आर्मेनिया - ५ माउंट अरारात, हालीद्सोर






माउंट आरारात
हा खर तर आमचा पर्वत आहे. आमचा देव आहे तो. या तुर्की लोकांनी आमचा देव घेऊन टाकला आहे त्यांना त्याच्याशी काही घेणंदेणं नाहिये पण आता आम्हाला काही करता येत नाही आम्ही इथुनच बघतो त्याला, अगदी रोज बघतो, आम्हाला आशा आहे की एक दिवस तो आमचा आम्हाला परत मिळेल. या माउंट अरारातची गोष्ट, आमचा ड्रायवर अर्मेन आम्हाला सांगत होता. हा आमचा आरारात ज्याचा बायबलमधे पण उल्लेख आहे. " आमच्या ख्रिस्ती धर्मात एवढा महत्वाचा असलेला हा पर्वत घेऊन हे लोक काय करणार आहेत?" असा अतिशय भाबडा प्रश्न आमच्या अर्मेनला पडला होता. अर्मेनियामध्ये फिरताना अगदी सहज कुठुनही हा पर्वत तुम्हाला दिसत राहतो. याबद्दलच्या अनेक गोष्टी ऐकायला, वाचायला मिळाल्या.
हालीद्सोर
येरेवानवरुन हालीद्सोरला जायला आमच्याकडे वाहन नव्हत. आम्हाला विमानतळावर घ्यायला आलेली टॅक्सी इकडे एवढ्या जास्त अंतर असलेल्या प्रवासासाठी नेण्या एवढी मोठी नव्हती. म्हणून टॅक्सीची शोधाशोध सुरु केली. आमच्याकडे लोकल सिम नव्हत त्यामुळे कॉलटॅक्सी आम्हाला उपलब्ध होऊ शकणार नव्हती. जी काही शोधाशोध, सोय करायची होती त्यासाठी फक्त व्हॉट्सॅप आणि आमच्या होमस्टेचा मालक एवढी दोनच माध्यमं उपल्ब्ध होती. मालकानी हात वर करुन आपली जबाबदारी संपवली होती. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप हा एकमेव आधार उरला होता त्याच्या आधारानीच आता प्रयत्न करायचे होते. सकाळी तर हालिद्सोरला जाण्यासाठी निघायला हव होत आणि रात्रीचे साडेआठ झाले तरी आमच्याकडे अजून वाहन नव्हत. मग व्हॉट्सअ‍ॅपवर हालिद्सोर्च्या रिसोर्टशी संपर्क केला. तिथल्या मॅनेजर्/मालक यांनी आमच्यासाठी आमच्या पुढच्या मुक्कामाला पोचवण्यापर्यंत मोठ्या टॅक्सीची सोय केली. हुश्श!!!
येरेवान ते हालीद्सोर हा साधारण चार तासांचा रस्ता आधी खडकाळ दूरवर दिसणारा अरारात मधेच दिसणारी लाल पिवळ्या डोंगरांची रांग आणि मग रस्ताच्या दुतर्फा दूरवर पसरलेला बर्फच बर्फ . अधेमधे पास होणारी एखादीच कार एखादी बस एखादी ट्रक. लहानमुलासारखं बर्फ बर्फ करत वेड लागायला लागलं होतं. मधेच एक बस आम्हाला ओव्हर्टेक करुन पुढे गेले ड्रायव्हर काकानी सांगितल इरान इरान , म्हणजे ही बस इराणला चालली आहे. वॉव!! मला त्या बसच्या मागोमाग इराणलाच जाऊ वाटायला लागलं होतं
येरेवानला पोटभर नाश्ता करुन निघालो होतो आणि वाटेत कुठेतरी काहीतरी खाऊया असा विचार होता पण इथे दूरवर माणूस नजरेला पडायला तयार नाही आणि हॉटेल्स कुठली दिसायला. मग पोटाला धीर देण्यासाठी सकाळी येरेवानला नाश्त्यासाठी उकडेली अंडी आणि ब्रेड उरला होता तो ब्रेड आणि अंडी सोबत आणली होती त्याचे थोडे थोडे घास खाऊन झाले पण काही केल्या रस्त्यावर एकही हॉटेल म्हणून दिसेना. हा ड्रायवर अजिबात इंग्लिश न येणारा होता. त्याला किती तरी वेळा फुड फुड करुन विचारुन झालं होतं तो नुसतीच हो हो अशी मान हलवायचा आणि गाडी चालवायचा. पेट्रोल स्टेशन जवळ आपण खाणार आहोत असं खाणाखुणा आणि पेट्रोल स्तेशन या शब्दावरुन् त्यांनी आम्हाला सांगीतलं तेवढ समजल. पेट्रोल स्टेशन जवळ एक सुपरमार्केट आणि त्याला जोडून असलेल छोटस रेस्टॉरेंट होतं जिथे काहीच मिळत नव्हत. फ्रोजन पिझा फ्रोजन बर्गर आणि फ्रोजन सँडाविच असा प्रकार होता. आम्ही काय खाल्ल तिथे हे मला अजिबात कळलं नव्हत त्यामुळे सांगताही येणार नाही. मजल दर मजल करत आम्ही हालीद्सोर ईको रिसोर्टला एकदाचे पोचलो
हालिद्सोर हे एक दरीत वसलेलं छोटस खेडं आहे . इथली लोकसंख्या जेमतेम सात आठशे एवढी. इथे जायची खरतर गरज नव्हती पण इथे असलेल्या ईको रिसोर्टच्या प्रेमात पडून आम्ही जायच ठरवल. चारी दिशांना बर्फाच्छादित पर्वताना साद घालणारी ही लाकडाची छोटी छोटी कॉटेजेस खरोखर मोठी लोभस दिसत होती. आम्ही इथे पोचलो त्या दिवशी व्हॅलेंटाईन डे होता. येरेवानवरुन हा दिवस साजरा करण्यासाठी खास वेळ काढून आलेली काही जोडपी सोडली तर इथे दूरवर कोणी आणि काहीही नाही. इथे जो निसर्ग अनुभवला तो मात्र खरोखर आयुष्यभर मनावर कोरून ठेवला जावा असाच.
आम्ही हालीद्सोरला पोचलो तेंव्हा आकाश स्वच्छ होतं दिवसभरात झाडांवरचा बर्फ वितळून गेलेला होता. संध्याकाळ होत आलेली होती. या रिसोर्टच्या रेस्टॉरेंटाला चहा कॉफी घेऊ या म्हणून सामान कॉटेजमधे टाकून लगेच गेलो तर साडेसहाला तुम्ही जेवून घ्या आम्ही सातला किचन बंद करतो अस सांगण्यात आलं त्यामुळे तिथे काय आहे हे बघून ओर्डर केली. इथेही जेवणाची गम्मतच होती.
आम्ही मेन्युमधले पदार्थ वाचून हे आहे का ? हे आहे का? विचारत होतो. मालकीण आम्हाला हो म्हणत होती आणि कुकला विचारत होती तर ती रागराग तिला नाही नाही म्हणत होती. शेवटी हो नाही करत तिने कसला तरी भात, आणि चिकन सुप एवढ मिळेल म्हणून सांगितल. चला एवढ तरी मिळतय म्हणून आम्ही जे काही समोर आलं ते पोटात ढकलल. दोन दिवस झालेत आपण काहीच सॅलेड किंवा भाजी खाल्लेली नाही किमान सॅलेड ऑर्डर करु म्हणून सॅलेड ओर्डर केल. सॅलेड म्हणून कोथिंबिरिच्या काही काड्या, कांद्याच्या पातीच्या काही कांदे, शेपुच्या काही काड्या.
जेवण झालं तोवर अंधार पडला त्यामुळे बाहेर पडण्यात काही अर्थ नव्हता आणि इथे करण्यासारखं काहीच नव्हत. म्हणून आम्ही आपले आमच्या कॉटेजमधे आराम करायच ठरवलं. इकडे येताना अरेनी वाईनरी बघायला गेलो होतो तेंव्हा एक रेड वाईनची बाटली घेतली होती. बाहेर मायनस एक टेंपरेचर होतं त्यामुळे वाईनला योग्य तो न्याय देता आला. नुसत्या गप्पा आणि वाईन यात दिवस संपवला. रात्री कसल्या तरी आवाजानी जाग आली म्हणून पडदा सरकवून बाहेर बघीतल तर स्नो सुरु झाला होता . सकाळी आम्हाला तातेव मोनेस्टीला जाऊन पुढे दिलीजान गाठायच होतं त्यामुळे गपचुप पुन्हा अंथरुणात शिरले होते. पण बाहेर पडणारा स्नो दिसत रहावा म्हणून खिडकीवरचा पडदा जरासा सरकवून ठेवला होता, मग तो स्नो बघत पेंगले होते केंव्हातरी.
या हालीद्सोर गावाजवळ असलेल खास आकर्षण म्हणजे तातेव मोनेस्टी आणि या मोनेस्टीकडे आपल्याला घेऊन जाणारा मार्ग म्हणजे केबल कारचा. हा केबल कार रस्ता जगातला सगळ्यात मोठा रस्ता आहे. कितीही बर्फ असो,पाऊस असो ही वाहतुक नेमस्त वेळेत चालू असतेच. यातुन जाताना दिसणार दृष्य खरोखर नजरेच पारण फेडणारं होत.

आर्मेनिया - ४ लवाश आणि सुजुक

लवाश
अर्मेनियन पोळी / ब्रेड
रोजच्या जेवणासाठी लागणाऱ्या पोळी किंवा ब्रेड बाबत आपण भारतीय अतिशय नशिबवान आहोत असं मला आता वाटायला लागलं .
आपल्याकडे बहुतेक घरांमध्ये दोन वेळेला ताज्या पोळ्या केल्या जातात .
एवढंच पुरेसं नाही की काय म्हणून या पोळ्या करण्यासाठी आपल्याला अगदी माफक मोबदला देऊन मदतनीस उपलब्ध होऊ शकतात .
अर्मेनियन लवाश ( ब्रेड ) रुमाली रोटीसारखा दिसतो . तो अशा बेक-यांमध्ये बनवला जातो . बेकरी सरसकट सगळीकडे असेलच असं नाही . मग इतर सामानासोबत लवाश सुपरमार्केटमधून आणून. ठेवायचा तो दुसऱ्या दिवशीच्या नाश्त्यापर्यंत पुरतो .
लवाश बनवना-या अर्मेनियन सुंद-या
IMG_7614.jpg
IMG_7613.jpg
नाश्त्याला इथेही ब्रेड, अंडी , लोकल चिज , बटर , जॅम असच खातात . इथेही पनीरला पनीरच म्हटलं जातं . मात्र आपल्यासारखं भाजी करून न खाता पनीर नुसतं खाल्लं जातं .
सुजुक
IMG_7221.jpg
सुजुक आणि काही सुकवलेली फळं
आता लवाश म्हणजे पोळी हे डोक्यात बसलं. पण गेहार्ड ला मॉनेस्टी बघायला गेलो असताना तिथे बाहेरच्या स्टॉल्सवर विकायला ठेवलेल्या अनेक वस्तु काय आहेत हे कळायला मार्ग नव्हता . लाल , सोनेरी , डार्क ब्राऊन रंगाच्या माळेसारखं काही तरी दिसत होतं . मला वाटलं सॉसेजेस असावेत ( घोर अज्ञान ) त्या सोबत सोन्याचा भावअसलेल्या शुद्ध असं सांगितलं जाणाऱ्या aमधाच्या बाटल्या. त्या शेजारी रंगीत सुरळ्या रचून ठेवल्या होत्या .
कुतूहल म्हणून एका स्टॉलला थांबले भाषेशिवाय संभाषण सुरु झालं . सॉसेज सारख्या दिसणाऱ्या मालेतला एकेक मणी मला चव बघ म्हणून हातावर ठेवला जात होता . असे साधारण पाच तरी मणी माझ्या पोटात गेले होते अगदी पुसटशी गोड चव आणि पोटभरलेपणाची जाणीव होत होती .
आक्रोड + प्लम , आक्रोड+ डाळिंब , काळी द्राक्ष + आक्रोड . आक्रोड + मध अशा कॉम्बिनेशन मध्ये या मोठ्या माळा म्हणजे इथला एनर्जी बार होता. त्याच नाव म्हणजे सुजुक . आपल्याकडे लोणावळ्याला मिळणारी हरतऱ्हेची चिक्की आठवली मला .
पुन्हा लवाश
अर्मेनियामध्ये फळांची शेती खूप केली जाते .त्यात डाळिंब , द्राक्ष , सफरचंद , नीरनिराळ्या बेरीज भरपूर. या फळांचे घरोघरी जॅम तर बनवले आणि विकले जातातच पण त्या फळांची वाईनही घरा घरात बनवून विकली जाते .
फळांचा अजून एक पदार्थ म्हणजे लवाश , हो आपली फणसपोळी , आंबापोळी , पेरूपोळी यांची डाळिंब पोळी , प्लम पोळी, बेरीजची पोळी .
पाकसंस्कृतीमधली अशी साम्य बघून मजा वाटली .
प्लम लवाश , अ‍ॅप्पललवाश निर्निराळ्या बेरिजचा लवाश
सुजुक आणि निरनिराळे लवाश
IMG_7219.jpg
#Armenia #Lavash #food

आर्मेनिया - ३ येरेवान - टेम्पल ऑफ गार्नी

आर्मेनिया हा देश जगातला पहिला असा देश आहे जिथे ख्रिस्ती धर्म सगळ्यात पहिल्यांदा एखाद्या देशाचा धर्म म्हणून स्वीकारला गेला. अनेक पुरातन ख्रिस्ती धर्मस्थळ आणि त्यांची रचना हे या देशाच अजून एक वेगळ आकर्षण. जगभरातून अनेक लोक केवळ ही जुनी मंदिर बघायला इथे येतात त्याचा धर्माशी फारसा संबध नसावा अस जाणवलं.
पूर्वेला टर्की, पश्चिमेला जॉर्जिया उत्तरेला इराण तर दक्षिणेला अझरबैजान असलेला हा छोटासा देश. पूर्वी USSR चा भाग होता अजूनही इथली कित्येक छोटीमोठी गावं शहरं आपल्याला रशियामध्ये असल्याच भासवतात.
येरेवानमध्ये मुख्य शहर हे रिपब्लिक स्क्वेअरच्या आसपास आहे. या रिपब्लिक स्क्वेअरची भव्य वास्तू अतिशय देखणी आणि व्यवस्थित देखभाल केली जाणारी आहे. याच्या अगदी जवळ इथल अगदी प्रसिद्ध असलेल ओपन मार्केट/फ्लीमार्केट आहे. आपल्याकडे जसा बाजार असतो तस इथे रोज भरणारा बाजार असतो पण तो फक्त इथे हस्तकलेतून निर्माण होणार्या आणि इथेच तयार होणा-यां निरनिराळ्या वस्तूचा असतो. इथे एकाच ठिकाणी आपल्याला अनेक वस्तू विकत घेता येऊ शकतात. स्थानिक लोक इथे अजिबात खरेदी करू नका अस सुचवतात पण आपण स्वाभाविकपणे इथे खरेदी करण टाळू शकत नाही. (शेवटच्या दिवशी खरेदी केली ती नंतर ;) )
टेम्पल ऑफ गार्नी - इथे असलेल हे जे देऊळ आहे ते ख्रीस्तपुर्वकाळातील रोमन वास्तू आहे . डोंगराळ भागातल्या विस्तीर्ण पाठारावर हे देऊळ आहे. आजूबाजूला बर्फाच्या दिवसात बर्फाळ पर्वत रस्ते त्या पार्श्वभूमीवर हे देऊळ अतिशय देखण दिसत. इथे असलेली कमालीची स्वच्छता नजरेत भरल्याशिवाय राहात नाही.
IMG_7093.jpg
IMG_7113.jpg
IMG_7080.jpg
ही आज्जी एवढ्या थंडी वा-यात अशा दुर्गम परिसरात स्वतः हातानी केलेल्या बाहुल्या विकत होती. हिला चेन्नई आणि मुंबई माहित होतं. ही एका गाण्याच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भारतात येऊन गेली होती त्यामुळे तिला भारतीय लोकांबद्दल विशेष प्रेम आहे असही तिनं आम्हाला सांगितल.
IMG_7107.jpg
या देवळाच्या मागे दुरवर पसरलेल्या पर्वतरांगा दिसत आहेत.
या देशाच अजून एक वैशिष्ठ म्हणजे इथल्या किमान तापमानामुळे निरनिराळ्या प्रकारची वाईन, स्कॉच, व्हिस्की , कोनियाक अतिशय मुबलक प्रमाणत कुठेही अगदी सुपरमार्केटमध्येपण मिळते आणि कुठेही बसून ती पिता येते. त्याचप्रमाणे सिगारेट पिणं ही देखील इथे अतिशय आम बात आहे (हा खास एपिसोड येतो आहेच ;) . नो स्मोकिंग झोन आपले आपल्याला शोधावे लागतात.
केवळ भारत आणि आखातातच वावरल्यामुळे या दोन गोष्टींच जरा आश्चर्य वाटण स्वाभाविकच.
#Armenia #YEREWAN #TEMPLE_OF_GARNI

अर्मेनिया - २ राजधानी येरेवान

येरेवानच्या झावान्तोर एअरपोर्टवर पोचलो व्हिसा आदी प्रक्रिया होऊन बाहेर यायला साधारण पाऊण तास लागला. आम्ही आधीच कॅब सांगितलेली होती पण ती आम्ही पोचलो तरी अजून आली नव्हती त्यामुळे त्याला फोन करणे त्याची वाट बघणे आदी घोळात तिथे सीमकार्ड घ्यायच राहून गेल आणि लोकल सीम नसल्यामुळे पुढे अनेक अडचणींचा सामना करावा लागला ते पुढे त्या त्या वेळेला येईलच.
दोन्ही मुलाना हॉटेल मध्ये राहायचं नव्हत त्यामुळे बुकिंग सगळी होमस्टेमध्ये केली होती. आता येरेवानला आम्ही आमच्या राहण्याच्या ठिकाणी पोचलो ती वास्तू अतिशय सुंदर अगदी नदीकाठाला असलेल्या छ्प्ट्याश्या टेकडीवर होती . कुकिंगरेंज पासून वाशिंग मशीन पर्यंत सगळ्या गोष्टी होत्या.पण आयत्या जेवणाची सोय नव्हती. तर जेवणासाठी लगेच बाहेर पडण आणि जेवण आत्ताच्या घटकेला गरजेच होत. ड्रायवरनी मगाशी आम्हाला सोडताना सुपमार्केट आणि रेस्टॉरेंट दाखवल होत त्यामुळे आम्ही चौघ लगेचच बाहेर निघालो. टेकडीवर अजून वर चढून आल्यावर मग त्या परिसरातला मुख्य शहरी भाग सुरु होत होता. त्यामुळे काही पाय-या चढून उतरून मग आपण मुख्य रस्त्यावर येऊ जाऊ शकणार आहोत याची मनानी नोंद घेतली.
रेस्टॉरेंटमधे एक आज्जी एकटीच तिथे सगळीच काम करत होती. तिला अजिबात इंग्लिश येत नव्हत आम्हाला अजिबात अर्मिनियन येत नव्हत. आमच्या सारखा जेवायला आलेला एक माणूस धाऊन आला. त्याच्या मार्फत आम्ही त्या आज्जीला एवढ सांगू शकलो की आम्ही बीफ किंवा पोर्क नाही खाऊ शकत आम्हाला फक्त चिकन असलेले किंवा व्हेज पदार्थ चालतील. मग खाणाखुणा करुन आम्ही काहीतरी चिकन, भात, ब्रेड आणि दोन पदार्थांची नाव ओळखीची दिसली म्हंटल अगदीच काही नाही तर या दोन पदार्थांबरोबर जेवण होईल म्हणून ऑर्डर केली ते पदार्थ म्हणजे मुताब्बल आणि हमूस. भूक खूप लागली होती त्यामुळे अर्थातच सगळे तुटून पडले होते.
जेवण करून झाल्यावर मग जरा जवळ फिरून याव म्हणून बाहेर पडलो.
रस्त्यावरून फिरताना रशियन स्थापत्यकलेचा प्रभाव इथल्या वेगवेळ्या इमारतींवर दिसत होता. मोठ्या मोठ्या दगडी बांधकाम असलेल्या अनेक इमारती आमच लक्ष वेधून घेत होत्या.
हा येरेवानमधे आमच्या होमस्टेजवळ काढलेला पहिला फोटो
C83BC19B-8551-4EA7-A3EE-8C97EBD8E1E1 (2).jpeg
थोडस पुढे आल्यावर लवर्स पार्क नावाचा बराच मोठा पार्क दिसला त्याच्या अलीकडे मेट्रो स्टेशन होत. जवळपास कुठे तरी भटकून यायच ठरलच होत त्यामुळे आमच्या स्टेशन पासून रिपब्लिक स्क़ेअर एक स्टेशन सोडून पुढच स्टेशन आहे आणि तिथे मुख्य शहर आहे अस समजल होत. मेट्रोच तिकीट काढल आणी गम्मत वाटली आपल्या व्यापार किंवा लाईफ नावाच्या बोर्डगेम मध्ये असतात तशा प्लॅस्टिकच्या गोल चकत्या किंवा नाणी तिकीट म्हणून हातात आली होती ती त्या स्वयंचलित गेटला असलेल्या कॉईनबॉक्स मधे टाकायची आणि मेट्रो स्थानकात प्रवेश करायचा. ट्रॅकपर्यंत जाण्यासाठी स्वयंचलित जिना होता याची सवय आहेच पण हा जिना चक्कर येईल एवढा खोल जात होता. परत याच स्टेशन वर येता याव म्हणून स्टेशनच्या नावाचा फोटो काढून घेतला होता.
रिपब्लिक स्क़ेअरला खरोखच माहोल मस्त होता एकदम. एकतर त्या सगळ्या भव्य ऐतिहासिक वास्तू बघायला खूप मजा येत होती . त्यात व्हॅलेंटाईन डे चा आदला दिवस होता. इथे एकदम राष्ट्रीय सण असल्यासारखा वातावरण होत. सगळीकडे लाल हृदयाकृती फुगे गुलाब आणि अनेक आकर्षक वस्तू लावून सजावट केलेली दिसत होती. सगळी गम्मत बघत आम्ही नुसते चालत सुटलो होतो.