ही कुठली दुनिया असली?

देव काकांचा हिवाळी अंक
शब्दगाऽऽरवा २०१०: प्रकाशित झाला त्यात दिलेली ही कविता.

स्पंदनात घुमते मुरली
दरवळतो ऋतू एकांती
ना चौकट याला... कसली
ही कुठली दुनिया असली?

लडिवाळ दिशा बोलती
फुलपान सवे गुणगुणती
ही कसली भाषा... इथली?
ही कुठली दुनिया असली?

हा कसला अजब जिव्हाळा?
मन फुलते; पाणी डोळा
ही ओढ कशी... आगळी?
ही कुठली दुनिया असली?
~श्यामली

कवितेचे देणे

यंदाच्या मायबोली दिवाळीअंकात दिलेली कविता


कसा सांग सुटतो ग हातातला हात
स्वच्छ निळ्या आभाळाचा का ग तुला राग?
झाकोळता नभ पुन्हा येतेस धावून
दिसे बापुडेसे मग कोवळे हे ऊन्ह

नवी ओळ, नवे खूळ  घेऊन येतेस
डोळ्यास जागाई तू ग देऊन जातेस
नित्य नव्या खुळापायी येई दाटून पापणी
प्राक्तनांची खूण अवघ्या जन्माच्या गोंदणी

ओळ धरून उशाला मन निजले थकून
तिथे भेटली कविता रडे तिला बिलगून
का ग वेळ लावियेला किती केले जपजाप
अंतरीचा तूच दीप; तूच ईश, मायबाप

(कधीकधी ओळखिची सापडते खूण
भेट होते आता अशी अधुनमधुन
काही रुसवे-फुगवे, काही शपथा वचने
कैक जन्म फिटू नये ऐसे कवितेचे देणे)

ही शांत धुक्याची वाट

ई-सकाळच्या दिवाळीअंकात छापून आलेली माझी कविता

साद घालते भासातुन ही शांत धुक्याची वाट
चांदफुलांच्या पायघड्यांवर मौनाची लाट
लाटेवरुनी मौनाच्या या; गंध दरवळत येई
अजून कोणी स्मरते तुजला कानी कुजबुज होई

असाच होता चंद्र लाभला; नव्हती पण पौर्णिमा
रात्रही नव्हती पुरती सरली नव्हती रक्तिम पूर्वा
रुसवे फुगवे राग दुरावे सगळे मिटले होते
मांगल्याचे दीप अंतरी किती उजळले होते


जन्मभराच्या अवसेची तेव्हा कशी कल्पना यावी?
स्वप्नफुलांनी पुजा बांधली; कशी फळाला यावी?
कधीतरी दिसते वाट धुक्याची; उरात हुरहुर उठते
प्राजक्ताच्या झाडाखाली चांदफुलांना बघते...

पाऊस, साखळी कविता

प्रशांत’नं पाऊस-कवितांच्या खेळाची सुरुवात केली, आणि ’क्रांती”ला खो देऊन कल्पनाशक्तीला मस्त वाव दिला. या खेळाचे त्यानं सांगितलेले नियम खाली दिले आहेत. ’क्रांती’ने तिची साखळी जोडून पुढचा डाव ’प्राजू’,’राघव’,’जयवी’ आणि माझ्या (’गोळे काका’ यांच्या) हाती तिची सूत्रे दिली.


पावसावरील कडव्यांची साखळी का करू नये?

तेव्हा, ब्लॉगबंधु-भगिनींनो, "पाऊस-कविता" पुढे चालवण्यासाठी काही सोपे नियम -

१. शक्यतो छंदबद्ध कडवे तयार करू. अगदीच नाही जमलं तर मुक्तछंद चालेल. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? कविता गुंफ़ायची असल्यामुळे आधीचा कडव्याशी थोडासा तरी संबंध असावा.
२. छंदाचं नाव माहिती असल्यास ते कळवावे. त्याबद्दल माहिती दिली तर छानच. अर्थात नाही दिली तरी चालेल.
३. किमान एक व जास्तीत जास्त चार ब्लॉगबांधवांना खो देता येईल. संबंधित ब्लॉगलेखकास प्रतिसाद देऊन तसे कळवावे.
४. खो मिळाल्यावर ज्याच्या/जिच्याकडून खो मिळाला आहे त्या ब्लॉगलेखकाच्या पोस्टाचा दुवा आपल्या पोस्टात द्यावा व शक्य असल्यास आधीची कडवीही उतरवावीत. तसेच आपण खो स्वीकारल्यावर त्या पोस्टाचा दुवा खो देणाऱ्या पोस्टाच्या प्रतिसादात कळवावा, जेणेकरून आधीच्या लोकांनाही नोंद ठेवता येईल.
५. हे नियम सर्वांच्या सोयीसाठी डकवावे.
६. बस्स. आणखी काही नियम नाही. :-) आता फक्त पाऊस-कविता....

मग करायची‌ सुरुवात?

प्रशांतच कडवं  - (भुजंगप्रयात छंद)

न क्रोधी असा पावसा रे सख्या रे
तुझी वाट पाहे सखी मी तुझी रे
झणी येउनी वर्ष रे थेंब थेंब
तुझा स्पर्श अंगा करो चिंब चिंब

प्रशाआंतचा खो -चक्रपाणि, क्रांती, आशाताई, अ सेन मन यांना

 क्रांतीचे उत्तर  छंद तोच भुजंगप्रयात.

खुळ्या पावसाला किती आवरू रे?
सरी श्रावणाच्या कशा पांघरू रे?
निळे सावळे मेघ येती छळाया,
सख्या, दूर तू, मी कशी सावरू रे?

गोळेकाकांचं उत्तर , छंद तोच. भुजंगप्रयात!

नको पावसा कोसळू तू असा रे
किती घोर लावून जाशी असा रे
पुरे जाहले, ने पुढे सर्व वारे
जरा राजसा थांब आता कसा रे

.तुशारचं उत्तर  छंद भुजंग प्रयात्

कुणी पावसाला म्हणे येत जारे
कुणाला सरीने सजण आठवे रे
कुणी गातसे पावसा थांब आता
अशी पावसाची अनोखीच गाथा

तुषार चा खो सई, चैताली, अनुराधा आणि शब्दसखा यांना.

आशाताईंच उत्तर, छंद तोच भुजंग प्रयात पाऊस: साखळी कविता

सख्या पावसा तू असा रे कसा रे
तुला साथ देती हे उन्मत्त वारे
कधी ध्वस्त करशी जगाचा पसारा
कधी वर्षसी अमृताच्याच धारा ।

माझा खो चैताली,महक आणि श्यामली ला

महक चे उत्तर  पाऊस: साखळी कविता
कसे आवरू मी , या पाउस वेड्या मनाला
ओल्या मातीचा गंध मोहवतो त्याला
जीव कंठश्च होई,वाट पाहे क्षणा क्षणाला
लवकर येण्याचा निरोप दे, माझिया साजणाला.

माझं कडवं, वृत्त तेच भुजंगप्रयात

कधी सांग आता पुन्हा भेट व्हावी
तुझ्या चाहुलींनी धराही हसावी
पुन्हा त्या सयींची नको साथ आता
नको श्रावणाची बघू वाट आता



माझा खो वर्षाला    http://varshanair.blogspot.com/
आणि यशोधराला     http://sanvaad.blogspot.com/

चक्रव्यूह

कदाचित दोष नसावा कवितांचा वा त्यातल्या शब्दांचाही,
कवितेची वळणं; तिथवर नजर पोचायच्या आधीच नाहिशी होतायत
आणि अर्थाचा गहिरेपणा उथळ झाल्यासारखा वाटतोय..
या शब्दांच्या भोव-यात अडकलं की असं होतं का?
का जखम कोरडी होत आली की असं होतं?
का दोनही गोष्टीत हेच होतं?
...
शब्दांची गरज म्हणून भोवरा फिरत राहतो आठवांचा
आणि हेच धरून ठेवायचं म्हणून शब्द जुळत राहतात.
चक्रव्यूहासारखं झालंय;
सगळं काही विसरावं तर शब्द हटून बसतात
शब्द सोडावेत तर मनातला नंदादीप अखंड तेवत असतोच...

असे वाटलेले आता; काही काही सुचणार नाही...

बरेच दिवस झाले ही एवढी एक ओळ आणि त्या ओळीच्या पाठीवर ओघवतीच आलेली अजून एक ओळ...एक श्वास ओलांडला अन  सांडलीही शाई!!

गम्मत आहे ना? अरे इथे स्पष्ट जाणवतय; आता आपण लिहिणार नाही आहोत; यापुढे, जमणार नाहिये आपल्याला लिहायला. पण मन मात्र दिलासा देतंय नाही नाही असं होणार नाहिये अजिबात बघ दोन ओळी सुचल्याच की नाही. सुचत राहील पुढेही.

मग इथे जर माझं मला जाणवतयं की आता लिखाण पुरे....तर दुसरीकडे मनात उमटलेली ही ओळ  काय सांगते.?

मौन

मौन म्हणते थांब आता
शब्द तुझे झाले पुरे
बोलणे त्याचे खरे कि
थांबणे माझे खरे?

थांबणे माझे क्षणांचे
अर्थांचे झरती झरे
उमगले काही मला
इतुकेही आहे ना पुरे
?

चारोळी

कळू नये जगाला काही
हीच असावि वा-याची निती
गहिवरते मायेने याच्या
ओलेती सर होते रिती

जरा मनानी हलके व्हावे

जरा मनानी हलके व्हावे
थोडे वाहून परतून यावे
मेघ जांभळा जरी आकाशी
हसून त्याही थांब म्हणावे

जशा कैक होत्या व्यथा गोंदलेल्या

सुचावे न काही रुचावे मनासी
अशी हाय कोठून येते उदासी?

अबोलीपरी गंध घ्यावा मिटोनी
अताशा असे वाटते मोग-यासी

न कळते स्वत:ला असे काय होते
खुलासे कसे काय देऊ जगासी ?

उगवती नि ढळती कुठे चंद्रतारे?
उमजते न काही अता अंबरासी

जशा कैक होत्या व्यथा गोंदलेल्या
तसे नोंदले मी तुलाही समासी

आडवळणाचा घाट

काय लिहितेय कशासाठी लिहित्ये वैताग नुसताच...कवितेसाठी मूड लागत नाही जो लागतोय त्यात काही लिहिलं जात नाहिये. दुस-या कोणी काही लिहिलंय ते वाचायचा कंटाळा कविता तर कोणीच धड लिहीत नाहिये असं वाटत्यं. खूप दिवस झाले संदीपला ऐकलं नाही म्हणून नामंजूर लावली...आणि सलीलचा आवाज काळीज कापत जातोय असं वाटायला लागलं अज्जिबात त्या मूड मध्ये जायचं नव्हत म्हणून मग तेही बंद. आशा ऐकू या म्हणून क्लिक केलं आणि इथेही, " गिला मन शायद बिस्तर के पास पडा है, वो भिजवा दो मेरा वो सामान लौटा दो...." हुह्ह!!

अरे हे सगळ बंद करा कोणीतरी काय लावलंय च्यायला. दुसर काही घडत नसतं का आयुष्यात?


ह्म्म्म!! म्हणणं काय म्हणे तुमचं, राजकारणावर गप्पा झेपणार आहेत तुम्हाला? क्रिकेटबद्दल बोला, हवापाणी दुबईची हवा अमेरिकेची हवा भारतातलं पाणी बोला की,,,,,,,,,,,नको कोण म्हणतय तुम्हाला. क्रिकेटबद्दल........... सचिन सोडलं तर बोलण्यासारखं काही नाहिये आज तरी. बाकी शून्यच. ए गप्पे! चालली परत शुन्याकडे.

बजेट बद्दल बोलू या? कर्म माझं आता हे बजेट आणि ते ही मला झेपणारा विषय आहे का? घरातलं बजेट सांभाळते तेवढं पुरे नाही का?

अं!!! मुलं ग! मुलांबद्दल बोल की, काय काय चालल्य सध्या???.......................
मला अस्तित्व नाहिये का? मी मुलं नवरा संसार या शिवाय बोलू शकतच नाही???स्ट्रेंज.....अर्ध आयुष्य गेलं की....

बये, मग तुला काय आवडतय सध्याच्या घटकेला त्याचा शोध घे की का उगाच बाकिच्यांची डोकी खात्येस.
गप्प बस....थोडे दिवस :D

हे आता असलं काय आणि का ...आडवय आडवेळ आडवळणाचा घाट....अर्थात संदिपला अभिप्रेत असणारं आडवय वेगळं आहे ;)

आजचं नुकसान

ब्लॉगला थोडं ठीकठाक करायच्या नादात फॉलवर्स गॅजेट गमावावं लागलं :(
ते कसं परत मिळवता येईल? कोणी सांगेल का हे परत कसं मिळवायच? मी सेटींग मध्ये जाऊन फॉलोवर्स गॅजेट अ‍ॅड करायला गेले तर त्याच्यावर अ‍ॅड असं साईन येतच नाहिये.

जिंदगी रूठ रही है हमसे

लगता है जिंदगी रूठ रही है हमसे
न तनहाई भांती है, न गम सताता है
...
या शायद मैने पा लिया है तुमको?

प्राक्तन लाटेचं

तुझ्यातल्या आवेगाप्रमाणे
माझं ठिकाण ठरलेलं
कधी जवळचंच तर कधी
दूर कुठेतरी असलेलं
कधीतरी सापडतो मनाजोगता निवारा
पण काम झालं, आता जा परत म्हणतो तो किनारा
तू उसळायचंस आणि कुठेही नेऊन टाकायचंस
त्यानं दोन क्षण आपलं म्हणायचं आणि
पटकन झटकून कोरडं व्हायचं.......

ह्या लाटेच्या नशीबी असच का फिरायचं?
कोणाला तिने आपलं म्हणायचं?
क्षणभर सुखावणार्‍या किनार्‍याला
का ज्याच्यामुळे तिचं अस्तित्व आहे
त्या सागराला...... ?

सालंकृत

कधीही..कुठेही..
काहीही कारण सांगून बोलायला लागतेस,
सगळीकडेच बोलणं,आणि ऐकणही नसतंच ग शक्य!
मग पर्समधे असलेल्या कसल्याही कागदावर,
कधी एखाद्या बिलाच्या पाठीवर,
अगदी छोट्याश्या चिटो-यावरसुद्धा उतरवांव लागतं तुला...
कधी होतेस साजरी गोजिरी,
कधी राहून जातो तसाच तो नुसता कागदाचा कपटा;
तर कधी
संधी देखील मिळत नाही तुला जपण्याची
हुरहुरतं मन आणि शोधायला लागतं तुला मग
सापडतेसही तू
मनाच्या तळाशी, खोल खोल कुठेतरी,
सालंकृत नसलेली अगदी
एकाही शब्दांशिवाय उमटलेली!

झिम्माड..झिम्माड

एक जानेवारी वर्षाचा पहिला दिवस आणि शनिवार सगळं कसं जमवून आणल्यासारखं, सगळ्यांनी मिळून बिचवर जायचं ठरलं इथला शारजाहचा समुद्र पाहिला नव्हता अजून म्हटलं चला भेटून येऊया...हो मी समुद्रावर फिरायला जात नाही कधीच त्याला भेटायला जाते असंच वाटतं नेहमीच मला. कारण याच्यासोबत किती वेळ काढला तरी मन भरत नाही, किती तरी गोष्टी सांगतो आम्ही एकमेकांना. तर जेवण वगैरे पॅक करून आम्ही आमच्या शारजाहच्या घराजवळच असलेल्या बिचवर पोचलो. सोसाट्याचा वारा सुटलेला आभाळ भरून आलेलं..गाडितून उतरे उतरेपर्यंत आमची पोरं धूम समुद्राच्या पाण्यात भिजायला पोचली पण. अरे ढग आलेत गार आहे म्हणे पर्यंत भुरभुर सुरु झाली टपोरे थेंब पडायला लागले आणि धो-धो कोसळायलापण लागला.

अरे ही काय वेळ आहे यायची? कधीही काय? ऋतू कुठला वेळ कुठली आणि तुझं आपलं तिसरंच..पळापळी करून गाडीत बसायला आलो तर यानं सगळ्यांनाच चिंब भिजवून टाकलेलं.गम्मत वाटली...
मी आपली मनातच बडबडले

"चल पळ मी समुद्रावर समुद्रात भिजायला आलेय पावसात नाही काही, आत्ता इथे तुझं कोणाला कौतुक? काहीही काय..मला नाही भिजायच पावसात."

पण तू एवढा विचार करायला अवधीसुद्धा दिला नव्हता "झिम्माड झिम्माड"

गाडीतनं उतरून पुन्हा उलटपावली समुद्रावर, पाय बुडेल एवढ्याच पाण्यात गेले सुखावणारा वाट्ला स्पर्श..मग अजून पुढे विजेच्या लखलखाटात याचं आपलं चालुच बघ बघ मी जिंकलो की नाही? मीपण हट्टी समुद्रात डुबकी मारून याला वेडावून दाखवत म्हटलं मी समुद्रातच भिजले होते तुझ्यात नाही काही!!!!!!!!

जपमाळ

नाहीयेस कुठेही
सगळ्या नुसत्या कल्पनाच आहेत
समोर जे दिसतंय तोही केवळ भास,
समजावतीये मी मनाला,
पण मग प्रत्येक श्वासाबरोबर
अपोआपच ओढल्या जाणा-या या जपमाळेच काय?
हेही थांबवायला हवं...