उत्तर
काळावर सोपवून दिलेलं असतं ब-याचदा
मग तेही एखाद्या सन्यस्तासारखी समाधी घेउन बसून राहतात
मनाच्या तळघरात,
वरकरणी आपणही सोडुन दिलेला असतो नाद,
अन अचानक,
डायरीतल्या आवडत्या पानात दडपुन ठेवलेलं
जाळी पडलेलं नाजुक पिंपळपान सापडावं तसं....
त्या प्रश्णाच उत्तर अलगद सापडलेलं असत आपल्याला
......आपल्याही नकळत.
वेड पांघरण्यात होता वेगळा वेडेपणा
दोन रात्रितील आता संपला वेडेपणा
वेड पांघरण्यात होता वेगळा वेडेपणा
वाजली वेडी कडी अन दार हे शहाण्यापरी
मोगरा माळुन आला देखणा वेडेपणा
उंबरा ओलांडताना धिट हे झाले धुके
हि धिटाई झेलताना लाजला वेडेपणा
अजुन मजला कळत नाही वेड कोणी लावले?
वेड मज हा लावणारा कोणता वेडेपणा.
कवि:-प्रविण दवणे
समुद्र
तसा माझ्यावर परिणाम होऊ देत नाहीच मी वादळांचा,
कित्येक येतात आणि जातात ,
तुझ्यासारख एखादच माझ्या अथांगतेला भेदत;
बेभान,बेफाम,सगळ पणाला लाऊन माझ्यात सामाऊन जाणारं,
मग काही वेळासाठी कळत नाही जगाला,
कोण मी आणि कोण तू,
तुझ्यातला आवेग निवल्यावर
तू तुझ्या वाटेनी आणि मी..........
तीथेच होतो तिथेच,
थोडासा शांत थोडासा अस्वस्थ,थोडा उध्वस्त
काहि वेळासाठी का होईना, होतो परिणाम माझ्यावरहि
आकाश
कायम शांत निवांत असलेलं;
दुरुनच जगाच निरीक्षण करणारं,
याच्यार्यंत वादळबिदळ पोचतच नसणार बहुदा
आणि आलंच वादळ तर भीक न घालणारं
तेच बरय;
वादळाला शांत राहता येत नसतच म्हणा कधीही
आकाशानं शांतच राहायला हवं?
चारोळी
जेंव्हा जेंव्हा ठरवावं
लिहू नये काही,
तेंव्हा अजूनच गहिरी
होऊन पाझरते शाई!!!
व्यसन
आम्ही दोघांनी एकमेकांच
मी तरी जरा बरीच असते
ते नसतात तेंव्हा
पंण त्यांना मात्र करमत नसावं
माझी भेट घेतल्याशिवाय;
न चुकता येतातच डोळ्यांत
रोजच
प्रश्ण
खरतर कुठेच काही नसत कमी
पण काहितरी हरवतय
वाटतं मनोमनी
काय म्हणावं याला.... ?
अवस्था केविलवाणी,
सांगेल का मला याच उत्तर कुणी?
चारोळी
हे अस कधी कधी
फार उपरं उपरं वाटतं
का कोण जाणे पण
आभाळ मनात दाटत
चारोळी
बघ सुर्यही सोडुन आला
दिशांतील अंतरे
त्यासही कळती झाली
मौनांची भाषांतरे!
चारोळी
प्रत्येक वेळी का असावा
मनाला पार्याचा गीलावा
तुझ्याआधीच मला कळावा
तुझ्या मनाचा कांगावा?
ठेवा
किना्-यावर बसून कल्पनाच करायच्या
तू किती दूरवर आणि कुठे कुठे पसरलेला असशील?
लडिवाळ लाटांमध्ये कधी भिजायचं कधी कोरडं राहायचं
उधाणुन आलास की , कवेत घ्यायचं
गेलास की सोडून द्यायचं
डोळ्यात आठवणींना घेऊन बसायचं
खाऱ्याच त्याही तुझ्यासारख्या
किनारा सोडताना स्वच्छ हात पाय धुवावे आणि परतावं म्हणल तर
जाणवतं थोडी वाळू चिकटलीये तळव्याला...
देठ
चैत्रपालवी किंवा श्रावणसरी नाहीच व्ह्यायचंय,
शिशिरात होते ना पानझड पानझडीत गळणार पान,
त्या पानाबरोबर गळून पडणार देठ,
तेवढंच व्हायचय मला........
कारण जाता तरी येईल कमीत कमी त्याच पानाबरोबर
मला
ऋतु येत होते ऋतु जात होते http://www.maayboli.com/hitguj/messages/75/123530.html?1173358205
मायबोली या संकेतस्थळावर वैभव जोशी यांनी घेतलेल्या कार्यशाळेतली ही गझल. स्वाति अंबोळे आणि वैभव या दोघांना अनेकानेक धन्यवाद . यांच्याशिवाय गझल लिहिणं मला शक्यच नव्हतं.
ऋतू येत होते, ऋतू जात होते
मनाचे परी गाव ग्रीष्मात होते
पुन्हा खेळ झाला उन्हापावसाचा
पुन्हा साठले नीर डोळ्यात होते
उसासा जरा वेस लांघून गेला
तुला वाटले जोगिया गात होते
तशी मी कधी काय तक्रार केली
तुझ्याही कुठे काय हातात होते?
कितीदा नव्याने पुन्हा खेळ मांडू?
कशी हार प्रत्येक डावात होते?
अता स्पंदनांचे उगा दाखले का?
तसेही कुठे प्राण देहात होते?
निवडुंग
एक झाड दिसलं मोठं डौलदार,
स्वत:च वेगळेपण दाखवून देणारं,
कदाचीत वेगळेपणामुळेच असेल
पण आवडुन गेलं फारच
रोज मायेनं खतपाणी करायला लागले,
तसं तसं सुकायला लागलं......
जरासा उशीरच झालाय
पण आलय लक्षात,
निवडुंगाला का कुठे गरज असते असल्या सगळ्या गोष्टींची?
म्हणे मी कविता करते
नसल जवळपास कुणी की
एकट्यानीच बडबडायच
कधी त्याला कविता
तर कधी वेड म्हणायच
चारच ओळी झाल्या तर
थोडस पाणी घालुन वाढवायच
इकडुन तिकडुन शब्द शोधुन
कडव हळूच चढवायच
कधी हिंदी तर कधी
संस्कृताने थोडस मढवायच
छान माझी कविता म्हणुन
प्रत्येकाला पढवायच
अपेक्षा
मावळत्या प्रत्येक दिवसाला
वचन द्यायचं
उद्यापासुन नाहीच ठेवायच्या
काही अपेक्षा
आणि हा "उद्या"येईल
ही अपेक्षा करत रोज वाट बघायची
उद्याचीच...
चारोळी
आठवांचा गाव आहे?
हास वेड्या, बघ जगण्या
अजुनी जरासा वाव आहे
चारोळी
मन स्पर्शले मनाला
देही वसंत फुलला
स्पर्शावीण की रे जणु
मधुमास हा रंगला
चारोळी
सांगु नको अजुनी
वादळाची कारणे
अपुरीच घातली तू
भोवताली कुंपणे
एक ना धड.........................
मग काय कराव याच उत्तर गेल्या आठवड्यात असच भट्कायला गेलो होतो तिथे छान जवळुन विमानं उतरताना दिसतात. मोबाईलच्या Cam नी फोटु काढायचा प्रयत्न केला , काही छान आले काही बरे आले , मग म्हंटल चला चांगला cam घेउन टाकु या , तशी मी छानच फोटो काढते (इती आमचे बंधुराज, तसं त्याच्या दृश्टीनी मी लिहितेही चांगल:D) तसही वाढदिवस होताच मग नव-याला कापायची एवढी सुवर्णसंधी कोण सोडणारे :D
त्यानी एकदम कौतुकानी विचारल "हं! काय मग काय घ्यायच वाढदिवसाचं" मी जरा सावधपणे "मला ना जरा चांगला digi cam हवाय हो!"
नवरोबा एकदम चाटच आता या बयेला नक्की काय झालय म्हणुन?
साड्या,ड्रेसेस, एवढच नाही तर हि-याचे ,मोत्याचे दागिने हे सगळ सोडून अचानक हे camera घ्यायच खुळ कुठुन डोक्यात आलय?(इथे त्याला माझ्या "सवयीची" किती सवय झालीये हे लक्षात येत ना तेच हो आपलं "एक ना धड भाराभर.........."):D
तो अगदी मला सोन्या राजा करुन समजावायचा प्रयत्न करत होता "आपण अस करु या का? तुला मी पैसे देउन ठेवतो पाहिजे तर पण जरा नंतर घेउ या का cam? ( हे अश्यासाठी की आधिचे ४ camere पडलेत घरात हा पाचवा )
पण मी ऐकेल तर ना !मला cam हवाच होता तो पण मला हवा तसा . शेवटी हो नाही करत ५-६ malls ना भेटी देउन झाल्यावर आणि नव-याचा brain wash करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यावर, एकदाचा जरा स्वस्तातलाच(माझ्या मते :( मला हवा तसा नाहीच हं आणि) camera घेतला मी.
इथुन पुढे मी काढलेले वेडेवाकडे फोटु पहायची तयारी ठेवा लोकहो.
तर एवढा पोस्ट प्रपंच कशासाठी ,जे या blog ला भेट द्यायला येतात त्यांना सावध करण्यासाठी :P
आता हळव्या कविता, चारोळ्या,गझल हे काही वाचायला मिळायच नाही बहुदा :)
तेंव्हा माझ्या या blog ला पुन्हा भेट द्यायची की नाही ते आधीच ठरवून घ्या म्हणजे झालं.