)
डबिंग सुरु झालं, मुखडा फायनल झाला, गाण पुढे सरकलं, गाता गाता मधेच एके ठिकाणी, शशांकला "अरे काय गोड केलंयस रे हे!" ही अशी उत्स्फूर्त आलेली दाद पण... ऑ!!!!! गोड??? तुमच्या आमच्यासारखं मराठी...कधी शिकत असतील हे असं सगळ?
गाण्यातली एक ओळ, हाय कैसी ही कळा? अशी आहे, आणि कैसी च्या कै चा उच्चार उर्दूकडे जात होता, मी उठून शशांकपाशी आले ते सांगायला तर हे गायचे थांबले आणि विचारलं, ठीक चालल्य ना सगळ? मी चाचरत म्हणाले सर ते कै चा उच्चार जरा....." अरे यार, हां मै उर्दू मे घुस रहा हु" "चलो टेक फॉर कैसी" अ ओ, आता काय करायचं एवढ सहज!!!!
क्रॉसलाईनला सारंगी आहे ट्रॅकमधे आणि तिथे आलाप घ्यायचा होता, त्यांनी आलाप घ्यायला सुरवात केली, एक आलाप एवढा कातील दिला त्यांनी की शशांक पुटपुटलाच ,सारंगी गेली..., स्पिकरमधुन लगेच आवाज, हा आलाप नको थांब; मी दुसरं देतो काहीतरी....त्या सारंगीची ब्युटी आहे या इथे; ती नको जायला (अहो मनकवडे की काय तुम्ही?)
अवघ्या दिड तासात गाण्याच डबिंग संपल. गाणं पूर्ण होऊन आमच्या हातात. झालं ना तुम्हाला हवं तसं, म्हणत माणूस इतर कामांकडे वळला, काही बदल करायचा असेल तर सांगा मी आहे इथे, करता येईल.
अजून किती तरी आहे सांगण्यासारखं...पण आता थांबतेच स्मित
गेल्या ६-७ वर्षापासून आयुष्यात काही घडलं की लहान मुलासारखं मायबोलीवर येऊन सांगायची सवय लागली आहे. अजून अल्बमच रिलीज वगैरे फॉर्मेलिटिज बाकी आहेत. पण ही आयुष्यातली खूप मोठी गोष्ट इथे सांगितल्याशिवाय राहवेना.
*लताजी: हरिहरनच्या मॅनेजर
*शशांक पोवारः अल्बमचे संगीतकार
*या गाण्याचा सरप्राईज एलिमेंट
वरच्या फोटोत हरिहरन साहेबांना सगळ्यांनी ओळखल असेल, कदाचित मलाही ओळखल असेल स्मित तिसरी व्यक्ती अल्बमचे संगीतकार शशांक पोवार आहेत.


का पुन्हा पुन्हा हा जीव इथे घुटमळतो?
जणू प्राणच माझा शब्दातुन दरवळतो
या शब्दांचे हे अजब लाघवी नाते..
हातास धरूनी; मज समेस घेऊन येते
~श्यामली



2 comments:

Unknown said...

Khupach chaan vatala vachun , abhinandan.

Kamini Phadnis Kembhavi said...

मन:पूर्वक धन्यवाद निखील दाते