........घायाळ वादळही

पुन्हा एकदा आलंच
(येणारच होतं ते).....
गेल्या वेळेस बरीच मोडतोड करून गेलेलं
यंदा पण झालंय बरंचसं नुकसान
कुंपणाच्या तारा गोळा झाल्यात
खांब उखडून पडलेत
(अजुनही बरीच नासधुस झालीये)
आता मात्र पक्का बंदोबस्त करावा लागेल अस दिसतय
सिमेंट्ची पक्की भिंत बांधून घ्यावी
आणि हो वरती फुट्क्या बाट्ल्यांच्या काचा पेरायला हव्यात
म्हणजे नुसतं डोकवायचं म्हणलं तरी घायाळ झालं पाहिजे हे वादळ.
....
(आतलेही होतील घायाळ त्यावरून बाहेर डोकावताना)
चिंता करायची नाहीच काही गरज ,
बंदोबस्त झालाय....

कवितेस

सोडायचा नव्हताच हात,
आधी नाईलाज म्हणून आले होते आस-याला,
मग सवय झाली,
मग व्यसन,
पण आताशा तूही दुरावत चाललीयेस
मला तर विसरच पडत चाललाय,
कारणाचा शोध घेतीये,
पटेल असं सापडलं नाहीये अजूनही,
सध्या जे सुचेल ते कारण पटवून घेणं चाललंय
असो,
भेटुच परत कधी तरी..

राहीले ओठांवरी

बोलायचे काहीच होते,बोलले काहीतरी
ओठातले हे शब्द माझे राहिले ओठांवरी
स्वप्नातील मूर्त तीही राहिली स्वप्नांतरी
ओठातले हे शब्द माझे राहिले ओठांवरी
साहवेना ही व्यथा तू भेट ना रे क्षणभरी
ओठातले हे शब्द माझे राहिले ओठांवरी
ऐक ना! अखेर ही रे,चालले मी दुस-या तिरी
ओठातले हे शब्द माझे राहीले ओठांवरी
श्यामली!!!

वादळ

वादळाला का कधी कोणी मर्यादा घालतं?
येतंय येऊ द्यावं
जातंय जावू द्यावं
आपण मात्र त्याच्याकडे तटस्थपणे बघावं
अडकू नये जराही
वाहू द्यावं निवांत
नेतो वाहवून म्हणालं तर थोडंसं बरोबर वाहावं
वेग जरा मंदावल्यावर हळूच बोट सोडावं
...
बरोबर वाहवलो तरीही नुकसान तसं फारसं नाही
उरेल मागे फक्त...खाली बसलेला धुराळा...
आणि कोसळलेली इमारत...
...दुखावलेल्या मनाची.