अर्चना

तिच्या पिलाकडे बघून राहून राहून वाईट वाटतंय. गळ्यात फास अडकवून घेताना नजरेसमोर एकदाही त्याचा चेहरा आला नसेल ? त्याचे विचार आले नसतील डोक्यात? एवढ्या अफाट जगात आपलं पिल्लू एकटं पडेल त्याच्याकडे कोण बघेल? परक्या देशात आहोत आपण आपलं बाळ काय करेल? हे आणि असले बरेचसे प्रश्न अजूनही मनात घोळतायत .

मी एवढे दिवस राहत असलेल्या आधीच्या अपार्टमेंटमधल्या आमच्याच ग्रुपमधल्या एकीने गळ्याला फास लावून घेतला.. हे ऐकताना ५० चेहरे तरळून गेले डोळ्यापुढे, नक्की कोण हे कळेपर्यंत सगळ्या मैत्रिणी दिसायला लागल्या , सहजच बोलता बोलता बोलून गेलेल्या मनात सलणाऱ्या एकेकीने सांगितलेल्या स्वतःच्या गोष्टी आठवल्या. पंधराच मिनिट लागली नक्की कोण ते कळायला. पण त्या पंधरा मिनिटातली ही अवस्था आणि कोण ते कळल्यावर विश्वासच बसेना.

ती..... एवढी हसतमुख आणि बडबडणारी, सारखी बिल्डिंगभर फिरणारी. मस्तपैकी ढोलक वाजवणारी, त्याच्या तालावर मनसोक्त नाचणारी. स्वतः: फारसं शिकलेली नव्हती पण आपल्या मुलाने खूप शिकावं स्वतः:ला जमत नसतील त्या गोष्टीत प्रसंगी शेजारणींची मदत घेऊन त्याचा अभ्यास घेणारी.

एवढं कायच झालं असेल तिला? काय डाचत असेल? कोणाशीही बोलाव असं न वाटता सरळ स्वतः:ला संपवण्याचा निर्णय घेण्यापर्यंत तिला काय त्रास होत असेल? एक ना अनेक प्रश्न डोक्यात गरगरतायत.

बरं हे सगळं करायच्या आधी मुलाला घेऊन बाहेर पार्किंगमध्ये फिरली, त्याच्यासोबत खेळली, बाकीच्या बायकांशी गप्पा मारल्या आणि नवरा काही कामासाठी बाहेर गेला तेवढ्या वीस मिनिटात सगळा खेळ खलास.

कोणी म्हणतं दोघांच पट्त नव्हतं, कोणी म्हणत तिला भारतात जायच होतं, कोणी म्हणत त्यांचा बराच जुना प्रॉब्लेम होता, माणूस अतिशय चिक्कू आहे पैसा द्यायचा नाही, तिला घरी पाठवायचा नाही, वागणं नीट नाहीये त्याचं. हे असं असताना , बाई नवऱ्याची काळजी घ्यायला विसरली नव्हती;जाताना चिट्ठी सोडून गेली "माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाहीये" .

"माझी आई कुठय?" असं विचारल्यावर, त्या पाच वर्षाच्या बाळाला " तुझ्या आईला दवाखान्यात नेलय; हे खोटं सांगताना; माझ्या बाकीच्या मैत्रीणिंची काय अवस्था झाली असेल ही कल्पनाही करवत नाहीये. ज्यांनी तिला लटकताना बघितलं त्यांची तर त्याहूनही वाईट अवस्था .

ही बातमी ऐकल्या ऐकल्या प्रत्येकाने तिला शिव्या दिल्या, हे काय असलं वागणं म्हणून, पण मला राग नाही आला, वाटलं , किती सहन केल्यावर या निर्णयापर्यंत आली असेल ती.

अजूनही सुटका नाहीच झालेली तिची. सगळ्या औपचारिकता पूर्ण होईपर्यंत अजून ४-५ दिवस लागणार आहेत. घरचे कोणीही येउ शकत नाहित. ही अजूनच वाईट गोष्ट.

जीव गेला तरी देहाचे भोग संपलेले नाहियेत .

श्शॉई :)

सक्काळी साधारण आठ ते साडेआठच्या दरम्यान फोन वाजतो, आणि साहेब बोलायला लागतात"
मन्नाSSSSS....हSSं.....पापाशSS...(पाणी)बाबाशSS(बाबा जे काही खातोय ते बाबाश)....भाSSता...आssई स्श्यांबी(शांभवी)...हSSम्मा....आवाSSझ्य...आल्लाहूबर्र्र्र्र्र्र्र.....(हे म्हणजे समोरच्या मशिदीतन येणारा आजानचा आवाज) :) हे साहेब म्हणजे कोण तर माझ्या भावाचा दीड वर्षाचा मुलगा.
उजाडलं की बाबाचा ऑफिसचा फोन घेऊन आई आणि बाबाच्या मागे याची भुण-भुण सुरू होते.
भावाच्या ऑफिसचे फोन चालू होतात सकाळपासूनच. एके दिवशी त्यांनी मला फोन लावलेला असताना सहजच या साहेबांना फोन दिला तर तेव्हा पासून ठराविक वेळ झाली की याचं गाणं सुरू होतं मन्ना फोन मन्ना फोन म्हणून.

दिवसभर घरभर दंगा करत फिरत राहतो, माझी वहिनी अक्षरशः: हैराण होते त्याला आवरून आवरून. खरंच आपल्याला बाळकृष्णाच्या एकेक खोड्या ऐकताना काय मजा वाटत असते. पण आमच्या या कृष्णाचे प्रताप आवरायचे म्हणजे बाप रे बाप!

एकदा असंच फारच त्रास दिला त्याच्या आईला त्यानं, म्हणून थोडंसं धमकावलं मी त्याला मग इवलंसं तोंड करून उजवा हात डावा कान डावा हात उजवा कान असे कान पकडून साहेब स्वतः: होऊन समोर येऊन उभे राहिले, बोलायचं नाव नही शेवटी मीच विचारलं काय रे काय करतो?" , तर म्हणे "मन्ना श्शॉई अश्ज गु....ब्बॉय(अक्षज गुड ब्बॉय)" :)

सध्या मी भारताबाहेर आहे. आठवण येते रे बाळा तुझी :)

गोकुळवाटा

दोघेही तुडवित गेलो, त्या अवघड गोकुळवाटा
नात्याचा आपुल्या राधे भलताच इथे बोभाटा

राधा - कृष्ण हा एक अनुबंध.. प्रेमभावाची लोकविलक्षण गाथा.
युगानुयुगे अम्लान राहिलेली कथा.
शतकानुशतके हा कवींचा आवडता विषय राहिलेला आहे.
कुणी त्यात भक्ती पाहिली, कुणी प्रीती. कृष्णाची रासक्रीडा ही केवळ देहक्रीडा नव्हती तर तर ती एक भावलीला होती.
चित्त प्रसन्न करते ती राधा.. आणि चित्त आकर्षित करतो तो कृष्ण.
राधा कृष्णाची भक्त, प्रेयसी, सखी की याहून अधिक काही?
प्रेमाची अविरत धारा म्हणजे राधा....
ज्याचे ह्रदय कृष्णाचे त्याचीही एक कुणीतरी राधा असतेच आणि राधाह्रदयात कृष्ण असतोच.

राधा-कृष्ण या नात्याचा काव्यात्म वेध म्हणजेच गोकुळवाटा.
प्राध्यापक श्री. लक्ष्मीकांत तांबोळी यांचा 'गोकुळवाटा' हा काव्यसंग्रह म्हणजे राधाकृष्णाच्या नात्यातलं गूढ समजून घेण्याच्या ध्यासात कवीला सापडलेली अशी ही गोकुळवाट. कविता आणि त्या कवितांचं निरुपण असं वेगळंच स्वरूप. काव्यसंग्रहाची ही एवढीच ओळख पुरेशी. पण नुसत्या काव्यसंग्रहाचीच नाही, तर त्याहीपुढे जाऊन डॉ. पराग श्रीराम चौधरी यांनी सरांच्या शब्दांवर केलेले सुरांचे सुरेल संस्कार. आणि प्रत्येक कवितेचं सरांच्याच शब्दातलं निरुपण ऐकणं म्हणजे फार मोठी पर्वणीच.

'गोकुळवाटा' या नावातच संमोहित करण्याच सामर्थ्य आहे. कोजागिरीच्या दिवशी मला सापडलेली ही वाट तुमच्यापर्यंत पोचवायचा एक प्रयत्न. आजपर्यंत राधा-कृष्ण या विषयावर कित्येक प्रकारचे कार्यक्रम झालेही असतील, पण ही वाट आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जाते आणि आपण भानावर येतो तेव्हा नि:शब्द झालेलो असतो... "

कार्यक्रम सुरु होतो अर्थातच श्रीकृष्णाच्या लाडक्या बासरीच्या सुरांनी, आणि त्या सुरांची सोबत करत डॉ. पराग आणि त्यांचे सहकारी श्रीकृष्णाचं नामस्मरण करतात. हे संपत असतानाच तांबोळी सरांच्या निरूपणाला सुरवात होते "गोकुळवाटेवर चालणारे आम्ही, आपलं मन:पूर्वक स्वागत करत आहोत." इथे कृष्ण कसा हे सांगताना तांबोळी सर श्री वल्लभाचार्यांच्या ओळींनी सुरवात करत म्हणतात, "कृष्ण कसा? तर ज्याचं सगळंच मधुर आहे असा...." पहिल्या गीताच्या आधी ते म्हणतात "घरोघरी सत्यभामा, रुक्मिणी भेटतातच. भेटत नसते ती राधा. आपणापैकी कुणाला ती भेटली असेल तर तुम्ही भाग्यवान. नसेल तर मनातली राधा सांभाळावी, तिला बाधा होईल, असे काही करु नये. प्रेम असल्याचं रुक्मिणी किंवा सत्यभामा यांनाच पटवून द्यावं लागतं. राधेला त्याची गरजही नसते." पुढे ते म्हणतात, "तुम्ही आम्ही कोणी वेगळे नाहीत हो... अपुल्यातच असते राधा, अपुल्यातच असतो कृष्ण.. मन वृंदावन करण्याचा इतुकाच आपला प्रश्न..!"
व्याधाचा बाण लागल्यावर त्याला सत्यभामा किंवा रुक्मिणी आठवत नाहीत. त्याला आठवते ती राधा.. आणि तो म्हणतो... आपल्या सुमधुर आवाजात डॉ पराग इथे पहिल्या गीताला सुरवात करतात.

"फार उशीरा आलिस राधे रास येथला सरला
गोकुळातला कृष्ण तुझा तो पहिला नाही उरला
विजन जाहले कुंजवनाचे कदंब सुकले सारे
कृष्णाअंगी भरले आता कुरुक्षेत्रिचे वारे
नाचुन नाचुन मोर थांबले झडले सर्व पिसारे
काजळकिमया ओसरली ग डोहकाळिमा पसरे
उशीर झाला तुला राधिके, कृष्ण बुडाला डोही
मोरपीस हरवले कुठे ते, तोच शोधितो बाई"

राधा आली, पण तो कृष्ण? कृष्ण पहिला राहिलेला नाहिये, मोरपीस हरवलंय आणि त्या मोरपिसाच्या शोधात राधा हिंडतेय. यमुनातीरी वणवण भटकतीये. तो नाहीये पण तिला वाटतंय तो आहे, तो इथेच आहे, आणि ती म्हणते,
" यमुनातीरी घनवनराई
तेथे श्याममुरारी
राधेसाठी सदैव त्याच्या
ओठांवर बासरी
विरहविदग्धा व्याकुळ राधा
कृष्ण कृष्ण जपणारी..."

तर अशी ही कृष्णासाठी फिरणारी राधा ही एकच नाही अश्या गावोगाव असंख्य राधा आहेत राधाकृष्ण हा एक सहवासयोग आहे,"मीरेला ऐतिहासिक आधार तरी आहे पण राधा.... ही तर गाथांमधली, लोककथांमधली एक सर्वसाधारण स्त्री. प्रीतीची रीत मीरेकडून शिकावी की राधेकडून?" तर इथे राधेची सरशी होते आणि सर राधेबद्दल बोलताना म्हणतात "प्रेमाची अविरत धारा म्हणजे राधा! "
"प्रेमाचा अर्थ कळाया, लागते न जग धुंडाया" ते आपले आपल्यालाच कळते आणि गीत सुरु होतं..

"तू गाथेमधली राणी
यमुनेचे अवखळ पाणी
तू पाखरचोचीमधली
की तहान केविलवाणी?
मी दिले न काही तुजला
तू मागितलेही नाही
प्रेमाची तुझिया राधे
ही रीत अनोखी बाई!
प्रेमाचा अर्थ कळाया
लागते न जग धुंडाया
वृंदावन, गोकुळ अजुनी
येतील साक्ष ही द्याया"

पुढे राधेबद्दल बोलताना ते म्हणतात,"सार्‍या अस्तित्वाला मिटवू्न टाकून गोकुळमिठीत शिरायचे हे केवळ राधेलाच शक्य होतं. कृष्णाला भेटायला जाण्यासाठी राधा शृंगार करते, नटते-मुरडते, आणि हे सगळं बघण्यासाठी तिला आरशाची गरज भासतच नाही. ती कुठे बघत असेल? राधा आरसा बघत नाही, ती स्वतःला कृष्णाच्या डोळ्यात बघते. तिच्यासाठी आरसा कृष्णच आहे. अशी ही कृष्णमयी राधा.. तिच्या श्वासात कृष्णाचाच वावर.. पदर धरणारा, पदर ओढणारा, पदर उडवणारा आणि पदर धरून चालणाराही कृष्णच. कृष्णाभोवती फिरणार्‍या गोपिकांना गणती नाही. पण राधेचे काही औरच. कृष्णाला मिठीत घेण्यासाठी ती उत्सुक, त्याहून तिच्या मिठीत येण्यासाठी कृष्ण आतूर.... हे राधा ओळखून आहे. असा हा राधेचा पारदर्शी चांदणशेला....."

राधा म्हणते,
"डोळ्यांचा तुझिया ऐना
मी त्यात पाहते मजला
भाळावर झुलते बिंदी
मी त्यात जडविते तुजला
नि:श्वास श्वास हे माझे
नित त्यात तुझा रहिवास
खेळली न तसली कोणी
मी असा खेळले रास
तुजसाठी पैंजण पायी
तुजसाठी काजळ डोळां
भेटींस तुझ्या मी येते -
घेउनिया चांदणशेला"

राधाकृष्णाचे नाते मोठे लोकविलक्षण आहे आणि तितकेच मोहक. युगायुगांची प्रेमगाथा. दोघेही परस्परांचे आधार नि एकमेकांवाचून निराधार. 'गीत' आणि 'गीता' यात केवळ एका कान्याचा फरक पण केवढा मुळालाच हादरा बसतो! गीतात गुंतायचे की गीतेत अडकायचे -भोग की त्याग? संग की निसं:ग? कृष्णानी गीत गायले ते राधेसंगे आणि गीता सांगितली ती राधा नसताना... आता काय घ्यावे हे ज्याने त्याने ठरवावे.

संगीतात एक राग सारंग आणि त्याच्याच भिन्न प्रकारातील एक वृंदावनी सारंग.... ध्यास, वेड, तंद्री, नाद, छंद हे सारे मोठे गोड पण तितकेच ते जीवघेणे. बरेच दिवस झालेत आपली आणि राधेची भेट झाली नाही हे जाणवतं त्याला आणि तो म्हणतो..

भेटीस आपुल्या राधे
किती युगे लोटली सांग?
मी अजून आळवित बसलो
हा वृंदावनी सारंग!
तू कळी, देठ मी राधे
आधार कुणाचा कोणा?
फुलताना कधी न कळते
कळते पण ओघळताना
तू 'गीत' दिले मज बाई
मी केली त्याची 'गीता'
कान्हाच होऊनी 'काना'
गीतेत अडकला आता!

या आणि अशा अनेक कवितांमधून कधी राधेचं तर कधी कृष्णाचं स्वगत, सरांच्या शब्दांतून आणि डॉ. पराग यांच्या सुरांतून रेशीमलडींसारखं उलगडत जातं. आणि कळसाध्यायाची वेळ, शेवटी ती वेळ येतेच -निरोपाची.... डॉ. पराग भैरवी चे सूर लावायला लागतात, तर सर म्हणतात,"हातातली काठी सोडावी आणि मुरली घ्यावी.. गोकुळवाट आपोआप सापडत जाते"..

"योगेश्वर मी अखिलाचा
पण शरण तुला मी आज
हातात तुझ्यास्तव मुरली
हा मोरपिसांचा साज!
तू मला घुसळले राधे
अलवार कोवळे धागे
श्वासांच्या झुल्यावरती
हिंदळलो आपण दोघे!"

कार्यक्रम संपलेला. सगळेच प्रेक्षक संमोहित झाल्यासारखे तसेच बसलेले. आम्ही चौकशी करतो - पुन्हा कधी आहे हा कार्यक्रम?

वेळूबन गावोगावी
वृंदावन एकच असते,
काठ्या तर हातोहाती
मुरली पण एकच असते!

काव्यसंग्रह : गोकुळवाटा : प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी
संगीत/गायन : डॉ. पराग श्रीराम चौधरी
सौ. मीनाक्षी पराग चौधरी

या रचना प्रा.लक्ष्मीकांत तांबोळी यांची परवानगी घेउनच इथे उद्धृत केल्या आहेत. कुणाला या पुन्हा वापरायच्या असतील तर पूर्वसंमती आवश्यक
************************************************************************************

कधी कधी

कधी कधी
एखादं पुस्तक वाचता वाचता
गुंतून जातो आपण
त्यातल्या पात्रात स्वतःला पाहतो;
अगदी फार हळवं होऊन कासावीस होतो तर
कधी मोहरूनही जातो.
आणि...
पुस्तक संपत वाचून
अचानक प्रचंड पोकळी
काहीशी तगमग..उलघाल
मग, आपण बजावतो स्वतःला
संपलीये कथा आणि बंद केलंय पुस्तक!
त्या पुस्तकाला थोपटतो जरासं
आणि हळूच बाहेर पडतो त्यांतून
होतं असं..कधी कधी!

थांबलो आहे खरा

थांबलो आहे खरा पण घेतली माघार नाही
वाकलो आहे जरासा जाहलो लाचार नाही

काय सांगू, बोलताना तोल जातोही अताशा
आणि मौनाचा कधी मी घेतला आधार नाही

काय प्रश्नाचीच येथे चालते बेबंद सत्ता?
उत्तरे मिरवील ऐसा एकही दरबार नाही?

बास आता फार झाले, वाट बघणे जीवनाची
मांडली माझी कथा मी, नोंदली तक्रार नाही

टेकवूनी लाख डोकी, पाय झाले जीर्ण पुरते;
आणि म्हणती, "सावळ्याला भावनेचा भार नाही!"

नित्यनेमे रोज दारी पालखी ये आठवांची
प्रेमभावे वंदितो मी, सोडला व्यवहार नाही

वादळाला सवय झाली सोबतीने चालण्याची
ते मुळी सोशीक आणिक; त्रास माझा फार नाही

चारोळी

काही लिहावे म्हणून
होई लेखणी आतूर
हाय हाय अश्या् क्षणी
शब्द शब्द की फितूर

चारोळी

एक एक शब्द माझा
आज माझ्याशी भांडला
कसे कळेना यालाही
किती जीव हा कोंडला

पुरावा

तसं म्हटलं तर दोष देता येईल कुंपणाला
आणि नावही घेता येईल वादळाच.
पण समजा;
अस्तित्वाचाच पुरावा दाखवायची वेळ आली;
तर.
दाखवता येईल की,
कुंपणाच्या आत पडलेला दगड-विटा आणि मातीचा ढिगारा!

आवडलेले थोडे काही

यशोधरानी दिलेला खो पुढे चालवत आवडती एक(च) कविता पोस्ट करतिये, जाचकच आहे हा नियम पण तसं म्हटल तर अक्ख पान भरेल आणि मन भरणार नाही. असो.
************************************************************************************
१. कविता आवडते पण पुर्ण आठवत नाही आणि हाताशी पुस्तकही नाही? हरकत नाही, आठवतं तेव्हढं लिहा. कवीचं नाव मात्र आवश्य लिहा

२. एक से मेरा क्या होगा सिन्ड्रोम? या वेळी तुम्ही तुमच्या सध्या आवडणारया टॉप २ कविता लिहु शकता आणि कवितांच्या प्रमाणात खो देखील देऊ शकता. जेव्हढ्या कविता तेव्हढे खो (जास्तीजास्त अर्थात २)

३. खो खो नीट चालवण्याची जबाबदारी अर्थात सारयांचीच. त्यामुळे तुमच्या पोस्ट मधे तुम्ही ज्या/जिला खो देताय, त्या/तीचं नाव तर लिहाच, शिवाय त्या/तिच्या ब्लॉगवर ही खो दिल्याची नोंद आवश्य करा

४. कविता का आवडली किंवा कवितेचा अर्थ किंवा काहीच स्पष्टीकरण आपेक्षित नाही

५. अजून नियम नाहीत :)

**********

असेच हे

असेच हे कसेबसे
कसेतरी जगायचे
कुठेतरी..कधीतरी
असायचे,नसायचे

असेच सोससोसता
हसून हासवायचे
असेच हासहासता
हळूच विव्हळायचे

असाच राहणार मी
जिता तुरुंग आपुला
अशाच बाळगीन मी
सुटावयास शृंखला

असाच हा गिळायचा
गळ्यामधील हुंदका
कसेबसे तगायचे
धरून धीर पोरका

अशीच येथली दया
हवीत चाचपायची
अशीच जीवनास ह्या
पुन्हा क्षमा करायची

असाच श्वास तोकडा
पुन्हा पुन्हा धरायचा
असाच जन्म फाटका
पुन्हा पुन्हा शिवायचा


सुरेश भट.





माझा खो जयुला http://maajhime.blogspot.com/

कोलाज

तुकड्या तुकड्यात विखुरलेलं अस्तित्व
गोळा करून उभं करावं स्वतःला,
म्हणून जोडत गेले एकेक ;
जुळतंही गेला प्रत्येक तुकडा.
नकळत मनानं पावती दिली
सुंदरच जमलंय...कोलाज!

लिहीत जातो कशास आपण?

ही कविता सुचण्याला कारण, मेघनाचा खो :) धन्यवाद मेघना

लिहीत जातो कशास आपण?
लढवत बसतो शब्दांचे रण

शब्द पाहावा शब्दच गावा
शब्दातच जिवलगही दिसावा

कधी भासते लिहिणे मृगजळ
कधी ठसठसे जखमच केवळ

लिहून टाकू, होउ मोकळे
कळून येते जडावलेपण

कधी लांबते कधी थांबते
शब्दांचे हे अवघडलेपण

शब्दच कुंपण शब्दच शिंपण
शब्दच हरिमुरलीचे गुंजन

शब्दच तारा शब्दच वारा
काजळरात्री शब्द सहारा!

लिहीत जातो कशास आपण?

यशोधराच्या ब्लॉगवर, "मी का लिहिते?" या पोस्टला प्रतिसाद देऊन आले. आणि इतरही ब्लॉग्जवरचा हा खो-खो वाचला. वाचून विचारातही पडले, थोडीशी गंमतही वाटली खरंच, आपण का लिहितो? या प्रश्नावर प्रत्येक लिहिणा्-याचे अगदी गंभीर विचार वाचले. नकळत मन विचार करायला लागलं. खरंच का बरं लिहितो आपण? बरंच काही नवीन सापडलंही. या सगळ्या मंडळींमध्ये आपण काय लिहिणार. म्हणून मनातल्या मनातच लिहून, वाचूनही घेतलं स्वतःला. पण मेघनानी प्रतिसाद वाचला आणि लिही तू पण म्हणून खो दिलं. मग घेतलंच लिहायला. गद्य लेखन माझा प्रांत नाही. जे काही लिहिते ते अगदीच थोड्या शब्दात बोलून टाकायची फार वाईट(?) सवय आहे मला. मग का लिहितो हे लिहायला घेतल्यावर मात्र पंचाईत झाली आणि परीक्षा असल्यासारखं वाटायला लागलं. तरीही मी आपलं घोडं दामटावतीये पुढे

स्वतःला व्यक्त करण्याचा सोपा मार्ग. हे अगदी सरधोपट उत्तर आलं माझ्याही मनात. उंहू पण अगदीच एवढं कारण नसणार आपल्या लिहिण्यामागे हेही नक्की जाणवलं. बऱ्याचदा कविता लिहून झाल्यावर जाणवत, अरे हे काय? आणि का लिहिलंय आपण? मिळणाऱ्या प्रतिक्रिया? हे एक कारण आहेका? लोक वाह वा करतात, अहं सुखावला जातो म्हणून? असेलही कदाचित पण सगळ्याच लिखाणाला प्रतिसाद मिळतोच असं नाही मग तरीही लिखाण बंद करत नाहीच आपण. जे जसं सुचेल तसं लिहितंच असतो की. मग मिळणारे प्रतिसाद हे काही कारण नाही.

बऱ्याचदा लिहून झाल्यावर जाणवत, हे काय? खरंच मग असलं नकारात्मक लिहिण्याच काय हशील? पण लिहून मोकळं झाल्यासारखं वाटतं, आपल्या डोक्यावर असलेलं कसलंतरीच ओझं अलगद कोणीतरी काढून आपल्या हातात घ्यावं आणि आपल्याला एकदम मोकळं मोकळं वाटावं तसं काहीतरी. मग या लिखाणाला सकारात्मक उर्जा म्हणून बघायला काय हरकत आहे? मनातले नकारात्मक विचार कागदावर/ब्लॉगवर उरतावल्याने बरं वाटत असेल तर चांगलंच आहे की.

प्रत्येक लिखाणाची कारण वेगवेगळी असतील हे जाणवायला लागलंय आता. मागे औरंगाबाद खाद्ययात्रा लिहिली तेंव्हा, त्या त्या जागांना मनोमन भेटून आले, ते क्षण, तेवढ्यापुरते का होईना जगून घेतले होते. आठवलं. मग लिहिणं म्हणजे उलटून गेलेल्या क्षणांना पुन्हा जगणं असं म्हणता येईल? बरिच कारणं सापडली जे लिहिलंय त्याची आणि जे न लिहूनही उमटलंय त्याचीही.

या प्रश्नाने एक कविता मात्र सुचली,त्यातल्या सुरवातीच्या ओळी अश्या .

"लिहीत जातो कशास आपण?
लढवत राहतो शब्दांचे रण, "

यशोधरा, मेघना आणि इतर सगळ्याच दिग्गज ब्लॉगर्सना या खेळाबद्दल धन्यवाद.

अपेक्षाभंग.....कुणाचाही

ए.टी.एम मधून पैसे काढायला जाते तिथेच बाजुला भली मोठी मशीद आहे. तिथे मशीदिच्या बाहेरच्या पाय-यांवर एक बुरखा घातलेली बाई समोर एक डब्बा घेऊन बसलेली असते. मी आधी कधीच तीच्या डब्यात पैसे घातले नाहीत पण ४-५ महिन्यापूर्वी काय वाटलं कोणास ठाऊक मी थोडे फिल्स तिच्या डब्यात टाकले आणि मग ती सवयच झाली पैसे काढायला गेले की तीच्या डब्यात काही नाणी टाकूनच गाडीत बसायचं.

पण काल तिथे गेले पैसेही काढले आणि सुट्टे नव्हते म्हणून नाही टाकले तीच्या डब्यात पैसे. मी तिथून पुढे सरकत होते तेंव्हा तिने नेहमीच्याच अपेक्षेनं सलाम म्हणून डबा वरती उचलून धरला. माझा हात हालला पण मी नुसताच सलाम म्हणाले आणि पुढे जाऊन गाडीत बसले.

थोडासा रागच आला मला, की काय हे? एकदा दिलं म्हणून काय नेहमिच द्यायला हवं का? आणि नंतर मात्र उगाचच रुखरुख लागून राहिली मनाला. पहिल्याच दिवशी नसते दिले तिला पैसे तर तीचा हा अपेक्षाभंग टाळता आला असता मला.

आई

अतिशय नाजुक मन:स्थितित केलेली कविता, केवळ हरवून जाउ नये म्हणून इथे टाकून ठेवत्ये!

जाणारी ती
तीच्या वेळेवर गेलेली
माझी मात्र वेडी आशा उरलेली
अशी कशी ती गेली?
मला न भेट्ता
माझी चौकशीही न करत,
रात्री मी उठुन बसते
तीच्याच दिव्याशी जाते
आशाळभुतपणे दिव्यातच बघते
आई म्हणुन हाका मारते
वाटत
दिव्यातुन येईल
बाळा म्हणुन पोटाशी घेइल
परत परत मी हाका मारते
पण ती काही येत नाही
माझ्या हाकेला आणि
तीच्या वात्सल्याला
तो काही दाद देत नाही
कारण ती गेलेली
आणि मी मात्र
मागे राहिलेली

मैफल

रंगायची नेहमीच
तशीच आजही रंगलेली मैफल,
तू समेवर येताना
तुझ्या सुरात सुर मिसळत,
तानपु-याची साथ करणारी मी
देहभान विसरुन गाण्यामधे हरवलेला तू
.
.
.
मी हळूच उतरवला तानपुरा
मैफल रंगलेली...

कविता

मी विचारलं,
परत कधी भेटणार तू,
आणि तुझ्या कविता
ऐकवत सुटलास एकानंतर एक
मीही शोधत राहिले,
त्यातच मला हवी असलेली एक
तू बोलत होतास मी ऐकत होते
ठरवलं होतं,
कशी आहेस? विचारलंस की,
ऐकवेन मीही,
माझी नसलेली,
तुझीच एक कविता
तू विचारलही "कशी आहेस?"
मी नुसतीच
हुंकारले होते...
(छानच होती... कविता!!!)

........घायाळ वादळही

पुन्हा एकदा आलंच
(येणारच होतं ते).....
गेल्या वेळेस बरीच मोडतोड करून गेलेलं
यंदा पण झालंय बरंचसं नुकसान
कुंपणाच्या तारा गोळा झाल्यात
खांब उखडून पडलेत
(अजुनही बरीच नासधुस झालीये)
आता मात्र पक्का बंदोबस्त करावा लागेल अस दिसतय
सिमेंट्ची पक्की भिंत बांधून घ्यावी
आणि हो वरती फुट्क्या बाट्ल्यांच्या काचा पेरायला हव्यात
म्हणजे नुसतं डोकवायचं म्हणलं तरी घायाळ झालं पाहिजे हे वादळ.
....
(आतलेही होतील घायाळ त्यावरून बाहेर डोकावताना)
चिंता करायची नाहीच काही गरज ,
बंदोबस्त झालाय....

कवितेस

सोडायचा नव्हताच हात,
आधी नाईलाज म्हणून आले होते आस-याला,
मग सवय झाली,
मग व्यसन,
पण आताशा तूही दुरावत चाललीयेस
मला तर विसरच पडत चाललाय,
कारणाचा शोध घेतीये,
पटेल असं सापडलं नाहीये अजूनही,
सध्या जे सुचेल ते कारण पटवून घेणं चाललंय
असो,
भेटुच परत कधी तरी..

राहीले ओठांवरी

बोलायचे काहीच होते,बोलले काहीतरी
ओठातले हे शब्द माझे राहिले ओठांवरी
स्वप्नातील मूर्त तीही राहिली स्वप्नांतरी
ओठातले हे शब्द माझे राहिले ओठांवरी
साहवेना ही व्यथा तू भेट ना रे क्षणभरी
ओठातले हे शब्द माझे राहिले ओठांवरी
ऐक ना! अखेर ही रे,चालले मी दुस-या तिरी
ओठातले हे शब्द माझे राहीले ओठांवरी
श्यामली!!!

वादळ

वादळाला का कधी कोणी मर्यादा घालतं?
येतंय येऊ द्यावं
जातंय जावू द्यावं
आपण मात्र त्याच्याकडे तटस्थपणे बघावं
अडकू नये जराही
वाहू द्यावं निवांत
नेतो वाहवून म्हणालं तर थोडंसं बरोबर वाहावं
वेग जरा मंदावल्यावर हळूच बोट सोडावं
...
बरोबर वाहवलो तरीही नुकसान तसं फारसं नाही
उरेल मागे फक्त...खाली बसलेला धुराळा...
आणि कोसळलेली इमारत...
...दुखावलेल्या मनाची.

हट्टी....कविता

ह्या कवितेन जरा तरी
शहाण्यासारखं वागावं
वेळ काळ न बघता
कधीही काय सुचावं...?

विरहात ठीके.....पण
'तो' असतानापण याव?
त्याच्याकडे दुर्लक्ष करुन
काय तुझ्याकडे बघावं?

भलतीच बया विचित्र
केंव्हाही काय सुचते...?
नको नको म्हणल तरी
मनात दंगा करते

नाहीच लीहीणार म्हणलं मी
तर हट्टालाच पेटावं
आपले आपले शब्द घेऊन
गुमान ओळीत जाऊन बसावं

आता तरी लीही ना
म्हणुन लाडीकस विनवावं
आणि बर बाई म्हणुन मीही
मग जरा तीचं ऐकावं...

प्रतिध्वनी

इकडून एक प्रेमळ हाक
तिकडून तेवढीच प्रेमळ साद
मन खुष, मी गोंधळलेली
कोण???
च्च कोण नाय भास....
नाही नाही आहे कोणीतरी..
वेडया प्रतिध्वनी ओळखता येत नाही का?
...
मी बोलत रहाते,
ऐक ना... आज ना... मी तर....
.
.
.
काहितरी का होईना
तिकडून ऐकू येण्यासाठी बोलणं भाग असतं मला.

क्युं खोएं खोएं चांद की फ़िराक मे तलाश मे उदास है दिल

काल इथे दिसणा-या एकमेव मराठी चॅनलवर (मी मराठी) स्वानंद किरकिरेची मुलाखत लागली, मी टी.व्ही. बंद करुन टाकणार होते पण मुलाखत घेणा-यानी कवि,गायक, लेखक अशी ओळख करुन दिल्यावर म्हणल बघु या आहे कोण हा माणूस. आणि बघत म्हणण्यापेक्षा ऐकत राहिले नुसतीच. हि मुलाखत बघेपर्यंत स्वानंद किरकिरे कोण आहे ? मला अजिबात माहिती नव्हतं.
मग मुलाखत संपल्यावर नेट वर शोधत गेले आणि याची एकाहून एक उच्च अशी गाणि सापडत गेली. येऊ घातलेल्या खोया खोया चांद या सिनेमामधलं हे एक अतिशय आवडावच असं गाणं. माझ्यासाठी तरी आता हा सिनेमा कसा असेल? त्याला काहि कथानक असेल का? वगैरे गौण बाबी आहेत. या गाण्यासाठीतरी हा सिनेमा बघायचाच आहे.
गुलजारनंतर आवडणा-या गीतकारामधे स्वानंद किरकिरे नाव कधीच ऍड झालंय हे वेगळ सांगायला नकोच.


आज शब जो चांद ने है रुठने की ठान ली
गर्दिशोमें है सितारे बात हमने मान ली
अंधेरी स्याह जिंदगी को सुझती थी नहि गली
के आज हाथ थाम लो की के हाथ की कमी खली
क्युं खोएं खोएं चांद की फिराक मे तलाश मे उदास है दिल्
क्युं अपने आप से खफा खफा ज़रा ज़रा सा नाराज़ है दिल
ये मंज़िले भी खुद हि तय करें, ये फासलें भी खुद हि तय करें
क्युं तो रास्तों पे फिर सहेम् सहेम् संभल संभल के चलता है ये दिल
क्युं खोएं खोएं चांद की फिराक मे तलाश मे उदास है दिल

ज़िंदगी सवालोंके जवाब ढुंडने चली ,
जवाब में सवालों कि एक लंबी सी लडी मिली
सवाल हि सवाल है सुझती नही गली,
कि आज हाथ थाम लो एक हाथ कि कमि खली
जी मे आता है,
मुर्दा सितारा नोच लू,इधर भी नोच लू
एक दो का जिकर किया मै सारे नोच लू
इधर भी नोच लू, उधर भी नोच लू
सितारे नोच लू , नज़ारे नोच लू
क्युं तू आज इतना वहेशी है, मिजाज़ मे मजाज़ है, ऐ गम-ए-दिल
क्युं अपने आप से खफा खफा, ज़रा ज़रा सा नाराज़ है दिल
ये मंजीले भी खुद हि तय करें, ये फासले भी खुद हि तय करे
क्युं तो रास्तों पे फिर सहेम् सहेम् संभल संभल के चलता है ये दिल

दिल को समझाना केह दो क्या आसान है?
दिल तो फ़ितरत से सुन लो ना बेइमान है
ये खुश नहि है जो मिला, बस मांगता हि है चला
जानता है हर लगि का दर्द हि है बस एक सिला
जब कभि ये दिल लगा, दर्द हि हमे मिला,
दिल कि हर लगि का सुनलो दर्द हि है एक सिला
क्युं नये नये से दर्द कि फ़िराक मे तलाश मे उदास है दिल
क्युं अपने आप से खफ़ा खफ़ा ज़रा ज़रा सा नाराज है दिल
ये मंजीले भी खुद हि तय करे, ये फासले भी खुद हि तय करे
क्युं तो रास्तों पे फिर सहेम् सहेम् संभल संभल के चलता है ये दिल

क्युं खोए खोए चांद कि फिराक मे तलाश मे उदास है दिल
क्युं अपने आप से खफ़ा खफ़ा ज़रा ज़रा सा नाराज़ है दिल

Happy New Year :)

काय लिहायचय ? काही खास नाही , उगाचच काहितरी.
अंs s काय बर बदल होतो नविन वर्ष सुरु झालं म्हणजे? तसं बघायला गेलं तर काहिच नाही, रोज उगवतो तसाच दिवस आजचाही उगवला सकाळची आता दुपारपण झाली मग एवढा जल्लोष एवढा उत्साह कशासाठी?
नव वर्ष असंही येणारच असतं तुम्हि स्वागत करा नाहितर नका करु. मग हे येणारच आहे आणि जुनं जाणारच आहे तर जाणा-याला हसतमुखानं निरोप आणि येणा-याचं आनंदानी उत्साहानि स्वागत करण हे तरी आपल्या हातात असतच मग का करु नये तसचं. तर Happy New Year लोकहो :)

मागे वळून बघितलं तर , जाणा-या वर्षानि आपल्याला बरंच काहि दिलेलं असतं. आपण बरंच काहि हरवलेलं असतं, पण हे जे हरवलेलं आहे त्यालाच कुरवाळत बसलो तर आपल्या आयुष्यात येणारं अजुन एक वर्ष आपण वाया घालवणार आहोत हे लक्षात घेउन ते तिथेच सोडून त्यातुन काय बोध घ्यायचा तो घेउन नव्या वर्षाला नव्या उमेदिनी नव्या उत्साहानी आणि काय काय मिळालय आपल्याला ह्यावर नजर टाकून केली तर बरं नाहि का?

तर बदलत काहीच नसतं पण अश्या क्षणांनी अश्या प्रसंगांनी आपण होऊन काहितरी बदल घडवून आणायचे असतात. म्हणून मग असली निमित्त शोधायची स्वतःमधे बदल घडवून आणायसाठी. संकल्प वगैरे भानगडी खरोखर न पाळण्यासाठिच असतात. पण अगदि संकल्प असं न म्हणता स्वतःला दिलेलं वचन, स्वतःशीच प्रामाणिक राहायचा प्रयत्न? असं काहिसं म्हणता येइल?
काय काय करायला हवं बरं?

सध्या तरी एवढच म्हणायचय जे रोजही म्हणू शकतो आपण नव्या सुर्याबरोबर रोज नवि सुरवात करावि , कालचं चांगल लक्षात ठेवावं वाईट विसरुन जावं.

आता हे काय नविन हाय का राव? :D काय तरी बडबड करते बया