एक जानेवारी वर्षाचा पहिला दिवस आणि शनिवार सगळं कसं जमवून आणल्यासारखं, सगळ्यांनी मिळून बिचवर जायचं ठरलं इथला शारजाहचा समुद्र पाहिला नव्हता अजून म्हटलं चला भेटून येऊया...हो मी समुद्रावर फिरायला जात नाही कधीच त्याला भेटायला जाते असंच वाटतं नेहमीच मला. कारण याच्यासोबत किती वेळ काढला तरी मन भरत नाही, किती तरी गोष्टी सांगतो आम्ही एकमेकांना. तर जेवण वगैरे पॅक करून आम्ही आमच्या शारजाहच्या घराजवळच असलेल्या बिचवर पोचलो. सोसाट्याचा वारा सुटलेला आभाळ भरून आलेलं..गाडितून उतरे उतरेपर्यंत आमची पोरं धूम समुद्राच्या पाण्यात भिजायला पोचली पण. अरे ढग आलेत गार आहे म्हणे पर्यंत भुरभुर सुरु झाली टपोरे थेंब पडायला लागले आणि धो-धो कोसळायलापण लागला.
अरे ही काय वेळ आहे यायची? कधीही काय? ऋतू कुठला वेळ कुठली आणि तुझं आपलं तिसरंच..पळापळी करून गाडीत बसायला आलो तर यानं सगळ्यांनाच चिंब भिजवून टाकलेलं.गम्मत वाटली...
मी आपली मनातच बडबडले
"चल पळ मी समुद्रावर समुद्रात भिजायला आलेय पावसात नाही काही, आत्ता इथे तुझं कोणाला कौतुक? काहीही काय..मला नाही भिजायच पावसात."
पण तू एवढा विचार करायला अवधीसुद्धा दिला नव्हता "झिम्माड झिम्माड"
गाडीतनं उतरून पुन्हा उलटपावली समुद्रावर, पाय बुडेल एवढ्याच पाण्यात गेले सुखावणारा वाट्ला स्पर्श..मग अजून पुढे विजेच्या लखलखाटात याचं आपलं चालुच बघ बघ मी जिंकलो की नाही? मीपण हट्टी समुद्रात डुबकी मारून याला वेडावून दाखवत म्हटलं मी समुद्रातच भिजले होते तुझ्यात नाही काही!!!!!!!!
2 comments:
ओह्ह, शारजाहला पाऊस सुद्धा पडतो का ?
व्वा, मस्तच हरवलं पावसाला...
हो हो पडतो तर चांगला बदाबदा पडलाय यंदा :)
अभिप्रायाबद्दल धन्यवाद आनंद
Post a Comment