सणकन जावा जीव

सणकन जावा जीव
आता आहे आणि आता नाही अस व्हावं
दिव्यातल्या वातीसारखं नाही,
कापरासारखं जळावं
अलगद विरून जावं जळता जळता आसमंतात
अगदी राखही उरू नये मागे
तेवढीही खूण नको,
जगलो होतो आपणही
हीही जाणीव नको

श्यामली

कधी जमणार?

चालताना तारेवर
तोल राखणं
डावीऊजवीकडे न झुकता
सरळ चालणं
कधी जमणार.....?

वाहताना कवीतेतुन
शब्द सांभाळणं
आणि व्यक्त होताना
अव्यक्त राहाणं
कधी जमणार.....?

जगताना आयुष्य
अपेक्षा ठेवणं
आणि उपेक्षा झाली की
निरपेक्ष दाखवणं
कधी जमणार......?

श्यामली!!!

मौन वादळ

खूप खूप पडलंय अंतर
सांधु पहाते मी....
मौनातल्या वादळाला
बांधु पहाते मी!

पुरावे

कुणी मागायचे किती
अन शोधायचे किती
पुराव्यासाठी पुरावे
सांग मी द्यायचे किती