आर्मेनिया - ३ येरेवान - टेम्पल ऑफ गार्नी

आर्मेनिया हा देश जगातला पहिला असा देश आहे जिथे ख्रिस्ती धर्म सगळ्यात पहिल्यांदा एखाद्या देशाचा धर्म म्हणून स्वीकारला गेला. अनेक पुरातन ख्रिस्ती धर्मस्थळ आणि त्यांची रचना हे या देशाच अजून एक वेगळ आकर्षण. जगभरातून अनेक लोक केवळ ही जुनी मंदिर बघायला इथे येतात त्याचा धर्माशी फारसा संबध नसावा अस जाणवलं.
पूर्वेला टर्की, पश्चिमेला जॉर्जिया उत्तरेला इराण तर दक्षिणेला अझरबैजान असलेला हा छोटासा देश. पूर्वी USSR चा भाग होता अजूनही इथली कित्येक छोटीमोठी गावं शहरं आपल्याला रशियामध्ये असल्याच भासवतात.
येरेवानमध्ये मुख्य शहर हे रिपब्लिक स्क्वेअरच्या आसपास आहे. या रिपब्लिक स्क्वेअरची भव्य वास्तू अतिशय देखणी आणि व्यवस्थित देखभाल केली जाणारी आहे. याच्या अगदी जवळ इथल अगदी प्रसिद्ध असलेल ओपन मार्केट/फ्लीमार्केट आहे. आपल्याकडे जसा बाजार असतो तस इथे रोज भरणारा बाजार असतो पण तो फक्त इथे हस्तकलेतून निर्माण होणार्या आणि इथेच तयार होणा-यां निरनिराळ्या वस्तूचा असतो. इथे एकाच ठिकाणी आपल्याला अनेक वस्तू विकत घेता येऊ शकतात. स्थानिक लोक इथे अजिबात खरेदी करू नका अस सुचवतात पण आपण स्वाभाविकपणे इथे खरेदी करण टाळू शकत नाही. (शेवटच्या दिवशी खरेदी केली ती नंतर ;) )
टेम्पल ऑफ गार्नी - इथे असलेल हे जे देऊळ आहे ते ख्रीस्तपुर्वकाळातील रोमन वास्तू आहे . डोंगराळ भागातल्या विस्तीर्ण पाठारावर हे देऊळ आहे. आजूबाजूला बर्फाच्या दिवसात बर्फाळ पर्वत रस्ते त्या पार्श्वभूमीवर हे देऊळ अतिशय देखण दिसत. इथे असलेली कमालीची स्वच्छता नजरेत भरल्याशिवाय राहात नाही.
IMG_7093.jpg
IMG_7113.jpg
IMG_7080.jpg
ही आज्जी एवढ्या थंडी वा-यात अशा दुर्गम परिसरात स्वतः हातानी केलेल्या बाहुल्या विकत होती. हिला चेन्नई आणि मुंबई माहित होतं. ही एका गाण्याच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भारतात येऊन गेली होती त्यामुळे तिला भारतीय लोकांबद्दल विशेष प्रेम आहे असही तिनं आम्हाला सांगितल.
IMG_7107.jpg
या देवळाच्या मागे दुरवर पसरलेल्या पर्वतरांगा दिसत आहेत.
या देशाच अजून एक वैशिष्ठ म्हणजे इथल्या किमान तापमानामुळे निरनिराळ्या प्रकारची वाईन, स्कॉच, व्हिस्की , कोनियाक अतिशय मुबलक प्रमाणत कुठेही अगदी सुपरमार्केटमध्येपण मिळते आणि कुठेही बसून ती पिता येते. त्याचप्रमाणे सिगारेट पिणं ही देखील इथे अतिशय आम बात आहे (हा खास एपिसोड येतो आहेच ;) . नो स्मोकिंग झोन आपले आपल्याला शोधावे लागतात.
केवळ भारत आणि आखातातच वावरल्यामुळे या दोन गोष्टींच जरा आश्चर्य वाटण स्वाभाविकच.
#Armenia #YEREWAN #TEMPLE_OF_GARNI

अर्मेनिया - २ राजधानी येरेवान

येरेवानच्या झावान्तोर एअरपोर्टवर पोचलो व्हिसा आदी प्रक्रिया होऊन बाहेर यायला साधारण पाऊण तास लागला. आम्ही आधीच कॅब सांगितलेली होती पण ती आम्ही पोचलो तरी अजून आली नव्हती त्यामुळे त्याला फोन करणे त्याची वाट बघणे आदी घोळात तिथे सीमकार्ड घ्यायच राहून गेल आणि लोकल सीम नसल्यामुळे पुढे अनेक अडचणींचा सामना करावा लागला ते पुढे त्या त्या वेळेला येईलच.
दोन्ही मुलाना हॉटेल मध्ये राहायचं नव्हत त्यामुळे बुकिंग सगळी होमस्टेमध्ये केली होती. आता येरेवानला आम्ही आमच्या राहण्याच्या ठिकाणी पोचलो ती वास्तू अतिशय सुंदर अगदी नदीकाठाला असलेल्या छ्प्ट्याश्या टेकडीवर होती . कुकिंगरेंज पासून वाशिंग मशीन पर्यंत सगळ्या गोष्टी होत्या.पण आयत्या जेवणाची सोय नव्हती. तर जेवणासाठी लगेच बाहेर पडण आणि जेवण आत्ताच्या घटकेला गरजेच होत. ड्रायवरनी मगाशी आम्हाला सोडताना सुपमार्केट आणि रेस्टॉरेंट दाखवल होत त्यामुळे आम्ही चौघ लगेचच बाहेर निघालो. टेकडीवर अजून वर चढून आल्यावर मग त्या परिसरातला मुख्य शहरी भाग सुरु होत होता. त्यामुळे काही पाय-या चढून उतरून मग आपण मुख्य रस्त्यावर येऊ जाऊ शकणार आहोत याची मनानी नोंद घेतली.
रेस्टॉरेंटमधे एक आज्जी एकटीच तिथे सगळीच काम करत होती. तिला अजिबात इंग्लिश येत नव्हत आम्हाला अजिबात अर्मिनियन येत नव्हत. आमच्या सारखा जेवायला आलेला एक माणूस धाऊन आला. त्याच्या मार्फत आम्ही त्या आज्जीला एवढ सांगू शकलो की आम्ही बीफ किंवा पोर्क नाही खाऊ शकत आम्हाला फक्त चिकन असलेले किंवा व्हेज पदार्थ चालतील. मग खाणाखुणा करुन आम्ही काहीतरी चिकन, भात, ब्रेड आणि दोन पदार्थांची नाव ओळखीची दिसली म्हंटल अगदीच काही नाही तर या दोन पदार्थांबरोबर जेवण होईल म्हणून ऑर्डर केली ते पदार्थ म्हणजे मुताब्बल आणि हमूस. भूक खूप लागली होती त्यामुळे अर्थातच सगळे तुटून पडले होते.
जेवण करून झाल्यावर मग जरा जवळ फिरून याव म्हणून बाहेर पडलो.
रस्त्यावरून फिरताना रशियन स्थापत्यकलेचा प्रभाव इथल्या वेगवेळ्या इमारतींवर दिसत होता. मोठ्या मोठ्या दगडी बांधकाम असलेल्या अनेक इमारती आमच लक्ष वेधून घेत होत्या.
हा येरेवानमधे आमच्या होमस्टेजवळ काढलेला पहिला फोटो
C83BC19B-8551-4EA7-A3EE-8C97EBD8E1E1 (2).jpeg
थोडस पुढे आल्यावर लवर्स पार्क नावाचा बराच मोठा पार्क दिसला त्याच्या अलीकडे मेट्रो स्टेशन होत. जवळपास कुठे तरी भटकून यायच ठरलच होत त्यामुळे आमच्या स्टेशन पासून रिपब्लिक स्क़ेअर एक स्टेशन सोडून पुढच स्टेशन आहे आणि तिथे मुख्य शहर आहे अस समजल होत. मेट्रोच तिकीट काढल आणी गम्मत वाटली आपल्या व्यापार किंवा लाईफ नावाच्या बोर्डगेम मध्ये असतात तशा प्लॅस्टिकच्या गोल चकत्या किंवा नाणी तिकीट म्हणून हातात आली होती ती त्या स्वयंचलित गेटला असलेल्या कॉईनबॉक्स मधे टाकायची आणि मेट्रो स्थानकात प्रवेश करायचा. ट्रॅकपर्यंत जाण्यासाठी स्वयंचलित जिना होता याची सवय आहेच पण हा जिना चक्कर येईल एवढा खोल जात होता. परत याच स्टेशन वर येता याव म्हणून स्टेशनच्या नावाचा फोटो काढून घेतला होता.
रिपब्लिक स्क़ेअरला खरोखच माहोल मस्त होता एकदम. एकतर त्या सगळ्या भव्य ऐतिहासिक वास्तू बघायला खूप मजा येत होती . त्यात व्हॅलेंटाईन डे चा आदला दिवस होता. इथे एकदम राष्ट्रीय सण असल्यासारखा वातावरण होत. सगळीकडे लाल हृदयाकृती फुगे गुलाब आणि अनेक आकर्षक वस्तू लावून सजावट केलेली दिसत होती. सगळी गम्मत बघत आम्ही नुसते चालत सुटलो होतो.

अर्मेनिया १ तयारी आणि प्रवास

जवळजवळ सात वर्षांनंतर आम्हा चौघांना एकत्र ट्रिपला जायची संधी मिळाली होती. जायच कुठे यावर कॉन्कॉल ( बेळ्गाव, पुणे, मुंबई आणि दुबई ) घेऊन खूप खलबतं, झाली निव्वळ टुरिस्ट डेस्टिनेशन असलेला देश बघायला जायच आम्हाला कोणालाच मान्य नव्हत. त्यामुळे कुठे जायच हे ठरवण्यासाठी आमचा बराच रिसर्च झाला. इजिप्त, जॉर्जिया, अझरबैजान , मलेशिया असं करत करत शेवटी अर्मेनियावर शिक्कामोर्तब केलं गेलं . दोन्ही मुलं म्हणजे कौशल देविका आणि नवरा यांच जोरदार प्लॅनिंग चालल होत. ( मी जरा या सगळ्या प्लॅनिंगकडे तटस्थतेनी बघत होते. )
शारजाह ते येरेवान १२ फेब्रुवारीच्या फ्लाईटची चौघांची तिकीटं पण बुक केली गेली. त्याच्या कित्येक दिवस आधी माझं पुणे ते दुबई १० जानेवारीच तिकीट बुक झालेलं होतं. पुण्यातली कामं संपवण, घरातली झाकापाकी करण, किल्या जिकडल्या तिकडे ठेवण. येण्याआधी काही गोश्टिंची शॉपिंग करायची असते ती शॉपिंग करण .माझी बॅग भरण. माझं सामान जास्ती होणार होतं म्हणून अर्मेनियाला जायचे कपडे दुस-या एका बॅगमधे भरुन ती बॅग "प्लिज पिक मी" असा टॅग लावून देविकाच्या खोलीत ठेवण. भाऊ आणि बाबांना एकदा सोडून ब-याचवेळा फोन करण कामवालीला आटह्वड्यातन एकदा येऊन काय काय करायच त्या सूचना देणं असं सगळ सगळ अगदी पुर्ण श्रद्धेनी करुन झालं होतं. आणि माझ्या दुबईला यायच्या आदल्या दिवशी मला समजत की एक सरकारी काम जे काही दिवसांपासून अडकलेल होतं ते या काही दिवसात होणार आहे. काम होणार म्हणून हुश्श!! म्हणाव का केलेला प्लॅन फेल जाऊ नये याची काळजी करु ते कळेचना मला.
तर त्यानंतर वेळेवर माझं सरकारी काम झालं मला लगेच पुढच्या आठ दिवसानंतरच तिकीट मिळाल आणि अर्मेनिया ट्रीपला जायच्या पंधरा दिवस का होईना आधी दुबईत दाखल झाले.
"बर्फ असण्याचे दिवस आहेत आपण जातोय ते तेंव्हा थर्मल्स नक्की घ्या." मुलांनी आई-बाबांना आवर्जुन कळवलं होतं. बाबा, कॅनडा, जर्मनीला येता जाता असल्यामुळे बाबाकडे थर्मल्स होतेच. प्रश्न आईचा होता. आईनी दुबईत येऊन पुन्हा शॉपिंग केलं.
थर्मल्स, लोकरीच्या टोप्या, ग्लोव्हज, लोकरीचे सॉक्स, लेदर जॅकेट्स हुह!! खूप मोठी लिस्ट.
भारतीय पासपोर्ट असणा-यांना ऑन अरायवल व्हिसा देणारे देश https://www.bankbazaar.com/visa/list-of-visa-free-countries-for-india.html यामधे अर्मेनिया आहे.
आजपर्यंत रेसिंडेन्स व्हिसावर वावरणारी मी, मला जराशी या व्हिसा प्रकरणाची भितीच वाटते. त्यात मुलांचा दुबईचा रेसिडेंस व्हिसा कॅन्सल केलेला. त्यांचा प्रवास व्हाया शारजाह होणार होता. मी एकदा सोडून जवळ जवळ २० -२५ वेळा एअर अरेबियाला फोन करुन खातरी करुन घेतली होती की मुलांना मुंबईला बोर्ड करताना काही अडचण येणार नाही. मुलांनी देखील त्यांचा त्यांचा रिसर्च केला होताच पण ...
आता पुन्हा एअर अरेबियाला फोन करुन पुन्हा खातरी करुन घेतली की येरेवानला पोचल्यावर व्हिसा प्रोसेस होतो. इथुन काहीही करायची गरज नाही.
फ्लाईट शारजाहवरुन सकाळी आठ वाजता होती. मुले रात्रीच्या फ्लाईटनी शारजाहला निघाली होती त्यामुळे झोपेची मज्जाच होती. त्यात पोटानी त्रास द्यायला सुरुवात केली. म्हटल झालं आता ट्रिपमधे पोट त्रास देणार. बरोब्बर २० डिसेंबरपासून स्टमक इन्फेक्शन, अमुक ढमुक तमुक करत पोटाची वा ट लागली होती. तिखटामधला ति सुद्धा पोटाला चालत नह्वत. नुसत्या खिचडी आणि मऊ भातावर एक दिड महिना काढला होता. दुबईला आल्यापासून घरचच सगळ खायला लागले होते. त्यामुळे पोटाच्या हाका ऐकून घाबरले होते.
रात्रभर जागरण करुन पहाटे साडेचारला शारजाह एअरपोर्टला पोचलो. रेसिडेंस व्हिसा होता बोर्डिंग लगेच मिळायला हवा खर तर पण किती तरी वेळ बोर्डिंग काउंटरवाला आम्हाला बोर्डिंग पास देईचना. येरेवान मधलं हॉटेल बुकिंग कन्फर्मेशन बघुन झालं होतं . मग त्याच्या सिनिअरला बोलवल दोघांची काय खलबतं झाली कळल नाही. पण बोर्डिंग पास तयार झाला. लगेज बेल्टवर टाकल. मी म्हटल विचार तरी का एवढा वेळ लागला ते. मग विचाराल्यावर अस समजल की नव-याचा पासपोर्ट संपत आला आहे सहा(च) महिने राहिले आहेत.
शारजहा एअरपोर्टला आमच येणं होत नाही त्यामुळे स्मार्ट गेटसाठी पासपोर्ट रजिस्टर करण ही एक अ‍ॅडिशन प्रोसेस माझा पासपोर्ट
नव-याचा पासपोर्ट एकाच बाईला दिला होता रजिस्टर करायला पण इमेग्रेशन गेट पास करताना फक्त मलाच जाता आलं नव-याला इमिग्रेशन क्युमधे उभ रहा म्हणून सांगण्यात आलं, म्हटल आता काय नविन काढतात? पण मग काही प्रॉब्लेम आला नाही. फक्त त्याचा पासपोर्ट स्मार्ट गेटसाठी रजिस्टर नव्हता झाला एवढच. हुश्श!!
एवढ सगळ उरकेपर्यंत साडेसहा वाजून गेले होते. अजून एका तासात मुलांची फ्लाईट येणार होती. आणि लगेच म्हणजे आठ वाजता आमचे येरेवानची फ्लाईट होती. खाण्यासाठी शारजाह एअरपोर्टवर फार काही खास ऑप्शन नव्हतेच, नवरा कानडी अप्पा असल्यामुळे त्याला दोसा चालणार होता. माझ्या पोटाच्या भितीमुळे मी इडलीच खाल्ली. मुलांसाठी पण टेक-अवे घेतलं
शारजाह एअरपोर्ट अतिशय लहान एअरपोर्ट आहे आणि त्या मानाने इथे खुप जास्त फ्लाईटस ये जा करतात त्यामुळे विमानतळ आपल्याकडच्या खूप गर्दी असलेल्या एखाद्या रेल्वेस्टेशनसारखं वाटत मला. जागा मिळेल तिथे लोक उभे असतात बसलेले अस्तात, किंवा झोपलेले असतात, स्वछतागृहांची अवस्थाही तीच असते. नावडत्या यादीत शारजाह एअरपोर्ट.
आमची फ्लाईट अनाउन्स झाली पण मुले अजून बाहेर आली नव्हती. आम्ही एकदा बोर्डिंग गेटकडे एकदा मुलांच्या अरायवल गेटकडे अशा चकरा मारत होतो. मुले आली आणि आम्ही सगळे येरेवानला जाणा-या विमानात बसलो.
मला आणि कौशलला खिडकीच हवी असते. देविकाला आणि बाबाला झोपायच असत त्यामुळे मला आणि कौशलला आरामात खिडकी मिळाली फक्त खिडकीतुन बाहेर बघताना जी बडबड असते ती ऐकायला सोबत कोणी नव्हत कारण आमच्या सिट्स लांब लांब आल्या होत्या.
मी दुबईला आल्यापासून पावसाळी हवा होती आम्ही निघायच्या दिवशीसुद्धा पाऊस असणार होता. विमान उडल्यावर आजुबाजुला दिसणारे मोठे मोठे काळे-करडे ढग बघून लहान मुलासारखी मज्जा येत होती मला. विमान आता जरा जास्त उंचिवर गेल्याची जाणीव व्हायला लागली. दुरवर पसरलेलं वाळवंट संपुन मोठे मोठे डोंगर दिसायला लागले होते. एकदोन वेळा ओमान ला रोड ट्रिप झाल्यामुळे हे असे डोंगर ओळखीचे होते. इराणचा डोंगराळ भाग असा दिसतो हे वाचलेल ऐकलेल होतं पण नक्की खाली इराण आहे की आणि दुसरा देश हे तेंव्हाच्या तेंव्हा समजू शकणार नव्हत. काही वेळ हे डोगर राहिले बघता बघता जरा डुलकी लागली. जाग आल्यावर बाहेर बघीतल तर दृष्य तेच होतं पण जरा लांब एक डोंगर पांढ-या डोक्याचा दिसला म्हटल, अग्बाई म्हातारा झाला वाटत तो डोंगर! असं म्हणते तोवर अजून लांबचे डोंगर पांढर डोकं दाखवायला सरसावले. अजून पुढे गेल्यावर लांबवर पसरलेलं पांढर पठार दिसायला लागलं.
मी जवळ जवळ ओरडून देविकाला उठवलं होतं ,एवढा!!!!! बर्फ!!!!!

October

पारिजाता (October)
अवघ्या काही तासांचं आयुष्य असलेल्या पारिजातकाच्या फुलाबद्दल कोणी काही बोललं तरी ती कविता वाटावी एवढं आकर्षण आहे या पारिजातकाच्या फुलाचं .
एवढं सुंदर, नाजूक, काहीच वेळेत कोमेजून प्रवास संपवणारं.

ऑक्टॉबर या चित्रपटाच्या लेटरिंगमध्ये स्पेलिंगमध्ये असलेल्या  O या अक्षरात नाजुक पारिजातकाचं फूल दाखवलं आहे .
तर हे पारिजातकाचं फुल सुरवातीलाच बोट धरतं तुमचं आणि गोष्ट सांगू लागतं शिवली आणि डॅनची.

लौकिक अर्थानं ही मुळीच प्रेमकथा नाही पण एका घटनेमुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्या डॅनला कसा मिळतो? स्वतःला शोधण्याचा त्याचा प्रवास कसा होतो ?

डॅन अगदी सर्वसामान्य असणारा एक मॅनेजमेंट ट्रेनी जो एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये इंटर्नशिपसाठी काम करतो आहे .  याला रोज देण्यात येणारं कुठलंच काम आवडत नाही तो एकही काम धड करू शकत नाही . आणि त्यामुळे त्याची रोज वेगळ्याच डिपार्टमेंटला बदली होते .
प्रत्येक काम करताना त्याचा कामचुकारपणा , बावळटपणा सहज दिसून येतो.  महत्वाकांक्षा आहे पण त्यासाठी जे कष्ट करायला हवेत त्याची काही गरज नाही किंवा ते करणं हा निव्वळ मूर्खपणा आणि वेळ घालवणं आहे असा याचा ठाम समज .

या उलट शिवलीचं पात्र उभं केलं आहे, संवाद असे फार नाहीतच या मुलीला.  शांतपणे तिला दिलेली कामं ती करत राहते .  अगदी छोट्या सिनमध्ये कोणाच्याही नकळत याला मदत होईल असं काम करून टाकते.  डॅनचा वेध घेणारी एखाद दुसरी चोरटी नजर हाच काय तो रोमान्स.

हॉटेलमध्ये टेरेसवर हे लोक पार्टी करत असतात आणि कठड्यावर असलेल्या दवामुळे शिवलीचा हात घसरतो आणि ती टेरेसवरून खाली पडते .

तिला दवाखान्यातनं  बघून आल्यावर डॅनला समजतं की पडायाच्या आधी शिवली, डॅन कुठंय ? विचारते आणि इथे डॅनच्या प्रवासाला सुरवात होते .

जगतेय का मरतेय अशा अवस्थेत असणाऱ्या शिवलीसाठी डॅनचं बदलणं.  त्याच्या मित्रांचं त्याला सपोर्ट करण.  शिवली, शिवलीची आई, बहीण, भाऊ, आपण निर्णय घ्यायला हवा आता, असं सारखं सारखं म्हणणारा शिवलीचा काका. व्हेंटीलेटरच्या  स्विचपासून काकाला लांब ठेव असं डॅन जिला बजावून सांगतो ती नर्स . अगदी सगळी पात्र सुस्थळी .

लेखक आणि दिग्दर्शकानी  एक सुंदर कविता उभी केली आहे .

फक्त तीन तास टाईमपास हवा असेल तर मुळीच बघू नका

कविता

कविता
ती यायची म्हणे रोज या कवितांच्या बागेत
तासंतास रमायची म्हणे
प्रत्येक कवितेजवळ थांबून विचारपूस करायची
हसऱ्या लाजऱ्या कवितांचं
फार म्हणजे फार
अप्रुप असायचं तिला
कितीतरी कवितांना कुशीत घेऊन
गोंजारत, थोपटत राहायची म्हणे
एखाद्या खळाळून हसणाऱ्या कवितेला
उगाच गुदगुल्या करून
स्वतःच खुसूखुसू हसायची
आणि अनेक गंभीर ,दुःखी कवितांमध्ये
बघायची वाकून वाकून स्वतःच प्रतिबिंब
पुटपुटायची ,
"विरून गेलेल्या स्वप्नांची कविता होत असते अशी "
...
गेले कित्येक दिवस ती फिरकलीच नाहीये इकडे
पण
त्या तिथे मागे बागेच्या कोपऱ्यात
नवीन कविता कोणी लावलीये ?

~कामिनी फडणीस केंभावी