एकच व्हावा घाव सणाणून


एकच व्हावा घाव सणाणून श्वासही जावा क्षणी ओसरून
प्रश्नही सुटतील, सरतील आशा; नसता जीवन कुठे निराशा?
त्या आधीपण असे घडावे; ओल सुकावी हृदयामधली,
स्नेह नसावा कोणाचाही,लोभ सुटावा सगळ्यामधला..
नको कुणीही मार्गावरती हाक मारण्या पाठी येवून

रेंगाळत मी उगाच फिरता; आठवतील मग जुनीच गाणी
आणि कुणाला तश्यात माझ्या डोळ्यातील मग दिसेल पाणी
पुन्हा नव्याने घडेल सारे, पुन्हा वाढतील व्यर्थ पसारे
बास जाहले अता ईश्वरा! नाही समजत तुझे इशारे...
काय हशिल तू सांग एकदा; अजून राहू कितीक थांबून?

एखादाच शब्द...एखादीच ओळ..

कविता सुचताना....वा सुचत नसताना ; सुचलेलं काहीतरी, कसही काहीही म्हणता येईल.

कवितेची पहिली ओळ लिहून झाली की आपलं माकड. मग त्या ओळीच्या, शब्दाच्या मागे मागे अगदी दूरदूर भटकत कुठल्या कुठे....कुठलातरीच प्रवास,  डिलिटवर क्लिक करुन  नजरेआड  सरकवलेला अमर्यादित कचरा. छे! छे ! नाद सोडायला हवा या बाईचा. कायच्या काय कटकट नायतर .

ती खेळवत राहते आपल्याला. अगदी नवीन नवीन लिहायला लागल्यावर,  लहान मुलाच्या हातावर अगदी खडीसाखरेचा खडा ठेवल्यावर सुद्धा त्याचे डोळे लकाकतात तशी  पदरात एखादी ओळ पडली तरी वाटत; आहा!..वा! वा!, क्या ब्बात है! छे भलतच, फारच मस्त  लिहिलय की आपण. चला चला पुढे...बास झालं रेंगाळणं.

इथेच फसलात तुम्ही  हो अगदी मस्स्स्स्त फसलात...जराशी पाठ  थोपटते आणि आपल्याला पुढे फरफटत नेते
ही कविता. मग त्या त्या कवितेच्या मूडप्रमाणे तुमच पुन्हा माकड , हम्म!

मग पुढली ओळ....अजून पुढे...अजून पुढे......अडकलात पुरते आता सुटका नाही. ही कविता तुम्हाला आयुष्य देऊन जाणार (का आयुष्यच होऊन राहणार)?

 कायच्याकायच खरं  तर, लिहिणा-यांच काय म्हणणय म्हणे?

कधी उगाचच..

कधी उगाचच असे वाटते व्हावे सुरेल गाणे..
कधी उगाचच कसे वाटते रहावे उदासवाणे?

कधी उगाचच कशी पडावी जगावेगळी स्वप्ने?
कधी उगाचच बरे वाटते भ्रमात ऐसे जगणे

कधी उगाचच वाटून जाते  जवळ  असावे कोणी
कधी उगाचच असे वाटते  हरवावे घनरानी 

कधी उगाचच हवी वाटते ग्रीष्मामधील तृष्णा
कधी उगाचच जाळून जातो  नभीचा  चांदण उष्मा

कधी उगाचच असे कशाने गंधीत होते अंगण
आणि उगाचच असे वाटते भेटून गेला साजण..

कधी उगाचच असे वाटते चंद्र लपेटून घ्यावा..
कधी वाटते आकाशी  ता-यावर झोका घ्यावा

कधी उगाचच झूठ वाटती कवितेमधल्या ओळी
कधी उगाचच डोळा पाणी निरभ्र संध्याकाळी

कधी उगाचच...

नेमाने घडते सारे..

नेमाने घडते सारे..थांबले कुठे ना काही
तरीही सलते अजुनही आता; नाहीस तू  आई

प्राजक्ताचा तसाच दरवळ
वेलींवर फुलतेही जाई...
नाहीस तू ; तरीही...आई

अंगणातली तुळस तुझ्या ग
आता गाते अंगाई
नाहीस तू; म्हणून आई

दार काढते दृष्ट आता अन
आशीर्वाद उंबरा देई
नाहीस तू; म्हणून ...आई 

व्यथा अशी ही सरेल कैसी?
उत्तर मिळते; नाही
दिन ढळताना, क्षण सरताना
झरते बघ ही शाई...नाहीस तू आई

कागद....शाई

अचानक आज वाटलं चला लिहाव काही
छे! परत तेच..

कोरा नसलेला कागद आणि काळीज ठीबकणारी शाई

घर अजून आहे तसेच दरवळणारे

दूरच्या दिशांनी धाडले सुगंधी वारे
मन पाखरागत झाले उगाच भिरभिरणारे
हे स्वप्न असावे म्हणू तरी मी कैसे
घर अजून आहे तसेच दरवळणारे