सणकन जावा जीव
आता आहे आणि आता नाही अस व्हावं
दिव्यातल्या वातीसारखं नाही,
कापरासारखं जळावं
अलगद विरून जावं जळता जळता आसमंतात
अगदी राखही उरू नये मागे
तेवढीही खूण नको,
जगलो होतो आपणही
हीही जाणीव नको
श्यामली
कधी जमणार?
तोल राखणं
डावीऊजवीकडे न झुकता
सरळ चालणं
कधी जमणार.....?
वाहताना कवीतेतुन
शब्द सांभाळणं
आणि व्यक्त होताना
अव्यक्त राहाणं
कधी जमणार.....?
जगताना आयुष्य
अपेक्षा ठेवणं
आणि उपेक्षा झाली की
निरपेक्ष दाखवणं
कधी जमणार......?
श्यामली!!!
मौन वादळ
सांधु पहाते मी....
मौनातल्या वादळाला
बांधु पहाते मी!
पुरावे
अन शोधायचे किती
पुराव्यासाठी पुरावे
सांग मी द्यायचे किती
जराशी धडपड
तीन्-चार महीन्यापूर्वी जयाची कविता वाचता वाचता चाल सुचली मला,आणि ती record करुन ऐकवली तुमच्यापैकीच काही मंडळींना.
चाल उत्तम असल्याचे अभिप्राय आले, बरच प्रोत्साहन मिळालं म्हणुन studio मधे जाउन recording करायची हिम्मत केली.
नवर्यानीही कौतुकानी या गोष्टीत भाग घेतला, support केला.
आवाजाला रियाजाचा अभाव लगेचच जाणवतोय त्या बद्दल कान उघाडणिही झालीये
तरीही माझं हे गाणं, जसं आहे तसं तुम्हा सर्वांना ऐकवावसं वाटतयं.
तर हे माझं पहिलं वहिलं गाणं माझ्या तमाम दोस्त मंडळींना सादर अर्पण
http://odeo.com/channel/411313/view
चारोळी
कशा व्यथा कळाव्या
न ओठी शब्द येता
नेत्री तूझ्या दिसाव्या
जख्म
फिर जीने का कोइ बहाना बन जाते है ज़ख्म!
जी उठती हूं फिरसे जब कुरेदती हूं इन्हे
हर सुबह बनते है नये, और शाम पुराने से ज़ख्म!
चिंगारी सी जलन,तपती धूप सी अगन इनमे
ठहरे पानी से है फिर भी क्यू सुलगते है ज़ख्म!
संभाले है न जाने कितनी मुद्दतोंसे मैने
मिलो तो बताऊं के है तुमसे भी प्यारे अब ये ज़ख्म!
कारण
पटकन कोरडी पडणारी जखम
नकोशी वाटायला लागते,
जेंव्हा
भळभळणार्या जखमेचीच सवय करुन दीलेली असते
मग खपली धरत असली तरी,
खरवडुन काढावीशी वाटते,
आणि
त्यातुन निघणारी कळसुध्दा देउन जाते एक अघोरी आनंद...
चला बर झालं वाहती झाली जखम परत,
आता नवीन खपली धरेपर्यंत काळजी नाही काहिच,
दु:ख करायला आहे काहीतरी कारण आता.
श्यामली
उंच माझा झोका गं
अन पंखही नसतात छाटलेले
येतं पाखरू बाहेर
मस्त झेप घेतं आकाशात
पींज-याभोवती फेरी मारत एक छानशी
आणि येऊन बसत परत
पींज-यातल्याच झोक्यावर,
बाजूलाच बहरलेल्या उंच गुलमोहराकडे बघत
गुणगुणतं मजेत,..
उंच माझा झोका गं........
चारोळी
जरा मनानी हलके व्हावे
थोडे वाहून, परतून यावे
मेघ जांभळा जरी आकाशी
हसून त्याही थांब म्हणावे
जपमाळ
नाहीयेस कुठेही
सगळ्या नुसत्या कल्पनाच आहेत
समोर जे दिसतंय तोही भास आहे
समजावतीये मी मनाला,
पण मग प्रत्येक श्वासाबरोबर
अपोआपच ओढल्या जाणा-या या जपमाळेच काय?
हेही थांबवायला हवं......................... .
जायके का सफर-३
भेळेसाठी केलेल्या चटण्या बघुनच तोंडाला पाणि सुटायला लागतं. हिरवी चटणी,मग गोड चटणी आणि लाल चटणी. ही भेळ एक डिशभर म्हणजे अजून काहि खायच विसरायचच, एवढी जास्त quantity असते भेळेची. तसे याच्याकडचे सगळेच पदार्थ छान असतात पण अजून एक आवर्जुन सांगण्यासारखा पदार्थ म्हणजे दही बटाटा पुरी. सहा का आठ पुऱ्या असतात एका डिशमधे पण हे ही पोटभरेल एवढं. यातल्या दह्याचं आणि गोड चटणीच झालेलं मिश्रण फारच चवदार लागतं. ही दहिपुरी खाताना तंद्रीच लागली पाहिजे एवढी भन्नाट चव असते. औरंगाबाद शहराच्या मध्यवस्तीत अप्पा हलवायाच्या दुकानासमोर आहे हे चाटभांडार.
गेली कित्येक वर्ष फक्त थाळीच देऊनही अजून तेवढ्याच जोरात चालणारं माझं अतिशय आवडतं ठिकाण म्हणजे bus-stand जवळचं भोज राजस्थानी भोजनालय. ४०ते५० रुपयात अमर्यादित थाळी. सुरवातीला जलजीरा, २सुक्या भाज्या, २ रस्सा भाज्या, डाळ, कढी, १ स्नॅक (बटाटावडा, समोसा किंवा ढोकळा) याच्याबरोबर चटणी, ठेचा, पापड, सॅलड, गरमा गरम आणि मऊ असे तुप लावलेले फुलके, बाजरीची छोटीशी रोटली (भाकरी) यावरही तुप. यातल्या सगळ्या भाज्या छान असतात पण मला खास आवडते ती इथली कढी. फारच चविष्ठ असते अगदी पुन्हा पुन्हा घेऊन सुद्धा समाधान होत नाही. आणि शेवटी भात / खिचडी तुम्ही दोन्हीही टेस्ट करु शकता. मस्त घोटून केलेली सरसरीत खिचडी आणि वर पुन्हा तूप. इथलं वैशीष्ठ म्हणजे सगळा स्टाफ राजस्थानी वेशभुषेत असतो. आणि लांब लांब मिशा
असलेला मॅनेजर (मालक?) स्वत: पुन्हा पुन्हा येउन घरच्यासारखा आग्रह करत असतो.
रेल्वेस्टेशनरोडला असणारं फुड लव्हर्स आणि जालनारोडला असलेलं मास्टर्स कुक ही हॉटेलंपण माझ्या आवडत्या होटेल्सपैकी आहेत. हल्ली फौजी ढाबा जास्त लोकप्रिय झालाय पडेगावच्या थोडंस पुढे असलेला हा ढाबा फॅमीली पार्टीसाठी एकदम मस्त इथे लंच ला जाऊन दिवसभर मस्त टाईमपास करता येतो. मुलांना खेळायला खेळणी बसवलीयेत. पण हा ढाबा किंवा आजकालचे नविन ढाबे व्हायच्या आधीचा अस्सल ढाबा म्हणजे मिटमिट्याला असणारा पाशाभाईचा ढाबा फार सुरेख चव होती याच्याकडच्या चिकन मसालाची. आता हाही कमर्शीअल झालाय .
साधारण नोव्हेंबर डिसेंबरमधे लायन्स क्लबतर्फे आयोजीत होणा-या आनंदनगरीमधे मिळणारा पापड कधिही न विसरता येणारा आहे. अजुनही मिळतो. फक्त या पापडासाठी पुन्हा एकदा या दिवसात औरंगाबादला जायची इच्छा आहे.
सध्या माझं फ़ेवरेट असणारं हॉटेल म्हणजे वाळुजला असणारं लुधियाना ढाबा पिवर पंजाबी चव असते सगळ्या पदार्थांना, आणि हवं तसं बनवूनही देतो हा.
आणि शेवटी औरंगाबादची शान असलेलं तारा पान सेंटर कुठेही कधीही स्पेशल जेवण झालं की तारापान ची पानं घरी आलीच पाहिजेत असा दंडकच आहे बहुतेक औरंगाबादकरांचा. आणि तीथे जाऊन पान खाणं हा तर एक राजेशाही अनुभव असतो. गाडी तारापानच्या जवळपास उभी करायची कि लगेच याचा माणुस येउन order घेतो, पाचच मिनिटात सुंदर तबकामधे गुलाबाच्या पाकळ्या,चांदिचा वर्ख लावलेली रसदार पानं तुमच्या समोर हजर असतात. अगदी नवाबी थाटात . पोटभर जेवून पान चघळताना सहजच वाटून जात, सुख सुख म्हणतात ते याहून वेगळ ते काय असेल बरं.
तशी ही खाद्य यात्रा न संपणारी आहे कारण चवी बदलतात, हात बदलतात आणि आपण खातच असतो . बरचसं राहून गेलय ब-याच आठवणी धुरकट झाल्या आहेत बरीचशी नावं आता आठवतही नाहियेत, हो पण चव मात्र जिभेवर रेंगाळत असते अजूनही. म्हणून किमान सध्या जेवढ आठवलं तेवढतरी जपायचा एक छोटासा प्रयत्न.
तुर्तास औरंगाबाद खाद्ययात्रा ईथेच समाप्त
जायके का सफर- २
इथे अगदी २५ वर्षापेक्षाही? अं ss नाही त्याहून जुनी असलेली काही hotels आहेत त्यापैकी एक म्हणजे मेवाड. हे अजूनही गर्दीने वाहतं असलेलं hotel,याचं लोकेशन पण अगदी heart of the city (आता काही संकेत बदलले असले तरी गुलमंडी ती गुलमंडी ) स्पेश्यालीटी; दही मिसळ,कदम फर्मास मला अजूनही जावं वाटत इथे पण इथे येणारा crowd बराच बदललाय आणि स्टेटस, हायजिन असे काही नवीन शब्द माहीत झालेत मला :(. गुलमंडीच्या ऐन चौकात असलेलं शामलाल कोल्डड्रिंक्स अजूनही चालू आहे . (माझ्या लहानपणच आइसक्रीमचं एवढंच एकमेव दुकान आठवतं मला).
याच रस्त्याने जरा पुढे सिटीचौकाकडे निघालं की " गायत्री चाट भांडार "भरपूर प्रसिद्ध असलेलं चाट भांडार आहे हे, याच्याकडची कचोरी,समोसा,मुंगभजे (एकदम स्पेशल),आलुवडा .हे ही बरंच जुनं आहे आणि अजून दणदणा चालतं. इथेच गुलमंडीवर असणारं पण आम्हा मुलींना वा बायकांना जाता न येणारं एक हॉटेल म्हणजे न्यू मराठा हॉटेल. लाल तर्री पातळ रस्सा आणि झणझणिताच्याही पुढचं तिखट असे अस्सल गावठी मासांहारी पदार्थ मिळणारं ठिकाण (आम्हाला पार्सलवरच समाधान मानावं लागायचं )अजूनही चालू आहे बहुदा. आता जरा गुलमंडीवरुन अंबा अप्सरा talkies कडे निघायचं आपल्याला याच्या समोर असणा-या गाड्या म्हणजे साबुदाणा वडयासाठी गर्दी खेचणा-या.
औरंगपु-यात आलं की आली आमची शाळा आणि collage. अर्थात एस बी colony. इथे असणारं पुर्णानंद या दुकानाबद्दल तर किती लिहावं तेवढं थोडं आहे. इथे आलुवडा आणि समोसा भन्नाट मिळायचा पब्लिक वेडं झालं होतं तेव्हा ;अक्षरशः: घरीसुद्धा पार्सल मागवले जायचे .आता collage मधून टिपी साठी गाठायची ठिकाणं :D
निराला बाजार मधलं ५६ भोग तेव्हाच्या तरुण पिढीसाठी 'दिल की धडकन " वगैरे होतं मस्त बनवलं होतं त्यानं. ते हॉटेल खायला विशेष काही प्रसिद्ध नव्हतं तिथलं पण माहौल एकूणच लै भारी असायचा.याच्या समोरच असणारं आर्चिज पण याचंच भावंड इथे पावभाजी छान मिळायची. हे रिनोवेट केलं वाटत आणि अजूनही चालू आहे. ५६ भोग मात्र बंद पडलं केव्हाच :( आणि
आहा पैठणगेटवरच लकी ज्यूस सेंटर भरपूर जुनं अजूनही तेवढंच चालणारं . मग गोमटेश मार्केटमधलं राधिका (उडुपी), वरद गणेश समोरच मेषा दोन्हीही स्वस्त मस्त आणि आपले वाट्णारे कधीही गेलं तरी पडीक पब्लिक सापडणारच इथे. (आता दोन्ही नाहीये). तिथून पुढे जुन्या हेडगेवार hopitalच्या बाजूला एका साऊथ इंडियन माणसाने चालू केलेला stall . हा stall एवढा चालतो खरचच त्याच्याकडचा मेदूवडा,इडली, सांबार ,आणि सही ssss असणारी चटणी. क्रांती चौकातल्या पावभाजीच्या गाड्या अजूनही आहेत, मस्त पावभाजी मिळायची. खास पावभाजीसाठी आम्ही एवढ्या लांब जायचो तेव्हाही.(नवीन जाणा-यांना क्रांती चौक आणि निराला बाजार छान option आहेत सटरफटर खाण्यासाठी).
जायके का सफर
खाद्यंतीची वेगवेगळी ठिकाणं अजमावणं आणि परत परत तिथे जाऊन खाणं असा ब-याच जणांचा छंद असतो.
अर्थात खायची आवड असणा-यांबद्दलच बोलता येईल हे. तर माझ्या खाद्यंती च्या शोधयात्रेतली काही आवडलेली न-आवडलेली ठिकाणं.
सुरवात अर्थात औरंगाबाद :-)
जसं आठवतंय त्याप्रमाणे पहिलं hotel Darling न्यू उस्मानपु-यात असलेलं शेट्टीचं अर्थात उडुपी, पुर्णपणे शाकाहारी रेस्टोरेंट. याच्याकडचा darling special मसाला डोसा जबरी असायचा. अजूनही हे hotel त्याच जागेवर चालू आहे एका hotel ची बरीच hotels झाली आहेत म्हणे आता. घाटी दवाखान्याचं(govt hospital)canteen तेही याचंच याच्याकडे मिळणारा वडासांबार आणि बटाटावडा ब-याच वर्षापासून खात आलो आम्ही .सध्याचं स्टेटस माहीत नाही याचं पण स्वस्त आणि चवदार असा लौकिक होता याचा तेव्हा.
औरंगाबादच अजूनही फ़ेमस असलेलं नावं म्हणजे मछ्ली खडकला असलेलं उत्तम मिठाई याच्याकडची इम्रती आणि फाफडा अतिशय प्रसिद्ध आहे .तिकडे गेलात कोणी तर नक्की खाऊन पाहाच. याच्या लाईनीत असलेलं अमृतभांडार फक्त दह्यासाठी प्रसिद्ध फक्त दह्याच्या जोरावर या माणसाचा धंदा अजूनही टिकून आहे.याच्या समोरच अजून एक दुकान मिठायांसाठी प्रसिद्ध मिलन मिठाई हे अलीकडे जास्ती पुढे आलंय . विश्वासाने सगळे पदार्थ आणु शकतो याच्याकडुन.
क्रमश:
चारोळी
पाहे लेखणिची वाट
एका वेड्या वचनासाठी
जणु राहिली मुकाट
चारोळी
क्षणी वाटते हा भास
सांग तुझ्या माझ्या मधे
कोणता हा दुवा खास
चारोळी
दाखलेही तेच तेच
न कळे मलाही काही
शब्दासही तोच पेच
सुनामी
गर्जतच आला होतास
अंगण दिलं होतं मी
कुंपण तोडून गेला होतास
उत्तर
काळावर सोपवून दिलेलं असतं ब-याचदा
मग तेही एखाद्या सन्यस्तासारखी समाधी घेउन बसून राहतात
मनाच्या तळघरात,
वरकरणी आपणही सोडुन दिलेला असतो नाद,
अन अचानक,
डायरीतल्या आवडत्या पानात दडपुन ठेवलेलं
जाळी पडलेलं नाजुक पिंपळपान सापडावं तसं....
त्या प्रश्णाच उत्तर अलगद सापडलेलं असत आपल्याला
......आपल्याही नकळत.
वेड पांघरण्यात होता वेगळा वेडेपणा
दोन रात्रितील आता संपला वेडेपणा
वेड पांघरण्यात होता वेगळा वेडेपणा
वाजली वेडी कडी अन दार हे शहाण्यापरी
मोगरा माळुन आला देखणा वेडेपणा
उंबरा ओलांडताना धिट हे झाले धुके
हि धिटाई झेलताना लाजला वेडेपणा
अजुन मजला कळत नाही वेड कोणी लावले?
वेड मज हा लावणारा कोणता वेडेपणा.
कवि:-प्रविण दवणे
समुद्र
तसा माझ्यावर परिणाम होऊ देत नाहीच मी वादळांचा,
कित्येक येतात आणि जातात ,
तुझ्यासारख एखादच माझ्या अथांगतेला भेदत;
बेभान,बेफाम,सगळ पणाला लाऊन माझ्यात सामाऊन जाणारं,
मग काही वेळासाठी कळत नाही जगाला,
कोण मी आणि कोण तू,
तुझ्यातला आवेग निवल्यावर
तू तुझ्या वाटेनी आणि मी..........
तीथेच होतो तिथेच,
थोडासा शांत थोडासा अस्वस्थ,थोडा उध्वस्त
काहि वेळासाठी का होईना, होतो परिणाम माझ्यावरहि
आकाश
कायम शांत निवांत असलेलं;
दुरुनच जगाच निरीक्षण करणारं,
याच्यार्यंत वादळबिदळ पोचतच नसणार बहुदा
आणि आलंच वादळ तर भीक न घालणारं
तेच बरय;
वादळाला शांत राहता येत नसतच म्हणा कधीही
आकाशानं शांतच राहायला हवं?
चारोळी
जेंव्हा जेंव्हा ठरवावं
लिहू नये काही,
तेंव्हा अजूनच गहिरी
होऊन पाझरते शाई!!!
व्यसन
आम्ही दोघांनी एकमेकांच
मी तरी जरा बरीच असते
ते नसतात तेंव्हा
पंण त्यांना मात्र करमत नसावं
माझी भेट घेतल्याशिवाय;
न चुकता येतातच डोळ्यांत
रोजच
प्रश्ण
खरतर कुठेच काही नसत कमी
पण काहितरी हरवतय
वाटतं मनोमनी
काय म्हणावं याला.... ?
अवस्था केविलवाणी,
सांगेल का मला याच उत्तर कुणी?
चारोळी
हे अस कधी कधी
फार उपरं उपरं वाटतं
का कोण जाणे पण
आभाळ मनात दाटत
चारोळी
बघ सुर्यही सोडुन आला
दिशांतील अंतरे
त्यासही कळती झाली
मौनांची भाषांतरे!
चारोळी
प्रत्येक वेळी का असावा
मनाला पार्याचा गीलावा
तुझ्याआधीच मला कळावा
तुझ्या मनाचा कांगावा?
ठेवा
किना्-यावर बसून कल्पनाच करायच्या
तू किती दूरवर आणि कुठे कुठे पसरलेला असशील?
लडिवाळ लाटांमध्ये कधी भिजायचं कधी कोरडं राहायचं
उधाणुन आलास की , कवेत घ्यायचं
गेलास की सोडून द्यायचं
डोळ्यात आठवणींना घेऊन बसायचं
खाऱ्याच त्याही तुझ्यासारख्या
किनारा सोडताना स्वच्छ हात पाय धुवावे आणि परतावं म्हणल तर
जाणवतं थोडी वाळू चिकटलीये तळव्याला...
देठ
चैत्रपालवी किंवा श्रावणसरी नाहीच व्ह्यायचंय,
शिशिरात होते ना पानझड पानझडीत गळणार पान,
त्या पानाबरोबर गळून पडणार देठ,
तेवढंच व्हायचय मला........
कारण जाता तरी येईल कमीत कमी त्याच पानाबरोबर
मला
ऋतु येत होते ऋतु जात होते http://www.maayboli.com/hitguj/messages/75/123530.html?1173358205
मायबोली या संकेतस्थळावर वैभव जोशी यांनी घेतलेल्या कार्यशाळेतली ही गझल. स्वाति अंबोळे आणि वैभव या दोघांना अनेकानेक धन्यवाद . यांच्याशिवाय गझल लिहिणं मला शक्यच नव्हतं.
ऋतू येत होते, ऋतू जात होते
मनाचे परी गाव ग्रीष्मात होते
पुन्हा खेळ झाला उन्हापावसाचा
पुन्हा साठले नीर डोळ्यात होते
उसासा जरा वेस लांघून गेला
तुला वाटले जोगिया गात होते
तशी मी कधी काय तक्रार केली
तुझ्याही कुठे काय हातात होते?
कितीदा नव्याने पुन्हा खेळ मांडू?
कशी हार प्रत्येक डावात होते?
अता स्पंदनांचे उगा दाखले का?
तसेही कुठे प्राण देहात होते?
निवडुंग
एक झाड दिसलं मोठं डौलदार,
स्वत:च वेगळेपण दाखवून देणारं,
कदाचीत वेगळेपणामुळेच असेल
पण आवडुन गेलं फारच
रोज मायेनं खतपाणी करायला लागले,
तसं तसं सुकायला लागलं......
जरासा उशीरच झालाय
पण आलय लक्षात,
निवडुंगाला का कुठे गरज असते असल्या सगळ्या गोष्टींची?
म्हणे मी कविता करते
नसल जवळपास कुणी की
एकट्यानीच बडबडायच
कधी त्याला कविता
तर कधी वेड म्हणायच
चारच ओळी झाल्या तर
थोडस पाणी घालुन वाढवायच
इकडुन तिकडुन शब्द शोधुन
कडव हळूच चढवायच
कधी हिंदी तर कधी
संस्कृताने थोडस मढवायच
छान माझी कविता म्हणुन
प्रत्येकाला पढवायच
अपेक्षा
मावळत्या प्रत्येक दिवसाला
वचन द्यायचं
उद्यापासुन नाहीच ठेवायच्या
काही अपेक्षा
आणि हा "उद्या"येईल
ही अपेक्षा करत रोज वाट बघायची
उद्याचीच...
चारोळी
आठवांचा गाव आहे?
हास वेड्या, बघ जगण्या
अजुनी जरासा वाव आहे
चारोळी
मन स्पर्शले मनाला
देही वसंत फुलला
स्पर्शावीण की रे जणु
मधुमास हा रंगला
चारोळी
सांगु नको अजुनी
वादळाची कारणे
अपुरीच घातली तू
भोवताली कुंपणे
एक ना धड.........................
मग काय कराव याच उत्तर गेल्या आठवड्यात असच भट्कायला गेलो होतो तिथे छान जवळुन विमानं उतरताना दिसतात. मोबाईलच्या Cam नी फोटु काढायचा प्रयत्न केला , काही छान आले काही बरे आले , मग म्हंटल चला चांगला cam घेउन टाकु या , तशी मी छानच फोटो काढते (इती आमचे बंधुराज, तसं त्याच्या दृश्टीनी मी लिहितेही चांगल:D) तसही वाढदिवस होताच मग नव-याला कापायची एवढी सुवर्णसंधी कोण सोडणारे :D
त्यानी एकदम कौतुकानी विचारल "हं! काय मग काय घ्यायच वाढदिवसाचं" मी जरा सावधपणे "मला ना जरा चांगला digi cam हवाय हो!"
नवरोबा एकदम चाटच आता या बयेला नक्की काय झालय म्हणुन?
साड्या,ड्रेसेस, एवढच नाही तर हि-याचे ,मोत्याचे दागिने हे सगळ सोडून अचानक हे camera घ्यायच खुळ कुठुन डोक्यात आलय?(इथे त्याला माझ्या "सवयीची" किती सवय झालीये हे लक्षात येत ना तेच हो आपलं "एक ना धड भाराभर.........."):D
तो अगदी मला सोन्या राजा करुन समजावायचा प्रयत्न करत होता "आपण अस करु या का? तुला मी पैसे देउन ठेवतो पाहिजे तर पण जरा नंतर घेउ या का cam? ( हे अश्यासाठी की आधिचे ४ camere पडलेत घरात हा पाचवा )
पण मी ऐकेल तर ना !मला cam हवाच होता तो पण मला हवा तसा . शेवटी हो नाही करत ५-६ malls ना भेटी देउन झाल्यावर आणि नव-याचा brain wash करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यावर, एकदाचा जरा स्वस्तातलाच(माझ्या मते :( मला हवा तसा नाहीच हं आणि) camera घेतला मी.
इथुन पुढे मी काढलेले वेडेवाकडे फोटु पहायची तयारी ठेवा लोकहो.
तर एवढा पोस्ट प्रपंच कशासाठी ,जे या blog ला भेट द्यायला येतात त्यांना सावध करण्यासाठी :P
आता हळव्या कविता, चारोळ्या,गझल हे काही वाचायला मिळायच नाही बहुदा :)
तेंव्हा माझ्या या blog ला पुन्हा भेट द्यायची की नाही ते आधीच ठरवून घ्या म्हणजे झालं.